रत्नागिरी : मराठी रंगभूमीला अजरामर संहिता देणारे, १९८० च्या दशकात मराठी रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ नाटककार कै. प्र. ल. मयेकर यांच्या ७५ व्या जन्मदिनी त्यांच्या रंगभूमीवरील ऐतिहासिक कार्याला उजाळा मिळणार आहे. रत्नागिरीच्या समर्थ रंगभूमीने कै. प्र. ल. मयेकर यांच्या नाट्यविषयक कारकिर्दीवर तयार केलेला माहितीपट येत्या रविवारी, (दि. ४ एप्रिल) सकाळी १० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
अग्निपंख, दीपस्तंभ, रातराणी, गंध निशिगंधाचा, पांडगो इलो रे बा इलो, अथ मनुस जगन हं, तक्षकयाग, डॅडी आय लव्ह यू, काळोखाच्या सावल्या अशी रंगभूमी गाजवणारी नाटके, पुत्रवती, जोडीदारसारखे सुपरहिट चित्रपट, रक्तप्रपात, रोपट्रिक, अतिथी, आय कन्फेस अशा एकांकिकांचा अजरामर ठेवा मराठी रंगभूमीला देऊन नाटककार प्र. ल. मयेकर यांनी रंगभूमी समृद्ध केली. त्यांचा जन्म ४ एप्रिल १९४६ रोजी आडिवरे (ता. राजापूर) येथील कोंभेवाडीत झाला. त्यांच्या पंचाहत्तराव्या जयंतीच्या निमित्ताने ४ एप्रिल रोजी १९८० च्या दशकातील मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळाला उजाळा मिळणार आहे. समर्थ रंगभूमी निर्मित प्र.ल. हा माहितीपट सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणार आहे.
माहितीपटाची संकल्पना आणि लेखन दुर्गेश आखाडे यांचे असून निवेदन अभिनेता अविनाश नारकर, प्रमोद पवार आणि अभिनेत्री मयूरा जोशी यांनी केले आहे. संकलन धीरज पार्सेकर, ध्वनिमुद्रण उदयराज सावंत, पार्श्वसंगीत योगेश मांडवकर यांचे, तर माहितीपटाचे दिग्दर्शन श्रीकांत पाटील आणि दुर्गेश आखाडे यांचे आहे. देवीलाल इंगळे यांचे निर्मितीसहाय्य लाभले आहे. या माहितीपटातून रसिक प्रेक्षकांना प्र. ल. मयेकर भेटतातच. पण त्याचबरोबर त्यांच्यासोबत काम करणारे दिग्गज आपले अनुभव आणि किस्से सांगतात. त्यातूनच मराठी रंगभूमीवरचा प्रलमय प्रवास अधिक उलगडतो.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
