चंद्रमौळी घरासमोर केलेल्या गुढीचे पूजन करताच भाग्य पालटले

तळेरे (ता. कणकवली) : कासार्डे (ता. कणकवली) येथील तर्फेवाडीतील वैजयंती मिराशी या वृद्ध महिलेच्या घराच्या दुरवस्थेबाबत कोकण मीडियासह विविध ठिकाणी वृत्त प्रसिद्ध होताच त्या महिलेकडे बुधवारी सकाळपासून मदतीचा ओघ सुरू झाला. या वृत्ताची गंभीर दखल घेऊन कासार्डे गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रत्यक्ष घराच्या कामाला सुरुवात झाली. आपल्या चंद्रमौळी घरासमोर वैजयंती मिराशी यांनी काल (१३ एप्रिल) केलेल्या गुढीचे पूजन फळाला आले आहे.

कासार्डे तर्फेवाडी येथील वैजयंती मिराशी ही वृद्ध महिला गेली पाच वर्षे अक्षरशः पडक्या घरात एकटीच राहत आहे. आपल्याला घर बांधून मिळावे, यासाठी अनेकदा संबंधित यंत्रणेकडे तने मागणी केली. मात्र शासकीय यंत्रणेच्या दिरंगाईमुळे ती घरापासून वंचितच राहिली. घरात अठराविश्व दारिद्र्य असूनही मिराशी आजी सर्व सण उत्साहात साजरी करत आहे. काल गुढीपाडव्यालाही तिने आपल्या त्या पडक्या घरासमोर गुढीची पूजा केली. त्याबाबतची बातमी प्रसिद्ध झाली आणि आज (१४ एप्रिल) एका दिवसात तिचे भाग्यच पालटले.

कासार्डे ग्रामस्थ आणि गावातील विविध संघटनांनी वैजयंती आजीला मदत करायला पुढे सरसावल्या. बुधवारी सकाळपासून अनेकांनी घटनास्थळी भेट देऊन तिला आधार दिला. तसेच तिला महिनाभर पुरेल असे तांदूळ, बटाटे, डाळ अशा जीवनावश्यक वस्तू कासार्डे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष गुरु पाताडे, विजय पाताडे, गणेश पाताडे, अनंत नकाशे यांनी दिल्या.

कासार्डे येथील साईबाबा स्पोर्ट्स क्लबने धान्य, कपडे, भांडी आणि रोख रक्कम अशी मदत केली. वैजयंती मिराशी यांनी त्या सर्वांना आशीर्वाद दिले. यावेळी साईबाबा स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष मिंगेल मन्तेरो, साईबाबा सोशल क्लबचे सल्लागार जयेश धुमाळे, नितीन लाड, प्रदीप नारकर, कासार्डे गावचे सरपंच बाळासाहेब तानवडे, जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, विद्याधर नकाशे, संजय नकाशे, गणेश पाताडे आदी मान्यवर उपस्थित होते.

महावितरण कंपनीकडून दखल

वैजयंती मिराशी यांच्या घराचा बरासचा भाग कोसळल्यामुळे गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात महावितरण कंपनीचा विजेचा मीटर जळून गेला. नवा मीटर हवा असेल, तर पाच हजार रुपये खर्च येईल, असे तिला सांगितले गेले. त्यामुळे दुरुस्ती होईल तेव्हा होऊ दे, पण तोपर्यंत कनेक्शन तोडले जाऊ नये, या उद्देशाने मिराशी आजी वीजपुरवठा होत नसतानाही दरमहा १४० रुपयांचे बिल भरत आहेत. कोकण मीडियाच्या कालच्या बातमीत
(https://kokanmedia.in/2021/04/13/gudiinfrontofcollapsedhouse/) त्याबाबतचा तपशील आणि मिराशी यांचा व्हिडीओ (https://youtu.be/1sgm6rkvOSc) प्रसिद्ध झाला. त्याची दखल महावितरण कंपनीच्या रत्नागिरी मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय वैशंपायन यांनी तातडीने घेतली. कोकण विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना त्याची माहिती दिली. संबंधित कार्यकारी अभियंत्यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नियमात बसत असेल, ते केले जाईलच. पण कर्मचाऱ्यांकडून वर्गणी काढूनही श्रीमती मिराशी यांचा वीजपुरवठा सुरू केला जाईल, असे श्री. वैशंपायन यांनी कोकण मीडियाला सांगितले. त्यानुसार कासार्डे विभागातील लाइनमन पेडणेकर यांनी आज श्रीमती मिराशी यांच्या घराची पाहणी केली. महावितरण कंपनीच्या तळेरे कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता मंदार काणकेकर यांनी घराला भेट देऊन वीज मीटर जोडणी करून विजेची समस्या दूर केली.

महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने वीजपुरवठा सुरू केला.

सर्वप्रथम संजय देसाई यांची भेट
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई यांनी वैजयंती यांच्या घर असूनही बेघर असल्याच्या अवस्थेची बातमी समजताच बुधवारी सकाळी सर्वप्रथम भेट दिली. त्यांनी मिराशी आजीला स्वतंत्र घर बांधून देण्याचा शब्द दिला. त्याचे काम शुक्रवारपासून सुरू होणार होते. मात्र तत्पूर्वीच लोकसहभागातून मिराशी आजीचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

(छायाचित्र : निकेत पावसकर, तळेरे)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply