‘घुंगुरकाठी’ संस्थेचे कार्य प्रेरणादायी; स्वयंसेवी संस्थांचे जाळे ही आजची गरज : अरुण दाभोलकर

आडाळी (दोडामार्ग) : ‘‘घुंगुरकाठी’ या स्वयंसेवी संस्थेचे कार्य प्रेरणादायी असून, त्याच्या अनुकरणाची गरज आहे. केवळ शासनावर अवलंबून न राहता स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातूनही गावांचा विकास साधता येतो. विविध उपक्रमांमधून गावाला एकत्र आणणाऱ्या अशा सेवाभावी संस्थांचे जाळे निर्माण होण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन जागतिक कीर्तीचे चित्रकार अरुण दाभोलकर यांनी आडाळी (ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) येथे केले.

आडाळी येथील ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ या सेवाभावी संस्थेच्या पहिल्या वर्धापनदिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत, उपाध्यक्षा डॉ. सई लळीत, सहसचिव गौरीश काजरेकर उपस्थित होते. या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील २१ मान्यवरांचा शाल, श्रीफळ, भगवद्गीता, ‘चित्रकथी’ शैलीतील गणपतीची प्रतिमा देऊन श्री. दाभोलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी श्री. दाभोलकर यांच्या हस्ते संस्थेच्या पहिल्या कार्यअहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ संस्थेच्या पहिल्या कार्य अहवालाचे प्रकाशन अरुण दाभोलकर यांच्या हस्ते झाले.

‘घुंगुरकाठी’ संस्थेच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करुन श्री. दाभोलकर म्हणाले, ‘मी कलाकार आहे. मी निसर्गात, आकाशात, जळीस्थळी सौंदर्य शोधत असतो आणि ते कुंचला, ब्रशच्या मदतीने कॅनव्हासवर उतरवतो. मला शब्दांतून नाद ऐकू येतात. जेव्हा ‘घुंगुरकाठी’ हा शब्द माझ्या कानावर पडला, तेव्हा या शब्दातील नादाने मी त्याकडे आकर्षित झालो. या संस्थेच्या स्थापनेमागची भूमिका आणि त्यार दिशेने सुरू असलेले कार्य हे अगदी आदर्श आहे. निसर्गाचा, पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास थांबवला पाहिजे. खेड्यांमध्ये जो पारंपरिकपणा आहे, तोही जपला गेला पाहिजे. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर न थांबता श्री. लळीत यांनी काम सुरू केले आहे, ते मूलभूत स्वरूपाचे व आवश्यक आहे. या कामात त्यांच्या पत्नी डॉ. सई लळीत यांचा सहभागही मोलाचा आहे.’

श्री. दाभोलकर म्हणाले, ‘आपण ज्या समाजात राहतो, वावरतो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो, ही भावना असली पाहिजे. मी कलाकार असलो, तरी मी कला आणि व्यवसाय यांचा मेळ घातला आहे. परंतु, ‘घुंगुरकाठी’ हा उपक्रम पाहून मलाही अशाच प्रकारचे कलेच्या संदर्भातील काम सुरू केले पाहिजे, असे इथे आल्यावर तीव्रतेने वाटू लागले आहे. जिल्ह्यातील कलावंत, चित्रकार यांचे ब्रँडिंग करणे, त्यांना एखादे व्यासपीठ तयार करून देणे, त्यांच्या कलावस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे अशा स्वरूपाचे काम करण्यासाठी अशीच एखादी संस्था सुरू करण्याचा माझा यापुढे प्रयत्न असणार आहे. माझ्या पुढील आयुष्याला एक नवे वळण, नवा अर्थ देणारी ही भावना एका अर्थाने ‘घुंगुरकाठी’चे यश आहे.’

संस्थेचे अध्यक्ष व संस्थापकीय मुख्य विश्वस्त सतीश लळीत यांनी स्थापनेपासून गेल्या’ वर्षभरात केलेल्या कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले, ‘विज्ञान, तंत्रज्ञान, दूरसंचार, माध्यमे आदी सर्व क्षेत्रात प्रचंड वेगाने प्रगती सुरू आहे. पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. जीवनशैली सुखवस्तू होत चालली आहे; मात्र हे सर्व होत असताना दोन मोठे दुष्परिणाम होताना पाहायला मिळत आहेत. अतिरेकी हव्यास आणि विकासाच्या चुकीच्या कल्पना यामुळे निसर्ग आणि पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. याचबरोबर माणूस माणसापासून दूर होत चालला आहे. सर्व सुबत्ता असूनही मानसिक विकार, एकाकीपणा, नैराश्य याच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली आहे. हे सर्व टाळून निकोप समाजासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक झाले आहे. ‘घुंगुरकाठी’ संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळी कामे करताना लोकांना एकत्र आणणे, हासुद्धा एक उद्देश आहे.’

‘समाजात वावरत असताना आपण समाजाचे काही देणे लागतो, हे सतत ध्यानात ठेवायला हवे,’ असे सांगून श्री. लळीत म्हणाले, ‘याच भूमिकेतून या वर्धापनदिन सोहळ्यात समाजाच्या विविध घटकांतील सामाजिक योगदान असलेल्या २१ व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये माजी सैनिक, निमलष्करी कर्मचारी, शिक्षक, ज्येष्ठी नागरिक, मूर्तिकार, नाट्यअभिनेता, पत्रकार, साहित्यिक, उद्योजक, समाजसेवक, अंगणवाडी सेविका, आशाताई, व्यावसायिक अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींची निवड करण्यात आली. यापैकी अनेकांनी आपल्या सत्काराची कधीही अपेक्षा केली नव्हती; मात्र ज्येष्ठांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि धडपड करून पुढे येणाऱ्या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी या सत्कारांचे आयोजन करण्यात आले.’

संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. सई लळीत यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, ‘संस्थेची स्थापना गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात झाली; मात्र त्यानंतर दोन अडीच महिन्यात करोना विषाणूच्या साथीमुळे संस्थेच्या कामावर बंधने आली. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने मोठ्या जोमाने काम करण्याचा संस्थेचा मानस आहे. विशेषत: पर्यावरण व निसर्गाच्या हानीविरुद्ध जनजागृती, जलसाक्षरता, आरोग्य या क्षेत्रात संस्था काही उपक्रम हाती घेणार आहे.’

हे सर्व उपक्रम जनतेसाठी असल्याने केवळ बघ्याची भूमिका न घेता सर्वांनी संस्थेच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

ज्येष्ठ चित्रकार अरुण दाभोलकर यांच्या हस्ते माजी सैनिक मंगेश गावकर यांच्यासह २१ जणांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात श्री. दाभोलकर यांच्या हस्ते मंगेश गावकर (लष्करी सेवा), शांताराम गावकर (शैक्षणिक सेवा), सगुण उर्फ बाबी गावकर (ज्येष्ठ नागरिक), लक्ष्मण तथा बाबल गावकर (समाजसेवा), भगवान गावकर (नाट्यअभिनेता, दिग्दर्शक), जयप्रकाश गावकर (समाजसेवा), पराग गावकर (पत्रकारिता, साहित्य), प्रवीण गावकर (उद्योजक), शरद पांचाळ (समाजसेवा), मंगेश परब (लष्करी सेवा), विष्णु गावकर (नौदल सेवा), संतोष गावकर (लष्करी सेवा), लक्ष्मण परब (लष्करी सेवा), राजन जंगले (निमलष्करी सेवा), चंद्रकांत सावंत (मूर्तिकार), सोनू साबाजी कदम (निमलष्करी सेवा), फ्रान्सिस उर्फ सायार फर्नांडिस (व्यावसायिक), मिताली मेस्त्री (आशाताई), ममता निळकंठ गावकर (अंगणवाडी ताई), ममता उदय सावंत (अंगणवाडी ताई), मुशाहिद रझा खान (‘घुंगुरकाठी भवन’ वास्तुरचनाकार) यांना सन्मानित करण्यात आले. शांताराम गावकर, भगवान गावकर यांनी सत्काराला उत्तर दिले.

अरुण दाभोलकर यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांच्या हस्ते करण्यात आला.

मुख्य सोहळ्यानंतर ‘ठाकर आदिवासी लोककला आंगण, पिंगुळी’ प्रस्तुत कळसूत्री बाहुल्यांचा कार्यक्रम (आख्यान : सीतास्वयंवर) श्री. परशुराम गंगावणे, चेतन गंगावणे आणि मंडळी यांनी सादर केला. या बहारदार कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळच्या सत्रात कुडाळ येथील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. योगेश नवांगुळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आडाळी शाळेच्या सभागृहात मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ. सई लळीत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पराग गावकर, प्रवीण गावकर, राजन गावकर, संदीप उत्तम गावकर यांनी सहकार्य केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply