सिंधुदुर्गातील गावागावांमध्ये बीएसएनएलची जलद इंटरनेट सेवा

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३६१ ग्रामपंचायतींसह दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी बीएसएनएलच्या माध्यमातून जलद इंटरनेट सेवा पुरविणारे हॉटस्पॉट बसवले जाणार आहेत. तेथून २०० मीटर अंतर परिसरात इंटरनेटची सुविधा ग्राहकांना मिळेल, अशी माहिती बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी येथे दिली.

अलीकडे सर्वच कामकाज ऑनलाइनने झाले असून इंटरनेट कनेक्टिव्हिटी अत्यावश्यक ठरली आहे. कोकणातही वेगवान इंटरनेट सेवा उपलब्ध व्हावी, विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांचे काम इंटरनेटविना अडू नये, तसेच रात्री-अपरात्री फोनअभावी आरोग्य सेवेपासून कोणी वंचित राहू नये, यासाठी भाजप नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जिओचे टॉवर उभारण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे ४० ठिकाणी टॉवर उभारण्यासाठी त्यांनी जिओ कंपनीशी पत्रव्यवहार केला आहे.

दोन्ही जिल्हयांतील भौगोलिक परिस्थिती पाहता आणि सध्याच्या अत्याधुनिक युगात मोबाइल आणि इंटरनेटचा दैनंदिन कामकाजात अत्यावश्यक झालेला वापर लक्षात घेता त्यांचा अभाव जाणवतो. बीएसएनएल ही शासकीय दूरसंचार यंत्रणा पुरेशी ठरत नसल्याचा अनुभव येतो. मात्र आता त्यात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजप आमदार नीतेश राणे यांनी आज कणकवली येथे केंद्र सरकारच्या ‘भारत नेट’ तसेच जिल्ह्यातील इंटरनेट सेवेचा आढावा घेतला. त्यात भारत नेटचे लोकेश श्रीवास्तव आणि बीएसएनएलचे सुभाष कांबळे यांनी जिल्ह्यातील इंटरनेट सुविधांबाबतची माहिती दिली. जिल्ह्यात बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये बीएसएनएलने ओएफसी लाइन टाकून तेथे ब्रॉडबँड सेवा कार्यान्वित केली आहे. आता या इंटरनेट सेवेची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी आपले सरकार सेवा केंद्राकडे देण्यात आल्याची माहिती भारत नेटचे लोकेश श्रीवास्तव यांनी दिली.

दरम्यान, बीबीएनएल आणि सीएससी (आपले सरकार सेवा केंद्र) यांच्या भारत नेट कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या एकूण ३६१ ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडण्यात आल्या आहेत. त्यापैकी २९७ ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा कार्यान्वित झालेली आहेत. ही इंटरनेट सेवा ज्या ग्रामपंचायतींमध्ये सीएससीमार्फत कार्यान्वित आहे, त्या ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा सुरू झालेल्या दिवसापासून पुढील एक वर्ष पूर्णपणे मोफत असेल. उर्वरित ग्रामपंचायतींचे काम प्रगतिपथावर आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत क्षेत्रातील इतर पाच सरकारी आस्थापनांमध्येही इंटरनेटची जोडणी या प्रकल्पाअंतर्गत केली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीएसएनएलची इंटरनेट सेवा जलद गतीने आणि सुलभपणे उपलब्ध व्हायला त्यामुळे मदत होणार आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply