झोंपाळ्यावरची गीता आणि इंग्रजी अनुवाद – अध्याय पहिला – भाग १

आज (२५ डिसेंबर २०२०) मार्गशीर्ष शुक्ल एकादशी अर्थात मोक्षदा एकादशी आणि गीता जयंती. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी याच दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला श्रीमद्भगवद्गीता सांगितली आणि ज्ञान देऊन मोक्षाचा मार्ग दाखवला, असं मानलं जातं. त्यामुळेच हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा केला जातो. झोंपाळ्यावरची गीता ही १०० वर्षांपूर्वीची सुलभ मराठी रचना आणि तिचा आजच्या काळात केलेला इंग्रजी अनुवाद आजपासून आम्ही प्रसिद्ध करत आहोत.

मानवी जीवनाचं सार सांगितलेला श्रीमद्भगवद्गीता हा महान ग्रंथ जाणून घ्यायचे, अभ्यासायचे प्रयत्न युगानुयुगे सुरू आहेत; मात्र प्रत्येक वेळी गीता वाचताना, अभ्यासताना त्यातील नवे अर्थ, त्याचे वैविध्यपूर्ण पैलू, पूर्वी न कळलेले आयाम समोर येतात, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. संस्कृत अर्थात गीर्वाणवाणीतलं हे ज्ञान सर्वांना उमजावं, याकरिता विनोबांनी सुगम मराठीत गीताईची रचना केली आणि ती घराघरात पोहोचली; मात्र त्याआधीही गीतेतलं तत्त्वज्ञान अत्यंत सोप्या मराठी भाषेत मांडलं होतं ते दत्तात्रेय अनंत आपटे अर्थात अनंततनय यांनी. त्यांनी इसवी सन १९१७मध्ये म्हणजे आजपासून १०३ वर्षांपूर्वी ‘झोंपाळ्यावरची गीता’ ही रचना त्यांनी केली होती.

पूर्वी मुलींची लग्नं वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षी होत. चैत्रगौरीच्या निमित्ताने त्या माहेरी येत, त्या वेळी झाडांना किंवा अंगणात झुले (झोपाळे) बांधून त्यावर त्यांचे खेळ चालत. त्या वेळी वेगवेगळी गाणी म्हटली जात. त्याबरोबरच या मुलींनी गीता म्हटली तर लहान वयात त्यांना चांगलं ज्ञान मिळू शकेल, असा विचार पुढे आला; पण संस्कृतातली गीता म्हणणं तसं अवघड होतं. त्यामुळे गीतेची अत्यंत सोप्या भाषेत रचना करून त्याला ‘झोंपाळ्यावरची गीता’ असं नाव दिलं गेलं.

अनिकेत कोनकर यांना त्यांचे आजोबा कै. बा. के. करंबेळकर गुरुजी यांच्या संग्रहात २०१०मध्ये ‘झोंपाळ्यावरची गीता’ ही दुर्मीळ पुस्तिका सापडली. त्यातली लेखकाच्या नावासह काही पानं गहाळ झालेली होती. वृत्तपत्रात लेख, स्वतंत्र वेबसाइटनिर्मिती आदी माध्यमांतून लोकांना आवाहन करून ती गहाळ पानं शोधण्यात यश आलं. (दिवंगत) बालसाहित्यकार सरिता पदकी यांनी त्यांच्या संग्रहातून ती पानं उपलब्ध करून दिली. त्यानंतर ती वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आली. एक ऑगस्ट २०१५ रोजी सत्त्वश्री प्रकाशनातर्फे (कोकण मीडिया) ‘झोंपाळ्यावरची गीता’ पुस्तकरूपानं प्रकाशित करण्यात आली.

आता त्यापुढचा टप्पा म्हणून या झोपाळ्यावरच्या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला जात आहे. मराठीसह इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेले रत्नागिरीतले व्यासंगी पत्रकार, लेखक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांना झोपाळ्यावरची गीता वाचल्यानंतर तिचा इंग्रजीत अनुवाद करावा, असं प्रकर्षानं वाटलं.

अनंततनय यांनी केलेली झोपाळ्यावरच्या गीतेची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिला गेयता तर आहेच; पण भाषा सोपी असली, तर कमी शब्दांत बराच अर्थ सांगणारी आहे. विनोबांची गीताई हा श्रीमद्भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद आहे. झोंपाळ्यावरची गीता मात्र समश्लोकी नाही. त्यातल्या अध्यायांची श्लोकसंख्या मूळ संस्कृत श्लोकांपेक्षा काही ठिकाणी कमी, तर काही ठिकाणी जास्त आहे. गीतेत ७००, तर झोंपाळ्यावरच्या गीतेत ५४६ श्लोक आहेत. मराठी भाषेचं सौंदर्य वेगळ्या पद्धतीनं यातून प्रतीत झालं आहे.

श्री. मसुरकर यांच्या अनुवादाच्या या कल्पनेचं स्वागत करून, आम्ही गीताजयंतीचा मुहूर्त साधून आजपासून झोंपाळ्यावरच्या गीतेचे काही श्लोक आणि त्यांचा इंग्रजी अनुवाद दररोज प्रसिद्ध करणार आहोत. अभ्यासाला सोपं व्हावं म्हणून मूळ गीतेचे श्लोकही सोबत देणार आहोत. गीतेचं आध्यात्मिक महत्त्व अद्वितीय आहे; मात्र हा केवळ आध्यात्मिक उपक्रम म्हणून नव्हे, तर भाषा अभ्यासाचा उपक्रम म्हणूनही राबवला जात आहे. संस्कृत, मराठी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांच्या सौंदर्याचा आस्वाद यातून घेता येणार आहे. सर्वांना हा उपक्रम आवडेल, याची खात्री आहे. अधिकाधिक व्यक्तींपर्यंत हा ठेवा पोहोचवण्यासाठी वाचकही हातभार लावतील, अशी आशा आहे.
– संपादक, कोकण मीडिया
…..

झोंपाळ्यावरची गीता – अध्याय पहिला – अर्जुनविषादयोग

पांचां पांडवांशी । युद्ध कौरवांचे ।।
झाले निकराचे। कुरुक्षेत्री ।।१।।

धृतराष्ट्र राजा। युद्धा नाही गेला ।।
म्हणे संजयाला । वृत्त सांग ।।२।।

रथ घडघडा। आला अर्जुनाचा ।।
भाऊ द्रौपदीचा । घोडे हांकी ।।३।।

दोन्ही दळांमध्ये। मामे काके भाचे ।।
पाहताच कांचे । त्याचे मन ।।४।।

Chapter 1 – Arjuna Regrets

There was a war grand । Between five Pandvas and ।
Kauravas; on the land । Called Kurukshetra ।।1।।

Dhrutrashtra the King । Sitting in the wing ।
Asks Sanjay to sing । Its picturesque tale ।।2।।

With Krishna as pilot । Prince Arjuna’s chariot ।
Making noise giant । Enters battlefield ।।3।।

To both the sides । Looks the relatives ।
His mind sneaks । Towards suspicion ।।4।।

(झोंपाळ्यावरची गीता – दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय
इंग्रजी अनुवाद – राजेंद्रप्रसाद मसुरकर)

श्रीमद्भगवद्गीता (मूळ – संस्कृत)
॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥

अथ प्रथमोऽध्यायः । अर्जुनविषादयोगः

धृतराष्ट्र उवाच ।

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय ॥१-१॥

सञ्जय उवाच ।

दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।
आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनमब्रवीत् ॥१-२॥

पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम् ।
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥१-३॥

अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि ।
युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः ॥१-४॥

धृष्टकेतुश्चेकितानः काशिराजश्च वीर्यवान् ।
पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः ॥१-५॥

युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् ।
सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः ॥१-६॥

अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम ।
नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ॥१-७॥

भवान्भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः ।
अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च ॥१-८॥

अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः ।
नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः ॥१-९॥

अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् ।
पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् ॥१-१०॥

अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः ।
भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ॥१-११॥

तस्य सञ्जनयन्हर्षं कुरुवृद्धः पितामहः ।
सिंहनादं विनद्योच्चैः शङ्खं दध्मौ प्रतापवान् ॥१-१२॥

ततः शङ्खाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखाः ।
सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ॥१-१३॥

ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ ।
माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः ॥१-१४॥

पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः ।
पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मा वृकोदरः ॥१-१५॥

अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः ।
नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ॥१-१६॥

काश्यश्च परमेष्वासः शिखण्डी च महारथः ।
धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः ॥१-१७॥

द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते ।
सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान्दध्मुः पृथक्पृथक् ॥१-१८॥

स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् ।
नभश्च पृथिवीं चैव तुमुलोऽभ्यनुनादयन् ॥१-१९॥

अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः ।
प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ॥१-२०॥

हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ।

अर्जुन उवाच ।

सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥१-२१॥

यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् ।
कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे ॥१-२२॥

योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः ।
धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः ॥१-२३॥

सञ्जय उवाच ।

एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ॥१-२४॥

भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् ।
उवाच पार्थ पश्यैतान्समवेतान्कुरूनिति ॥१-२५॥

तत्रापश्यत्स्थितान्पार्थः पितॄनथ पितामहान् ।
आचार्यान्मातुलान्भ्रातॄन्पुत्रान्पौत्रान्सखींस्तथा ॥१-२६॥

श्वशुरान्सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि ।
तान्समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान्बन्धूनवस्थितान् ॥१-२७॥

कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत् ।

(क्रमशः)
(झोंपाळ्यावरची गीता हा भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद नाही. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोक केवळ संदर्भासाठी सोबत देत आहोत.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आधीचे सर्व श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे सत्त्वश्री प्रकाशनाचे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply