भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या स्वदेशी लशींना मंजुरी; आपत्कालीन वापरासाठी औषध महानियंत्रकांचा हिरवा कंदील

नवी दिल्ली : करोना महामारीच्या प्रतिबंधासाठी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोन लशींच्या आपत्कालीन नियंत्रित वापराला भारतीय औषध महानियंत्रकांकडून (डीजीसीआय) अखेर मंजुरी मिळाली आहे. आज (तीन जानेवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे या दोन्ही लशी भारतातच तयार झालेल्या आहेत. या लशींबद्दलची सर्व माहिती आणि चाचण्यांचे अहवाल अभ्यासल्यानंतर केंद्रीय औषध दर्जा नियंत्रण संस्थेच्या विषयतज्ज्ञ समितीने या लशींच्या वापराला मंजुरी देण्याची शिफारस केली होती. ती औषध महानियंत्रकांनी स्वीकारली आहे. सोबतच कॅडिला कंपनीने विकसित केलेल्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांनाही मंजुरी देण्यात आली आहे. करोनाविरोधातील लढ्यातील हे मोठे पाऊल आहे.

एक आणि दोन जानेवारी २०२१ रोजी केंद्रीय औषध दर्जा नियंत्रण संस्थेच्या विषयतज्ज्ञ समितीच्या बैठका झाल्या होत्या. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने विकसित केलेली कोविशिल्ड आणि भारत बायोटेकने तयार केलेली कोवॅक्सिन या दोन लशींच्या नियंत्रित आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली जावी, अशी शिफारस या बैठकांनंतर करण्यात आली होती. तसेच, कॅडिला हेल्थकेअर लिमिटेड या कंपनीने केलेल्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्सनाही मंजुरी दिली जावी, या शिफारशीचाही त्यात समावेश होता. या तज्ज्ञ समितीत बालरोगतज्ज्ञांपासून सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांपर्यंत विविध वैद्यकीय शाखांच्या तज्ज्ञांचा समावेश असतो. भारतीय औषध महानियंत्रकांनी या समितीच्या तिन्ही शिफारशी स्वीकारल्या आहेत. त्यामुळे आता भारतात करोनाप्रतिबंधक लसीकरण सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही मंजुरी मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून देशवासीयांचे, तसेच शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

कोविशिल्ड लसीबद्दल…

कोविशिल्ड ही लस पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने विकसित केली आहे. रिकॉम्बिनन्ट चिम्पांझी अॅडेनोव्हायरस व्हेक्टर व्हॅक्सिन असे त्या लशीचे शास्त्रीय नाव आहे. सिरमने ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेनेका कंपनी यांच्या लशीच्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. जगभरातील १८ वर्षांवरील २३ हजार ७४५ जणांवरच्या क्लिनिकल चाचण्यांमधूल गोळा केलेली माहिती कंपनीने सादर केली होती. ही लस सरासरी ७०.४२ टक्के प्रभावी आहे. सिरम इन्स्टिट्यूटला देशभरातील १६०० जणांवर दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या घेण्याची परवानगी देण्यात आली होती. त्या चाचण्यांतली सुरक्षितता आणि त्यातून निर्माण झालेली प्रतिकारशक्ती आदींची माहितीही कंपनीने सादर केली होती. परदेशातल्या चाचण्यांच्या माहितीशी देशातल्या चाचण्यांतून मिळालेली माहिती मिळतीजुळती असल्याचे आढळले. त्यामुळे सखोल अभ्यास आणि चर्चांनंतर विषतज्ज्ञ समितीने काही नियंत्रित परिस्थितीत या लशीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी देण्याची शिफारस केली. सध्या या लशीच्या सुरू असलेल्या क्लिनिकल ट्रायल्स पुढेही सुरू राहणार आहेत.

भारत बायोटेकच्या लशीबद्दल…
भारत बायोटेक कंपनीने कोव्हॅक्सिन ही लस भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि पुण्यातील राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था (एनआयव्ही) या संस्थांच्या सहकार्याने तयार केली आहे. व्होल व्हिरिऑन इनअॅक्टिव्हेटेड करोना व्हायरस व्हॅक्सिन असे त्या लशीचे शास्त्रीय नाव आहे. व्हेरो सेल प्लॅटफॉर्मवर ही लस तयार करण्यात आली असून, या प्लॅटफॉर्मची सुरक्षितता आणि प्रभावीपणा या दोन्ही बाबतीत जागतिक पातळीवरचे आतापर्यंतचे निष्कर्ष चांगले आहेत.

भारत बायोटेकने उंदीर, ससे, सीरियन हॅम्स्टर आदी प्राण्यांवरील लशीच्या चाचण्यांमधून गोळा झालेली माहिती सादर केली होती. तसेच, आणखीही काही प्राण्यांवर वेगळा अभ्यास करण्यात आला होता. पहिल्या दोन टप्प्यांतल्या ८०० चाचण्यांमधून निघालेल्या निष्कर्षांनुसार ही लस सुरक्षित असून, चांगली रोगप्रतिकारशक्ती विकसित करते. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या भारतातल्या २५ हजार ८०० स्वयंसेवकांवर घेण्यात येत आहेत. त्यापैकी आतापर्यंत २२ हजार ५०० जणांना लस देण्यात आली असून, आतापर्यंतच्या माहितीनुसार लस पूर्णतः सुरक्षित आहे.

विषयतज्ज्ञ समितीने या सगळ्या माहितीचा अभ्यास केला आणि नियंत्रित स्थितीत आपत्कालीन वापरास मंजुरी देण्याची शिफारस केली. विषाणूच्या बदललेल्या रूपाच्या (स्ट्रेन) प्रादुर्भावाचा धोका सध्या निर्माण झाला आहे. त्यामुळे लशीचे एकाहून अधिक पर्याय उपलब्ध असावेत, यासाठी लशीला परवानगी देण्यात आली. या लशीच्या क्लिनिकल ट्रायल्स यापुढेही सुरू राहणार आहेत.

कॅडिला कंपनीच्या लशीविषयी…
कॅडिला हेल्थकेअर लिमिटेड या कंपनीने डीएनए प्लॅटफॉर्म तंत्रज्ञान वापरून नॉव्हेल करोनाव्हायरस-२०१९-nCoV Vaccine ही लस तयार केली आहे. या कंपनीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल्स देशभरात एक हजारांहून अधिक जणांवर सुरू आहेत. या दोन्ही चाचण्यांच्या निष्कर्षानुसार तीन डोस दिल्यानंतर ही लस प्रभावी ठरते आहे. तसेच सुरक्षित आहे. त्यामुळे कंपनीने २६ हजार भारतीयांवर तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांची परवानगी मागितली होती. ती देण्यात आली आहे.

सिरम आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांच्या लशींचे दोन डोस द्यावे लागणार आहेत. तसेच, या तिन्ही लशींची साठवणूक दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानात करावी लागणार आहे. कोल्डस्टोरेजची अत्याधुनिक यंत्रणा भारत आणि अन्य विकसनशील देशांत सर्वत्र उपलब्ध नाही. त्यामुळे उणे तापमानात साठवणूक आवश्यक असलेल्या लशींची साठवणूक आणि वितरण भारतासह अनेक देशांत अवघड आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय लशी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, त्यांची साठवणूक आणि वाहतूक उपलब्ध तंत्रज्ञानाच्या आधारे करणे सहज शक्य आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply