मिराशी आजींचे घरकुल महावितरण कर्मचाऱ्यांच्या वर्गणीतून प्रकाशमान

कासार्डे (ता. कणकवली) : येथील तर्फेवाडीतील वैजयंती मिराशी या एकाकी महिलेचे वर्षभर अंधारात असलेले घर महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वर्गणी काढून प्रकाशमान केले.

कासार्डे- तर्फेवाडीत गेली काही वर्षे एकाकी जीवन व्यतीत करणाऱ्या वैजयंती मिराशी यांनी मोडक्या घरासमोर गुढी उभारल्याची आणि त्याचबरोबर त्यांच्या परिस्थितीची बातमी सर्वत्र प्रसिद्ध झाली. त्यातून अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. घरगुती साहित्य दिले, काहींनी रोख रक्कम दिली, तर काही जणांनी पुढाकार घेऊन त्या महिलेला नवे घर बांधून देण्याचा संकल्प केला आहे. तो लवकरच पूर्ण होईलच, पण गेले वर्षभर मोडक्या तरीही अंधाऱ्या घरात राहण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील दारास नाही दोऱ्या अशा अस्थेतील छोट्या घरकुलात राहणाऱ्या आजीच्या घराचे छप्पर अर्धे उडून गेले होते. त्यातच वीज मीटर जळाल्याने वीजपुरवठादेखील बंद पडला होता, असे बातमीत नमूद करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर महावितरणचे जनसंपर्क अधिकारी संजय वैशंपायन यांनी कणकवली विभागप्रमुख बाळासाहेब मोहिते यांच्याशी संपर्क साधला. स्थानिक पातळीवर मिराशी आजींच्या वीजजोडणीबद्दल काय करता येईल, याबद्दल माहिती विचारली. या अनुषंगाने तळेरे येथील शाखा अभियंता मंदार कानकेकर आणि लाइनमन जितेंद्र शिरकर आदींनी तर्फेवाडीतील मिराशी आजींच्या घराला भेट देऊन पाहणी केली. घराचा मीटर बसवलेला भागच नेमका कोसळल्यामुळे सुरक्षिततेसाठी मीटर काढून ठेवण्यात आला होता. परंतु तो जळालेला नव्हता.
पाहणी करताना आजीच्या घरातील इलेक्ट्रिक फिटिंग, दिवे सर्वच साहित्य खराब झाल्याचेच निदर्शनास आले. हे सर्व आवश्यक साहित्य कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने घेऊन वायरिंग-फिटिंग केले. एवढेच नव्हे तर पुढील एक वर्षाचे किमान वीज बिलदेखील भरणा केले आहे. मिराशी आजींच्या घरात पुनश्च एकदा वीजपुरवठा सुरू करून दिला.

महावितरण कंपनीचे कर्मचारी सिंधुदुर्गातील दुर्गम गावखेड्यात वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी तत्पर असतात. अगदी करोना महामारी असो, वादळ-वारे असोत, हे प्रकाशदूत अविरत कार्यरत असतात. अनेक वेळा थकबाकी वसूली करताना ग्राहकांशी कटुता निर्माण होते. पण महावितरणचे कर्मचारी माणुसकी आणि सामाजिक जाणीव कधीच विसरत नाहीत, याची साक्ष वैजयंती मिराशी आजींच्या घरातील प्रकाशमान झालेले विजेचे दिवेच देत राहतील.

मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी कार्यकारी अभियंता श्री. मोहिते आणि सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply