दर्पणकारांच्या पत्रकारितेचा वारसा जतन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, २० फेब्रुवारी रोजी त्यांना विनम्र अभिवादन केले. ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दिलेला पत्रकारितेचा वसा आणि वारसा प्रय़त्नपूर्वक जतन करू या’, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राज्य अतिथिगृहात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक `दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव महाराष्ट्र शासनाने राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांच्या शासकीय अभिवादन यादीत नव्याने समाविष्ट केले आहे. त्यानुसार आज, २० फेब्रुवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या २०९ व्या जयंतीदिनी शासकीय कार्यालयांमध्ये बाळशास्त्रींना अभिवादन करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आज प्रथमच शासकीय स्तरावर बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी अभिवादन संदेशात म्हटले आहे की, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा अनेक विषयांचा अभ्यास होता. या विषयांतील ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी त्यांनी प्रयत्नपूर्वक दर्पण हे नियतकालिक सुरू केले. आचार्यांनी व्यासंगी आणि अभ्यासू पत्रकारितेचा वसा आणि वारसा दिला आहे. त्यातूनच पत्रकारितेत लोकहितासाठी संघर्ष आणि चळवळींना बळ देणारी मूल्ये रुजली. पुढे मराठी पत्रकारितेने स्वातंत्र्य संग्रामातही ठाम आणि चोख भूमिका बजावली आहे. पत्रकारितेमध्ये आधुनिकतेसह विविध प्रवाह आले आहेत. त्यामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दिलेला वारसा प्रय़त्नपूर्वक जतन करण्याची गरज आहे.

उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन

‘दर्पण’कार आचार्य बाळशात्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ वृत्तपत्राची सुरुवात करून मराठी पत्रकारितेचा पाय रचला. मराठी पत्रकारितेला निर्भिड, निष्पक्ष, लोकाभिमुखतेचा वारसा दिला. लोकशिक्षण, ज्ञानप्रसाराच्या उद्देशाने पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान प्रेरणादायी, मार्गदर्शक आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाळशास्त्री जांभेकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. ते म्हणाले की, आचार्य जांभेकरांनी ‘दर्पण’ वृत्तपत्रातून समाज घडविण्याचे कार्य केले. तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध केला. वृत्तपत्र हे समाजप्रबोधनाचे, राष्ट्र घडविण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी दाखवून दिले. पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि कार्य मार्गदर्शक आहे. त्यांनी दिलेली शिकवण अंगीकारणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी नमूद केले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply