शासनाच्या मदतीची पाच वर्षे प्रतीक्षा
तळेरे (ता. कणकवली) : गेल्या पाच वर्षांपासून पडक्या घरात राहूनही ती सर्व सण उत्साहात साजरी करते. घरात राहायला जागा नसल्याने ती रात्री घरासमोरील अंगणात झोपते. पावसाळ्यात तात्पुरता प्लास्टिकचा कागद लावून दिवस काढते. काम केले तरच दररोजचा हाताचा आणि तोंडाचा संबंध येतो. तरीही तिने आज आपल्या घरासमोर आनंदाची गुढी उभारली.

कासार्डे तर्फेवाडी येथील वैजयंती शांताराम मिराशी या साठ वर्षीय वृद्धेची ही कहाणी. ती घरात एकटीच घरात राहते. गेल्या अनेक वर्षांपासून घरबांधणीसाठी शासकीय मदत मिळावी यासाठी ती प्रयत्नशील आहे. मात्र कोणीही दाद देत नाहीत. स्वत: काम करेल त्याचवेळी दोन वेळचे जेवण मिळते, अशी परिस्थिती असताना शासकीय मदतीसाठीही तिची उपेक्षाच पदरी पडली. मातीचे आणि कौलारू घर दहा वर्षांपासून नादुरुस्त आहे. पाच वर्षांपूर्वीच ते कोसळले. त्याच घरात कशीबशी राहते. गेले वर्षभर घरात वीज नसल्याने घरासमोरील विजेच्या खांबावरील दिव्याच्या प्रकाशात जेवण करते आणि घरासमोरच घराबाहेर एकटीच झोपते. आजूबाजूला जंगल असताना ती वृद्धा धाडसाने राहत आहे.
घराच्या आजूबाजूला फारशी घरेही नाहीत. मग या पडक्या घरात पावसाळ्यात राहता कसे, असे विचारती ती म्हणाली की, पावसाळ्यात प्लास्टिकचा कागद टाकून राहते. कसेतरी दिवस काढते. जवळजवळ गेली १० वर्षे घर बांधणीसाठी मदत मिळावी म्हणून मी प्रयत्न करते. मात्र कोणीही दाद देत नाही. माझ्या आता अखेरच्या दिवसांत तरी घर बांधायला शासन मदत देईल का, असा तिचा प्रश्न आहे. या पावसाळ्यापूर्वी घरबांधणीसाठी मदत मिळावी, अशी तिची अपेक्षा आहे.
वीज नाही, तरीही बिल भरते….
मागच्या पावसाळ्यात विजेचा मीटर जळून गेला. नवीन मीटर घ्यायचा, तर पैसे भरायची तेवढी आर्थिक ताकद नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. तरीही दरमहा येणारे १४० रुपयांचे वीजबिल ती भरते. विजेचा वापर करूनही बिल न भरणाऱ्यांसाठी तर ही मोठीच चपराक आहेच, पण महावितरण कंपनीचा लोकसेवेचा किती फोल असतो, हेही दाखवून देणारा आहे. कारण नवा मीटर घ्यायचा असेल, तर पाच हजार रुपये भरावे लागतील, असे तिला महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्याकडून सांगितले गेले! वापर नसतानाही प्रामाणिकपणे वीज बिल भरणाऱ्या या ग्राहकाच्या घराकडे एकदा पाहून तरी अधिकाऱ्यांनी काही विचार करायला हवा होता.
- निकेत पावस्कर, तळेरे (कणकवली)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
One comment