लांजा : भारतीय काजूगराची चव, स्वाद पाहता भविष्यात भारतीय काजूची मागणी वाढतीच राहणार आहे. भारतीय उद्योजकांनी आयात होणाऱ्या काजूची भीती बाळगण्याचे कारण नाही, असे उद्गार भारत सरकारच्या कॉमर्स मंत्रालयाचे स्टार्ट अप इंडिया आणि आशियाई विकास बँकेचे सल्लागार डॉ. परशराम पाटील यांनी काढले.
महाराष्ट्र स्टेट को-ऑप कॅश्यू फेडरेशनने गवाणे (ता. लांजा) येथील आरकेपी काजूच्या सभागृहात आयोजित केलेल्या काजू प्रक्रियादार उद्योजकांच्या चर्चासत्रात ते बोलत होते. ते म्हणाले की, देशांतर्गत काजूगराची प्रचंड मागणी पाहता परदेशी काजूची भीती बाळगण्याचे कारण नाही. मात्र काळानुरूप उद्योजकांनी आपल्यात बदल करावेत. त्यासाठी सेंद्रिय काजू, भौगोलिक मानांकन, ब्रँडिंग, आकर्षक पॅकिंग करून बाजारपेठेची आणि ग्राहकांची गरज ओळखून मार्केटिंग करणे आवश्यक आहे. तसे झाल्यास परदेशातून येणाऱ्या आफ्रिकन काजूशी आपण सहज स्पर्धा करू शकतो.
प्रास्ताविकात आरकेपी काजूचे अध्य्कष जयवंत विचारे म्हणाले, देशात काजू बी उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर असून दरवर्षी महाराष्ट्राचे काजूचे उत्पादन साधारणपणे २ लाख ७० हजार टन आहे. त्यापैकी कोकणातील काजूचे उत्पादन सुमारे १ लाख ६५ हजार टन आहे. महाराष्ट्रातील काजू प्रक्रियेसाठी शेजारच्या राज्यांमध्ये जातो. त्यामुळे काजू बीचे उत्पादन राज्यात परंतु रोजगार निर्मिती शेजारी राज्यात होते. अनेक काजू उद्योग महाराष्ट्रात निर्माण होतात, परंतु निरंतर खेळत्या भांडवलाच्या अभावामुळे ते बारमाही चालत नाहीत. तसेच काजू बीच्या दरात गेल्या काही वर्षांत प्रचंड चढउतार होत आहेत. काजू बी खरेदीच्या दराच्या प्रमाणात काजूगराला मार्केटिंगमध्ये दर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे काजू उद्योजक मेटाकुटीला आले असून परिणामी अनेक काजू प्रक्रिया उद्योग बंद पडले आहेत. श्री. विचारे यांनी काजू उद्योजकांच्या अनंत अडचणींचा आणि समस्यांचा ऊहापोह केला.
श्री. विचारे यांनी डॉ. परशराम पाटील, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कोकण विभागीय सहाय्यक सरव्यवस्थापक मिलिंद जोशी, फेडरेशनचे उपाध्यक्ष अमित आवटी, छत्रपती शाहू सहकारी काजू संस्थेचे मोहन परब, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दिनकर पाटील, काजू प्रक्रियादार संघाचे अध्यक्ष विवेक बारगीर यांचे स्वागत केले.
चर्चासत्रासाठी कोकणाप्रमाणेच नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि गोव्यातून काजू उद्योजक उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या. त्यांचे निराकरण डॉ. परशराम पाटील, मिलिंद जोशी, अमित आवटी यांनी केले. दिनकर पाटील यांनीही उद्योजकांना मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे संचालक संदेश दळवी, सहकार भारती ‘कोकण विभागाचे उपाध्यक्ष चंद्रशेखर देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media

आयात काजूची भिती वाटणारच कारण त्यामुळे दर खाली येऊ शकतात त्याचे काय ?