उंचसखल गावाला समान दाबाने पाणीपुरवठा करणारी देशातील पहिली यंत्रणा

पालघर (नीता चौरे) : उंचसखल असलेल्या संपूर्ण गावाला सारख्याच दाबाने पाणीपुरवठा करण्याची देशातील पहिली यंत्रणा पालघर जिल्ह्यात साकारली आहे. कमी खर्चात उभारण्यात आलेली ही यंत्रणा उंचसखल भागात वसलेल्या कोकणातील अनेक गावांना उपयुक्त ठरणार आहे.

मुंबई आयआयटीच्या शहरी विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे प्रा. प्रदीप काळबर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी ही यंत्रणा विकसित केली आहे. प्रा. काळबर यांचे पाणीपुरवठा या विषयावर संशोधन सुरू असून त्या संशोधनाअंतर्गत हा प्रकल्प पालघर जिल्ह्यातील नंदाडे आणि चाफानगर (ता. सफाळे) या दोन पाड्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर नुकताच करण्यात आला आहे.

भारतभरात, महारष्ट्रात आणि प्रामुख्याने कोकणात अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा ही खूप मोठी समस्या झाली आहे. योग्य पद्धतीने, सारख्याच दाबाने सर्वांना पाणीपुरवठा होत नाही. रत्नागिरीसारख्या डोंगरउतारावर वसलेल्या शहरात पाणीपुरवठा सारख्या दाबाने सर्वत्र होत नसल्याच्या अनेक तक्रारी असतात. त्यामुळे पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धतींमध्ये काय बदल केले पाहिजेत, यावर गेल्या तीन वर्षांपासून मुंबई आयआयटी संशोधन करत आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने जुन्या पद्धतीमध्ये काही बदल केले आहेत. पालघर जिल्ह्यातील सफाळे तालुक्यातील उंबरपाडा गावात २०१८ पासून मुंबई आयआयटीच्या शहरी विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे प्रा. प्रदीप काळबर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाणीपुरवठ्याच्या समस्येचे सर्वेक्षण केले. त्यावेळी त्यांना आढळून आले की, पाण्याच्या साठवण टाक्यांमध्ये पुरेशा दाबाने पाणी पोहोचत नसणे आणि पाण्याच्या टाक्यांना लागलेली गळती हे पाणीपुरवठा योजनेतील महत्त्वाचे प्रश्न आहेत.

उंबरपाडा गावाला करवाळे धरणातून तीन जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. जलवहिनीच्या शेवटच्या टोकांना असणाऱ्या, उंच आणि डोंगरी भागातील घरांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. तसेच गावात बांधण्यात आलेल्या छोट्या छोट्या टाक्या वर्षानुवर्षे विनावापर पडून आहेत. त्यासाठी केलेला खर्चही वाया जातो. सध्या प्रत्येक ठिकाणी पाणीपुरवठ्यासाठी मोठमोठ्या टाक्या बांधल्या जातात. त्या टाक्या भरल्या जात नाहीत, टाक्यांमधून पाणी वेगाने निघून जाते. बऱ्याच ठिकाणी टाक्या बायपास केल्या जातात आणि या टाक्यांमध्ये एकच विसर्ग (आउटलेट) असतो. त्यामुळे समान दाबाने सगळीकडे पाणी पोहोचवणे खूप अवघड होऊन जाते.
या समस्येवरचा उपाय म्हणून मुंबई आणि मद्रास आयआयटीने मिळून एक लो कॉस्ट अल्टरनेटिव्ह सिस्टीम विकसित केली आहे. शाफ़्ट विथ मल्टीपल आउटलेट्स ही त्याची पहिली पद्धत आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी उंबरपाडा गावातील नंदाडे आणि चाफानगर या दोन पाड्यांची निवड करण्यात आली. तेथे या मोठमोठ्या टाक्यांच्या जागी एकच शाफ्ट (उभी उंच वाहिनी, पाइप) बसवण्यात आला आहे. त्याला तीन विसर्ग देण्यात आले. त्यामुळे आता या प्रकल्पामुळे इथल्या लोकांना सारख्याच दाबाने पाणीपुरवठा होत आहे. तसेच त्यांचा वर्षानुवर्षांचा पाणी प्रश्न सुटला आहे.

ठिकठिकाणी मोठमोठ्या टाक्या बांधण्यासाठी सुमारे १० ते २० लाख रुपयांचा खर्च येतो. मात्र हे शाफ्ट विथ मल्टिपल आउटलेट्स सिस्टीम तयार करण्यासाठी केवळ दोन लाखाचा खर्च आला आहे. महत्त्वाचे म्हणजे स्थानिक लोकांकडून या शाफ्टच्या फॅब्रिकेशनचे आणि उभारणीचे काम करून घेण्यात आले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा प्रकल्प गाव पातळीवर आत्मनिर्भर झाला आहे.

ठिकठिकाणी मोठमोठ्या खर्चीक टाक्या उभारण्याची गरज नाही. उलट कमी खर्चीक शाफ्ट देशभरात सहजतेने उभारले जाऊ शकतात, जेणेकरून शासनाचा पाणी प्रकल्पांवर होणारा मोठा खर्चही वाचू शकतो. शिवाय पाणीपुरवठा योग्य दाबाने होऊ शकतो. उंचसखल भागात वसलेल्या कोकणातील अनेक गावांसाठी ही व्यवस्था आदर्श आणि उपयुक्त ठरू शकेल.

या गावातील इतर भागांमध्ये यासारखेच मेनीफोल्ड आणि मास्टरपीससारखे तंत्रज्ञान वापरून त्याची अंमलबजावणी करण्याचे काम मुंबई आयआयटीच्या शहरी विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाच्या पथकाकडून करण्यात येणार आहे. तसेच सांडपाणी व्यवस्थापनासाठी हायब्रिड ट्रीटमेंट सिस्टीमदेखील कार्यान्वित करण्यात येणार आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply