विश्वास तथा भाई सामंत कालवश
रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र पावस येथील विद्यामंदिरचे माजी प्राचार्य, ग्रामसुधारक सेवा समितीचे माजी अध्यक्ष तसेच आदर्श शिक्षक विश्वास तथा भाई सामंत (वय ८६) यांचे ६ जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील एक कष्टकरी कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
………………………
मला नक्की साल-वार आठवत नाही. पण रत्नागिरीच्या टिळक आळीतील आमच्या खेरांच्या चाळी जवळील बाई खेर आवारातील एका मोठ्या घरातील कोपऱ्यातील एका छोट्याशा खोलीत भाई राहायला होते. बहुधा ते बी. एड. करीत असावेत. त्या आवारामध्ये अनेक मित्र राहत असल्याने आम्ही समवयस्क मित्रमंडळी लपाछपीपासून विटी-दांडू, लगोरी वगैरे खेळ रोज संध्याकाळी आणि शनिवार-रविवारी अखंडपणे खेळायचो. भाई शिक्षक असल्याने मला लहानपणापासूनच ओळखायचे. खेळ चालू असताना त्यांच्या त्या छोट्याशा खोलीमध्ये हक्काने जाऊन कळशीतील पाणी मी पीत असे. हीच माझी जुनी ओळख. माझे वडील शिक्षक आमदार आणि भाई शिक्षक आणि राहायला अनेक वर्षे सख्खे शेजारी म्हणून अतिशय जवळून परिचय. मला वाटते, ते तेव्हापासूनच पावसच्या विद्यामंदिरचे काम पाहायचे. गंमत म्हणजे भाईंनी याच छोट्याशा खोलीत आपला संसारही सुरू केला होता. वहिनी आयकर कार्यालयात नोकरी करीत होत्या. पण तरीही मला कौतुक याचे वाटते की त्यांनीही कोणतीही तक्रार न करता त्याच छोट्याशा खोलीत संसाराचा प्रारंभ केला होता.
विद्यामंदिर ही शिक्षण संस्था जणू काही आपले पाल्यच आहे, अशी काळजी भाई घेत असत, हे मी पाहिले आहे. शैक्षणिक क्षेत्रात निर्माण होणाऱ्या अडचणी ते बरेचदा माझ्या वडिलांकडे घेऊन येत असत आणि त्या अडचणी बरेचदा विचार करून सोडविण्यासारख्या असत. दिवसभर शाळेचे काम, त्याचबरोबर संस्थेचे काम हे सर्व सांभाळून भाट्ये खाडीतून प्रवास करून भाई थकले भागले रत्नागिरीमध्ये आले तरीही न कंटाळता आपले प्रश्न घेऊन आमच्याकडे येत असत. हे मी अनेकदा पाहिले आहे. भाटये खाडीवर तेव्हा पूल नव्हता. रत्नागिरीच्या राजिवडा किनाऱ्यावर तरीत बसून पलीकडे भाट्ये गाव गाठावे लागायचे. त्यानंतर तेथून पावसला जावे लागत असे.
पावस गावही आजचे आणि त्याकाळचे यात खूप फरक होता, हे अनेकांना ठाऊक असेलच. तरीही भाई दैनंदिन कामाबरोबरच शिक्षण खात्यातील कामेही स्वत: करीत असत. मला त्यांचा चेहरा कधीही कष्टाने त्रासलेला दिसला नाही.
शाळांना सीए ऑडिट बंधनकारक झाले, तेव्हा काही शाळांनी माझ्या वडिलांशी संपर्क केला. त्यावेळी रत्नागिरीत कोणीही सीए नव्ह्ते. ऑडिट ही कल्पनाच नवीन होती. नुसती जमा आणि खर्चाची वही लिहून भागणारे नव्हते. वडिलांनी मित्राच्या साह्याने सोलापूर येथील वाळके-लक्ष्मीनारायण ही सीए फर्म शाळांना उपलब्ध करून दिली. सुरुवातीला काम करायला आमच्या घरातील एक खोलीही उपलब्ध करून दिली होती. भाई नेहमी त्यांचे ऑडिटचे काम घेऊन रात्री येत असत. हिशेबातील चुकांबद्दल सीए किंवा माझे वडील रागावले, तरी भाई शांतपणे चुका समजून घेऊन सुधारत असत. मग त्यासाठी कितीही उशीर झाला तरी चालेल. एकेका हिशेबासाठी पावसला कितीही वेळा जावे लागले तरी ते जात असत आणि काम पूर्ण करून घेत असत. याचबरोबर शिक्षक म्हणूनही त्यांनी आपली कामगिरी नेहमीच उंच ठेवली होती. मला आठवते त्याप्रमाणे त्याच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली विद्यामंदिर, पावसने भूगोल विषयातील बोर्डाचे पारितोषिकही मिळविले होते.
त्याच दरम्यान ते रत्नागिरीच्या मारुती आळीतील ‘कृष्ण-कुंज’ या बंगल्यामध्ये राहायला गेले, तरीही आमच्याकडे त्यांचे जाणे-येणे नियमित होते. जुनी ओळख असल्याने मीही त्यांचे घरी जात असे.
सेवा-जनसेवा भाईंच्या रक्तातच असल्यामुळे ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निर्वाचित झाले. अविरत कष्ट आणि शिक्षणसेवेने झपाटून त्यांनी विविध क्षेत्रात काम करून त्यांचा असा स्वतंत्र ठसा उमटविला होता. पुढे पुढे आपापल्या क्षेत्रामध्ये कार्यमग्न झाल्याने भाईंजवळ प्रत्यक्ष संपर्क तुटला होता. त्यानंतरही त्यांनी निवृत्ती स्वीकारल्यानंतर माझी-त्यांची भेट होऊ शकली नव्हती. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अलीकडेच केव्हातरी स्नुषा मुग्धाताई आणि भाईंचे चिरंजीव भेटल्याने मला कै. भाईंचे अपडेट्स मिळाले. एकदा पावसला जाऊन त्यांची भेट घेण्याची इच्छा होती, पण लॉकडाउनच्या आणि या सर्व गडबडीत भेटता आले नाही, याची खंत मनात जरूर राहील.
कै. भाईंचे जीवन मी माझ्या लहान वयातच पाहिले असल्यानेच मी त्यांना “शिक्षण क्षेत्रातील एक कष्टकरी कार्यकर्ता” असे संबोधिले आहे. कोकणासारख्या आणि त्यातही पावससारख्या ग्रामीण क्षेत्रातील एका मागास विभागामध्ये शिक्षण संस्था आणि विद्यामंदिर उभे करून ते कार्य यशस्वी करणे हे कष्टप्रद कार्य कधीच सोपे नव्ह्ते, पण कै. भाईंनी ते साध्य करून दाखविले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच भाई अनंतात विलीन झाले हाही एक योगायोग असावा. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना!
- ॲड. धनंजय जगन्नाथ भावे, रत्नागिरी
- (संपर्क – ९४२२०५२३३०)
………………….
शैक्षणिक क्षेत्रातील हिरा हरपला
हाडाचे शिक्षक असलेल्या भाईंनी शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असताना चांगले विद्यार्थी घडवून शैक्षणिक प्रगती केल्यामुळे प्रशालेचे नाव पुढे नेण्यात त्यांचे योगदान आहे. त्यामुळेच प्रशालेचे अनेक विद्यार्थी नावारूपाला आले. त्यांच्या प्राचार्यपदाच्या कालखंडामध्ये शैक्षणिक पर्वाचा चढता आलेख ठेवला होता. निवृत्तीनंतर संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा घेतल्यानंतर प्रशालेच्या प्रगतीची धुरा अखंडपणे तेवत ठेवली.
त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान महत्त्वाचे होते. त्यांच्या रूपाने शैक्षणिक क्षेत्रातील हिरा हरपला असून त्यांच्या निधनाने शाळेची आणि संस्थेची निर्माण झालेली पोकळी भरून निघणारी नाही.
- माधव पालकर
(शालेय समिती अध्यक्ष)
………
भाईंची शाळा पोरकी
‘भाई’ या नावातच अनेक गोरगरीब लोकांना आणि विद्यार्थ्यांना मजबूत आधाराचा विश्वास वाटावा, असे हे व्यक्तिमत्त्व! पावस गावातील शिक्षण क्षेत्रातील अतिशय अभ्यासू आणि आपल्या मनमिळाऊ स्वभावाने भेटेल त्याला आपलेसे करणारी व्यक्ती म्हणजे विश्वासभाई सामंत!
पावस ग्रामपंचायत सदस्य, विद्यामंदिर पावसचे प्राचार्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, मुख्याध्यापक संघ अकॅडमिक सेक्रेटरी, जिल्हा स्काउट कमिशनर, राष्ट्र सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष, ग्रामसुधारक सेवा समिती (पावस, मुंबई) माजी अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषविली. सन १९७३-७४ मध्ये जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार आणि १९७६-७७ मध्ये राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांच्या शैक्षणिक कार्याचा सन्मान करण्यात आला होता.
अनेक व्यक्तींच्या कलागुणांना त्यांनी संधी दिली. त्यातून समाजोपयोगी अनेक कामे पूर्ण झाली. ‘आधी माणूस उभा राहिला पाहिजे’ ही त्यांची प्रत्येक कामातील तळमळ असायची. अल्पबचत सल्लागार समिती, कमाल भू-धारक न्यायाधिकरण समिती, भाट्ये-पावस प्रवासी संघटना इत्यादींचे सदस्य म्हणून ते कार्यरत होते. फिनोलेक्स कंपनी तक्रार निवारण समितीचे प्रमुख म्हणून १९९२-९५ या कालावधीत त्यांनी काम पाहिले. मराठी भाषा आणि साहित्य यावर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांना लाभलेला अनेक साहित्यिकांचा आणि शास्त्रज्ञांचा सहवास हा त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा होता. कवितेपलीकडील कविता शिकवणारे, कुटुंबाप्रमाणेच आपल्या सहकाऱ्यांवर भरभरून प्रेम करणारे आणि त्यांच्या मनात विश्वास निर्माण करणारे पावस गावचे सुपुत्र विश्वासभाई सामंत यांना ६ जून २०२१ रोजी देवाज्ञा झाली. त्यांच्या जाण्याने सर्वत्र परिचित असणारी ‘भाईंची शाळा’ आज खऱ्या अर्थाने पोरकी झाली. त्यांच्या पश्चात असणाऱ्या कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात भाईंच्या जाण्याने आधारस्तंभ हरवल्याची हळहळ व्यक्त केली जात आहे.
- संचालक मंडळ,
विद्यामंदिर, पावस

