भातशेतीचे क्षेत्र एक लाख हेक्टरपर्यंत नेण्याचा संकल्प – बाळ माने

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीचे क्षेत्र यावर्षी एक लाख हेक्टरपर्यंत वाढविण्याचा संकल्प रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाने केला आहे. संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाळ माने यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, गेल्या वर्षी जिल्ह्यात सुमारे ६५ हजार हेक्टरमध्ये शेतकऱ्यांनी शेती केली. यावेळी ती किमान एक लाख हेक्टरपर्यंत करण्याचा संकल्प सर्वांनी करू या. गेल्यावर्षी जी पडीक शेतजमीन होती, त्यामध्ये भात लागवड करणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारी भाताची नवीन बियाणी संघामध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर रासायनिक खते, सेंद्रिय खते शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्याला शेताच्या बांधावर पोहोचवण्याच्या दृष्टीने रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून आम्ही नियोजन करत आहोत.

श्री. माने म्हणाले, यावर्षी पाऊस चांगला होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले भात उत्पादन कसे वाढेल, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

केंद्राकडून हमीभावात भातखरेदीची योजना सुरू आहे. यावर्षी क्विंटलला साधारणतः २५०० ते २६०० रुपये भाव मिळाला. पुढच्या वर्षी तो वाढावा, यादृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचे श्री. माने यांनी यावेळी सांगितले. खतांचे वाढलेले आणि वाढण्याची शक्यता असलेले भाव लक्षात घेऊन त्याकरिता अनुदान मिळावे, यासाठी राज्यातील भाजपकडून केंद्र सरकारकडे प्रयत्न सुरू असल्याचे श्री. माने म्हणाले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply