राज्यात १४ एप्रिलपासून १ मेपर्यंत कडक संचारबंदी

मुंबई : करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात संचारबंदी लागू होणार की नाही, याबाबतच्या गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्णविराम दिला आहे. करोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा त्यांनी आज (ता. १३) रात्री केली. उद्या, बुधवार, १४ एप्रिल रोजी रात्री आठ वाजल्यापासून १ मेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत.

या काळात संपूर्ण संचारबंदी लागू राहील. केवळ आवश्यक सेवासुविधा सुरू राहतील. यासंदर्भातील ब्रेक द चेनचे नवे आदेश आज प्रसिद्ध करण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात मार्च २०२१ पासून कोविड-१९ ची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी करण्याची गरज म्हणून कडक टाळेबंदी लागू करण्यात येत आहे. पण या काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य आणि आर्थिक साह्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना संकटाचा मुकाबला करताना शासन गरजूंच्या पाठीशी उभे आहे. याकाळात कुणाचीही आबाळ होऊ देणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

सर्व दुर्बल घटकांना दिलासा
आर्थिक दुर्बल घटकांमधील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे, महिला, वयोवृद्ध नागरिक, विधवा, दिव्यांग, असंघटित क्षेत्रातील नागरिक, कामगार, रिक्षाचालक आणि आदिवासी समाज यांना विचारात घेऊन आर्थिक साह्य देण्यात येणार आहे. यासाठी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, उद्योग-ऊर्जा आणि कामगार विभाग, नगर विकास विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अर्थसाह्य देण्यात येणार आहे.

एक महिना मोफत अन्नधान्य
अन्न सुरक्षा योजना लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून राज्यातील सुमारे सात कोटी लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्यात येईल.

शिवभोजन थाळी मोफत
राज्यात शिवभोजन योजनेतून गरजूंना एक महिना शिवभोजन थाळी मोफत देण्यात येतील. सुमारे दोन लाख थाळ्या देण्याचे नियोजन आहे.

निवृत्तीवेतन योजना लाभार्थींना आर्थिक सहाय्य
या विभागाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना अशा पाच योजनेतील सुमारे ३५ लाख लाभार्थ्यांना दोन महिन्यांकरिता प्रत्येकी एक हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य आगाऊ देण्यात येईल.


बांधकाम कामगारांना अनुदान
नोंदणीकृत बांधकाम कामगार कल्याण योजनेअंतर्गत महाराष्ट्र इमारत आणि इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीमधून राज्यातील नोंदणीकृत सुमारे १२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अनुदान देण्यात येईल. याशिवाय राज्यातील २५ लाख घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी सहाय्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.


फेरीवाल्यांना आर्थिक सहाय्य
राज्यातील सुमारे पाच लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे आर्थिक साह्य देण्यात येईल. ही रक्कम थेट फेऱीवाल्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
राज्यातील बारा लाख रिक्षाचालकांनाही प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल.


आदिवासी कुटुंबांना सहाय्य
आदिवासी विकास विभागाच्या खावटी योजनेचा लाभ घेत असलेल्या सुमारे १२ लाख आदिवासी कुटुंबांना प्रतिकुटुंब दोन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य येईल.


कोविडवरील सुविधा उभारणी
याशिवाय जिल्हास्तरावरील टाळेबंदी कालावधीतील व्यवस्थापनासाठी सुमारे ३ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून जिल्ह्यांना कोविडवरील औषधोपचार, उपकरणे, सुविधा उभारणी आणि इतर व्यवस्थेसाठी हा निधी संबंधित जिल्ह्याला देण्यात येईल.
याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य शासन आणि इतर शासकीय संस्था यांना द्यावे लागणारे कर, शुल्क आणि इतर देय रकमा एप्रिल आणि मे या दोन महिन्यांसाठी विनाव्याज भरण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply