राज्यातील सत्ताधाऱ्यांना सत्तेची मस्ती – नीलेश राणे

रत्नागिरी : राज्यातील सत्ताधाऱ्यांना मस्ती आली आहे. डॉ. आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांची स्मारक अजून होत नाहीत. जनतेलाही हे आता समजले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या बळावर सर्वांनी एकत्र येऊन भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष बनवू, असा निर्धार भाजपचे नवनियुक्त प्रदेश चिटणीस माजी खासदार नीलेश राणे यांनी आज येथे व्यक्त केला.

रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या भागोजीशेठ कीर सभागृहात श्री. राणे यांचा नव्या नियुक्तीबद्दल सत्कार आणि भाजपच्या कमल सन्मान वितरणाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री. राणे बोलत होते. ते पुढे म्हणाले, मी आजच्या सत्काराने भारावलो आहे. या कार्यक्रमातील गर्दी पाहून राणेंनी माणसे कमावली हेच दिसून येत आहे. आपले कार्यकर्ते छातीचा कोट करून कुटुंबासारखे कायम पाठीशी आहेत. त्यामुळे कार्यकर्ताच महत्त्वाचा आहे. राणे संपले असे म्हणणारे बरेच आहेत. राणे हे अनेकांचे सॉफ्ट टार्गेट आहेत. कारण निवडणुकीत राणेंचा पराभव करता आला तरी राणेंवर विजय मिळवला आला नाही. भलेभले राणेंना संपवू शकले नाहीत. पराभव झाले, तरीही राणे अजून उभे आहेत. तीन दिवसांच्या सरकारच्या स्थापनेवेळी अजित पवार काय मॉर्निंग वॉकला आले होते का, शपथ घ्यायला आले होते. पण तेच भाजपवर टीका करतात. देवेंद्र फडणवीस यांनी तोंड उघडले ना, तर अजित पवार बारामतीमध्येसुद्धा राहू शकणार नाहीत. माझ्या पक्षावर मी टीका सहन करणार नाही. शारजिल उस्मानी हिंदू समाजाबद्दल बोलला तर आम्ही उत्तर देणारच. त्याच्यावर साधा गुन्हा दाखल झाला आहे. राग आला पाहिजे आणि अशा लोकांना आडवे गेले पाहिजे. मुंबईच्या महापौरांनी केटरिंगचे कंत्राट मुलाला दिले, मास्क, सॅनिटायझरचे कंत्राट चित्रपट अभिनेत्यांना दिले.

सत्कारासाठी झालेल्या गर्दीला उद्देशून श्री. राणे म्हणाले, नुसती गर्दी करून उपयोग नाही, अभ्यास पाहिजे. अभ्यासातून आक्रमकता येईल, असे खासदार राणे यांनी मला सांगितले आहे. मला नेतेपद कळले नाही, पण मी कार्यकर्ताच आहे आणि मरेपर्यंत कार्यकर्ताच राहीन. कार्यकर्ताच पक्ष वाढतो.

शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले, कोकणात उद्धव ठाकरेंमुळे नव्हे तर बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच मते मिळतात. सिंधुदुर्गात गेल्या २६ जानेवरीला ३०० उपोषणे होती. पण खासदार राऊत तिकडे फिरकले नाहीत. पालकमंत्री उदय सामंतही तिकडे आलेच नाहीत. अलीकडेच रत्नागिरीत झालेल्या पर्यटन परिषदेत त्यांनी सांगितले की पर्यटन वाढले की मला आनंद होईल. मग गेली १५ वर्षे तुम्ही काय केले?

दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजप अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन म्हणाले, भारतीय जनता पक्षाला रत्नागिरी जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष बनवायचे आहे. माजी खासदार नीलेश राणे यांना सचिवपदी मिळालेल्या बढतीमुळे रत्नागिरीचे राजकीय बळ व संघटनात्मक बळ वाढले आहे. त्यांच्यासारखा सबळ, प्रखर नेतृत्व आणि खंबीर पालक मिळाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विजयाचा संकल्प नक्कीच पूर्ण करू. ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वीच्या पाचपट म्हणजे २९७ सदस्य निवडून आले आहेत. सरचिटणीस राजेश सावंत म्हणाले, नीलेश राणे यांनी खासदारांना अपेक्षित काम केले. हिंदी व इंग्रजीवर प्रभुत्व असल्याने ते अधिवेशनात प्रश्नण मांडत होते. पण विद्यमान खासदार काय बोलतात ते लोकांनाच कळत नाही. नीलेश राणे खासदार नसले तरीही लोकांच्या हिताची कामे करत आहेत. असेच यश मिळवायचे असेल तर सर्व कार्यकर्त्यांना अहोरात्र प्रयत्न करावे लागतील. रत्नागिरीत रोजगाराची मोठी समस्या आहे. कमी पगारात युवक काम करत आहेत. त्यासाठी पक्षाने ठाम भूमिका घेतली पाहिजे.

शिवसेनेचे दाखवायचे दात वेगळे आहेत. सेनेने कोकणच्या तीन-तीन पिढ्या बाद केल्या आहेत. करोना काळात मुंबईतून परत आलेले अनेकजण आज बेरोजगार आहेत. शिवसेनेने कोकणात आलेल्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध केला. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. कार्यकर्ता आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तर शिवसेनेचे काम कोणी करणार नाही, या विचारातून शिवसेनेने प्रकल्पांना विरोध केला. परंतु सुरू असलेल्या प्रकल्पाने यांच्या नेत्यांची झोळी भरली, अशी टीका राजन देसाई यांनी केली. कोकणात विकास फक्त राणे यांच्यामुळेच झाला. राणे हेच कोकणचे खरे नेते आहेत. सत्ताधार्यां ना ठणकावून सांगण्याची धमक नीलेश राणे यांच्याकडे आहे. त्यामुळे मी या कार्यक्रमाला आलो, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोकणातील अन्यायावर कोणीही लोकप्रतिनिधी बोलत नाहीत, हे दुर्दैव आहे. कोकणचे लोक पर्याय शोधत आहेत. नीलेश राणे हे नक्कीच पुन्हा खासदार होतील, असा दावासुद्धा त्यांनी केला.

माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने म्हणाले की, एकविसाव्या शतकातील २०२१ हे वर्ष आशादायी आणि भाजपच्या दृष्टीने चांगले आहे. अनेक चांगले निर्णय होत आहेत. चौदा वर्षांचा वनवास संपून भाजपचे सरकार आले. येत्या २०२४ पर्यंत पार्लमेंट ते पंचायत हे भाजपचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व खासदार राणे यांच्या नेतृत्वाखाली कोकणला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवायचे आहे. कोकणात भाजप नंबर एकचा पक्ष करायचा आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी मनपरिवर्तन केले पाहिजे, दीपक पटवर्धन व नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणुकीत ३०० सदस्य निवडून आले. खासदार नारायण राणे यांनी पक्षभेद विसरून काम केले, मदत केली, त्यांचे अस्तित्व दीपस्तंभाप्रमाणे आहे. पूर्ण वेळ देणारा लढवय्या नेता आपल्याला नीलेश राणे यांच्या रूपाने मिळाला आहे.

प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. बाबासाहेब परुळेकर म्हणाले, आज बऱ्याच वर्षांनी भाजपचे पुन्हा चांगले दिवस पुन्हा आले आहेत. नीलेश राणे पुन्हा खासदार होणार आहेत. प्रदेशाने त्यांना सचिवपद दिले आहे. रत्नागिरीत १७ लाखाच्या जमिनीचे एक कोटी २७ लाख झाले, याला रत्नागिरीतील भाजपच्या नगरसेवकांनी विरोध दर्शविला. आता राणेंच्या रूपाने आक्रमक नेतृत्व भाजपला लाभले आहे. मैत्रीचे नाव घेऊन काही जणांनी फसवणूक केली. महाराष्ट्रात शेतकऱ्यांना भेटायला न जाणारे नेते दिल्लीत शेतकऱ्यांना भेटून फोटो काढतात, अशी टीका केली.

कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ऐश्व र्या जठार, तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, मुन्ना चवंडे, प्रमोद अधटराव, यशवंत वाकडे, रवींद्र नागरेकर, राजन देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. उमेश कुलकर्णी यांनी आभार मानले.

कार्यक्रमात कमल सन्मान देऊन गौरविलेल्या व्यक्ती आणि संस्था अशा – डॉ. अजय मयेकर, डॉ. मनोज मणचेकर, डॉ. अभिजित खानविलकर, डॉ. कीर्तिकुमार पिलणकर, सौ. ममता नलावडे, प्रसाद वाघधरे, योगेश सरपोतदार, सुनील भोंगले, गणेश धुरी, राजेश कळंबटे, मेहेक हुनेरकर, सौ. नेहा जोशी, सलोनी डांगे, श्रीधर कीर, माई जमादार, भगवानबुवा लोकरे, डॉ. मिलिंद सावंत, ऋचा ताम्हणकर आणि सिद्धेश करंगुटकर. संस्था- ओम साई मित्रमंडळ, राजरत्न प्रतिष्ठान, श्रीरंग नाट्यसंस्था, संकल्प युनिक फाउंडेशन आणि विनंती महिला गृहोद्योग.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply