रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आज करोनामुक्तांपेक्षा बाधितांची संख्या अधिक झाली आहे. जिल्ह्यात आज (१९ मार्च) करोनाचे नवे २० रुग्ण आढळले, तर १९ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एका मृत्यूची नोंद झाली. सिंधुदुर्गात नवे २३ रुग्ण आढळले, तर २० जण बरे होऊन घरी गेले.
रत्नागिरी जिल्ह्यातील स्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ८, खेड ३, चिपळूण ४, लांजा १ (एकूण १६). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी आणि खेड प्रत्येकी १, दापोली २.(दोन्ही मिळून २०). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १० हजार ३१८ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ६५० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत ९० हजार ८२५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १२६ आहे. त्यातील सर्वाधिक ४० रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून ५५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज १९ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या नऊ हजार ७९१ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९४.८९ टक्के आहे.
आज एका मृत्यूची नोंद झाली. चिपळूणमधील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू गेल्या १४ मार्च रोजी झाला होता. त्याची नोंद आज झाली. त्यामुळे मृतांची संख्या ३७१ झाली असून मृत्युदर ३.५९ टक्के आहे.
विनामास्क फिरणाऱ्यांना आता ५०० रुपयांऐवजी ३०० रुपये दंड
रत्नागिरी जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्यांकडून आता ५०० ऐवजी ३०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी तसेच कामाच्या ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक आहे. चेहऱ्यावर मास्कचा वापर केला नसल्याचे दिसून आल्यास अशा व्यक्तींकडून ५०० रुपये दंड आकारण्याबाबत आदेश याआधी देण्यात आला होता. त्याऐवजी आता मास्क वापर केला नाही, तर अशा व्यक्तींकडून ३०० रुपये दंड आकारला जाईल, असा सुधारित आदेश देण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थिती
सिंधुदुर्गात आज (१९ मार्च) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार आज २० जण करोनामुक्त झाल्याने घरी गेले. त्यामुळे आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ६ हजार ३०४ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज नवे २३ रुग्ण आढळले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६ हजार ६७५ झाली आहे. करोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १७९ असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
Follow Kokan Media on Social Media

