करोनानंतरच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रत्नागिरीत संगीतमय सुरुवात; आर्ट सर्कलचा संगीत महोत्सव २२ जानेवारीपासून

रत्नागिरी : सलग तेरा वर्षांचे सातत्य कायम राखत यंदाही रत्नागिरीतील आर्ट सर्कल संस्थेने थिबा राजवाड्याच्या भव्य पार्श्वभूमीवर शास्त्रीय संगीत महोत्सव आयोजित केला आहे. २२ ते २४ जानेवारी २०२१ या कालावधीत हा महोत्सव होणार आहे. यंदाचा महोत्सव भविष्यातील भारतीय शास्त्रीय संगीत या संकल्पनेवर आधारलेला आहे. रत्नागिरीत करोनानंतरच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची भव्य सुरुवात आर्ट सर्कलच्या या संगीत महोत्सवाने होणार आहे.

मानसकुमार

महोत्सवाचे उद्घाटन २२ जानेवारीला सायंकाळी साडेसहा वाजता व्हायोलीन वादक मानसकुमार यांच्या कलाकारीने होईल. मूळचे आसाममधील असलेल्या मानसकुमार यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून वडिलांकडून व्हायोलीनचे धडे घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर गुवाहाटीचे पंडित बिद्युत मिश्रा यांच्याकडून आणि त्यानंतर डॉ. व्ही. बालाजी यांच्याकडूनही त्यांनी तालीम घेतली. लखनौच्या भातखंडे विद्यापीठातून मास्टर ऑफ म्युझिक ही पदवी, तसेच भौतिकशास्त्र विषयाची पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. आकाशवाणीचे ते मान्यताप्राप्त कलाकार आहेत. मानसकुमार यांना तनय रेगे तबलासाथ करणार आहेत.

सोनल शिवकुमार

गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या शिष्या आणि जयपूर अत्रौली घराण्याच्या अध्वर्यू माणिक भिडे यांच्या शिष्या सोनल शिवकुमार यांच्या गायनाने पहिल्या दिवसाचा समारोप होईल. मूळच्या गोव्याच्या असलेल्या सोनल यांनी सुरुवातीचा काही काळ सुप्रसिद्ध गायक पं. प्रभाकर कारेकर यांच्याकडून शिक्षण घेतले आहे. ग्वाल्हेर, ओडिशा, भोपाळ, जालंधर, बिलासपूर, बनारस, गोवा, मुंबई अशा भारतभरात होणाऱ्या, तसेच भारताबाहेर होणाऱ्याही अनेक मानाच्या महोत्सवांमध्ये त्यांनी गायन सादर केले आहे. एसएनडीटी विद्यापीठाची एमए (संगीत) ही पदवी त्यांनी मिळविली असून, २०१३ सालचा कर्नाटक सरकारचा डॉ. मल्लिकार्जुन मन्सूर युवा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यांना तबलावादक मंदार पुराणिक आणि संवादिनीवादक सारंग कुलकर्णी संगीतसाथ करणार आहेत.

आदित्य खांडवे

शनिवारी, २३ जानेवारीला सायंकाळी सात वाजता युवा शास्त्रीय गायक आदित्य खांडवे मैफल रंगविणार आहेत. जयपूर घराण्याच्या अध्वर्यू स्व. धोंडूताई कुलकर्णी यांच्याकडून गुरू-शिष्य परंपरेतून आदित्य यांनी शिक्षण घेतले आहे. आदित्य यांच्या आई मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाच्या प्राध्यापिका असल्याने सांगीतिक वातावरणात आदित्य यांचे बालपण गेले. वयाच्या तेराव्या वर्षापासून पं. रत्नाकर पै यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे रीतसर शिक्षण घेण्यास सुरुवात केली. सध्या आदित्य पद्मश्री उल्हास कशाळकर यांच्याकडून तालीम घेत आहेत. त्यांना तबलासाथ सुप्रसिद्ध तबलावादक प्रसाद करंबेळकर, तर संवादिनीसाथ रत्नागिरीचा वरद सोहनी करणार आहे.

कौस्तुभ कांती गांगुली

शनिवारच्या दिवसाचा समारोप भावस्पर्शी आवाजाचे गुणवंत कलाकार, पतियाळा घराण्याचे गायक बंगालचे कौस्तुभ कांती गांगुली करणार आहेत. ख्याल, ठुमरी, दादरा, भजन अशा विविध संगीत प्रकारांवर त्यांची हुकमत आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासून आजोबा फणींद्र मोहन गांगुली यांच्याकडून, तर वयाच्या सातव्या वर्षापासून पं. अजय चक्रवर्ती यांच्याकडून त्यांनी श्रुतीनंदन संगीत शाळेमधून शिक्षण घेतले. नंतर कोलकाता येथील आयटीसी संगीत रिसर्च अकादमीत गायनाचे पुढील शिक्षण घेतले. कौस्तुभ यांना तेजोवृष जोशी तबलासाथ, तर चिपळूणमधील युवा कलाकार हर्षल काटदरे संवादिनीसाथ करणार आहे.

अभिषेक बोरकर

समारोपाच्या दिवशी २४ जानेवारी रोजी सरोदवादक अभिषेक बोरकर मैफिलीला सुरुवात करणार आहेत. त्यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासून गायन आणि तबलावादनाचे प्राथमिक शिक्षण घेतले. वयाच्या दहाव्या वर्षापासून वडील पं. शेखर बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सरोदचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. शासनाकडून राष्ट्रीय शिष्यवृत्ती, २०१८मध्ये अजय बक्षी स्मृती पुरस्कार, २०१९मध्ये गानसरस्वती किशोरी आमोणकर युवा पुरस्कार त्यांना मिळाला. देशभरातील मानाच्या अनेक संगीत समारोहांमध्ये त्यांनी सादरीकरण केले आहे. सरोदचा गायकी अंगाने विचार करत अनवट रागांचे सादरीकरण करणे हे अभिषेक यांच्या वादनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यांनाही तेजोवृष जोशी तबलासाथ करतील.

सावनी शेंडे

महोत्सवाचा समारोप सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका सावनी शेंडे करतील,. संगीत नाटकांमध्ये अभिनयाचा आणि गायनाचा ठसा उमटवणाऱ्या कुसुम शेंडे या सावनी यांच्या आजी, तर वडील डॉ. संजीव शेंडे विदुषी शोभा गुर्टू यांचे शिष्य. अशा संगीतमय वातावरणात वाढलेल्या सावनी यांनी शास्त्रीय संगीतामध्ये स्वतःला सिद्ध केले आहे. दिल्लीत झालेल्या पं. विष्णु दिगंबर पलुसकर जयंतीमध्ये वयाच्या तेराव्या वर्षी झळकलेल्या सावनी आज जगभरात शास्त्रीय संगीताचे नाव उज्ज्वल करत आहेत. स्पष्ट शब्दोच्चार, तालावर आणि लयीवर असणारी हुकमत यामुळे सावनी यांचे गाणे ऐकणे हा एक स्वर्गीय अनुभव असतो. अरुण गवईंची तबलासाथ आणि राहुल गोळेंची संवादिनीसाथ यांच्या जोडीने होणारा महोत्सवाचा समारोप निश्चितच संस्मरणीय असेल.

गेल्या संपूर्ण वर्षात करोनामुळे कोणताही कार्यक्रम होऊ शकला नाही; मात्र ‘न्यू नॉर्मल’ची सुरुवात झाल्यापासून भव्य असा पहिलाच कार्यक्रम या महोत्सवाच्या रूपाने रत्नागिरीत होत आहे. करोनाच्या संदर्भाने आवश्यक ती सर्व प्रकारची काळजी घेऊन रसिकांची बैठकव्यवस्था केली जाणार आहे. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव महाराष्ट्र शासन, पुरातत्त्व खाते आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यामुळे साध्य होत आहे, असे आर्ट सर्कलने सांगितले आहे.

(गेल्या वर्षीच्या महोत्सवाची झलक दर्शविणारे छोटे व्हिडिओ)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply