अशा जपाव्यात प्रभूंच्या स्मृती

अशोक प्रभू नावाचा अवलिया आता आपल्याबरोबर या जगात नाही, हे वास्तव त्यांना मानणाऱ्या साऱ्यांनीच आता स्वीकारले असेल. त्याला कोणताही पर्याय नाही, प्रभू हयात नसले तरी त्यांच्या आठवणी सतत येत राहणार, यातही संदेह नाही. या आठवणी कायमस्वरूपी जपण्यासाठी आता काही प्रयत्न जाणीवपूर्वक करायला हवे आहेत. तीच त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे.

स्मारक तयार करताना पुतळा, स्मारक, इमारत अशा स्वरूपाचे काही करण्यापेक्षाही त्यांची विचारसरणी पुढे नेणारे आणि सतत त्यांची आठवण ठेवणारे जिवंत स्मारक तयार केले गेले पाहिजे. प्रभूंनी पत्रकारिता, वैद्यकीय, अध्यात्म, संगीत अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले आहे. या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी स्वतःचा असा आपल्यापुरता एक विशिष्ट ठसा उमटवला आहे. हे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न त्या त्या क्षेत्रातील त्यांच्या सुहृदांनी करायला हवा आहे. कौटुंबिक नात्याबरोबरच पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही दोघे जोडले गेलो होतो. त्याचा विचार करून पत्रकारिता या क्षेत्रात त्यांचे नाव पुढेही राहावे, यासाठी मी स्वतः आमच्या ‘कोकण मीडिया’ या साप्ताहिकाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून या वेळेचा विशेषांक प्रसिद्ध केला आहे. पण स्मृती कायम जतन करण्याच्या दृष्टीने आणि ‘कोकण मीडिया’चे ते आधारस्तंभ होते, हे लक्षात घेऊन आणखीही काही वेगळे प्रयत्न आम्ही करणार आहोत.

‘कोकण मीडिया’च्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने दोन वर्षे आम्ही वेगवेगळ्या विषयांवरची स्पर्धा आयोजित केली. पहिल्या वर्षीच्या बोली भाषेतील कथा स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रभू यांच्या उपस्थितीत त्यांच्या संकल्पनेनुसार वेगळेपणाने पार पडले. करोनाविषयक परिस्थितीमुळे गेल्या वर्षीच्या करोनाविषयक कथा स्पर्धेचे बक्षीस वितरण अजून होऊ शकलेले नाही. संगीत आणि वैचारिक कार्यक्रमांची रेलचेल असलेला दिवसभराचा कार्यक्रम आयोजित करून त्यामध्ये बक्षीस वितरण करावे, अशी प्रभू यांची कल्पना होती. त्यासाठी जुळवाजुळव सुरू केली होती. मात्र करोनाविषयक परिस्थितीमुळे जाहीर समारंभ करणे शक्य झाले नाही. ती स्थिती कायम असल्यामुळे आणि प्रभू आपल्याला सोडून गेल्यामुळे आता ते शक्यही नाही. पण ही स्पर्धा अशोक प्रभू स्मृती स्पर्धा म्हणून ओळखली जाईल.

होमिओपॅथी आणि आयुर्वेदाच्या क्षेत्रांमध्ये अशोक प्रभू यांनी भरीव काम केले आहे. पदरी पदवी नसतानाही त्यांनी केलेले काम अद्वितीय होते. माणसाला व्याधीमुक्त करणे हेच वैद्यकीय क्षेत्राचे आद्यकर्तव्य असते. ते पार पाडताना त्यांनी त्यांच्या शिष्यांना तीच शिकवण दिली आहे. प्रामुख्याने दिव्यांगांना, कॅन्सरसारख्या असाध्य रोग जडलेल्यांना, मुलांना ते मोफत औषधोपचार करत असत. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या अनुयायांना हेच काम त्यांची आठवण म्हणून पुढे नेता येईल. सर्वांची एखादी विश्वस्त संस्था सुरू करून हे काम संघटितरीत्या करता येऊ शकेल. वैद्यकीय उपचारांचे क्षेत्र अत्यंत अमर्याद आहे. सर्वांनाच सुविधा पुरविणे, उपचार देणे शक्य नाही. पण जेवढ्या प्रमाणात शक्य होईल, तेवढे ते वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या अनुयायांनी अवश्य करावे.

प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाकारांची सूची तयार करणे प्रभू यांच्या डोक्यात नेहमी घोळत असे. स्वरसिंधुरत्न परिवार स्थापन करण्यामागे त्यांचा तोच उद्देश होता. त्याचबरोबर दशावतारी नाट्यकला जपणारे कलावंत, प्रत्येक दशावतारी नाट्य मंडळाचा इतिहास संकलित करण्याचा प्रकल्प कलाक्षेत्रातील प्रभूंच्या अनुयायांनी हाती घ्यायला हवा. याचप्रमाणे आध्यात्मिक, सामाजिक आणि इतर क्षेत्रांत प्रभू यांना मानणारे कितीतरी लोक आहेत. त्यांनीही प्रभू यांच्या आठवणी जपण्यासाठी आपापल्या क्षेत्रांमध्ये अशा तऱ्हेची जिवंत स्मारके निर्माण करायला हवीत. केवळ त्यांच्या आठवणी काढून काही उपयोग नाही. हीच स्मारके पुढच्या अनेक पिढ्यांना सतत प्रेरणा देत राहतील. त्यांच्या रूपाने अशोक प्रभू जिवंत राहतील.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २१ मे २०२१)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचा २१ मेचा अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply