करोनाबाधितांना आजार विसरायला लावणारे रत्नागिरीतील ग्रंथालय

रत्नागिरी : करोनाबाधित मुले आणि महिलांना आपला आजार विसरायला लावणारा उपक्रम येथील समाजकल्याण भवनातील कोविड केअर सेंटरमध्ये सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रीय कीर्तनांच्या माध्यमातून देशभक्तीचा हुंकार देणाऱ्या कीर्तनसंध्या परिवाराने हे ग्रंथालय चालविण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

कोविड सेंटर म्हटले की डोळ्यांसमोर येते ते ताण-तणावाचे वातावरण असलेला परिसर. तेथे दाखल असलेले रुग्ण “‘आता माझं कसं होणार?” असे भाव असलेले चिंतातुर चेहरे दिसू लागतात. काही रुग्ण शून्यात ध्यान लावून बसलेले असतात, तर काही जण कधी इथून सुटका होणार, या प्रश्नाचे उत्तर शोधत बसलेले असतात. याहून सर्वच पातळीवर अगदी वेगळे असे कोविड केअर सेंटर रत्नागिरीतील सामाजिक न्याय भवनात आहे. करोनाची बाधा झालेल्या महिला आणि लहान मुलांना या सेंटरमध्ये ठेवले जाते.

तेथील रुग्णांना बरे वाटावे, त्यांना झालेल्या आजाराचा विसर पडावा यासाठी रत्नागिरीतील आरोग्य विभाग, हेल्पिंग हँड, कीर्तनसंध्यासारख्या विविध सामाजिक संस्था, तेथील कर्मचारी प्रयत्न करत असतात. बैठे खेळ, मैदानी खेळ, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा असे नानाविध प्रकारचे उपक्रम तेथे नेहमी राबवले जातात. महिलांचा अत्यंत महत्वाचा वटपौर्णिमेचा सण तेथे आगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

याच उपक्रमांमध्ये आता एका नव्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची भर पडली आहे. तेथे ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. रुग्णांमध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी जसे खेळ, नृत्य, मनोरंजन आवश्यक आहे, तसेच विचारांमध्ये सकारात्मकता येण्यासाठी चांगली दर्जेदार पुस्तके त्यांना वाचायला मिळाली, तर निश्चितच त्याचा चांगला परिणाम होईल, असा विचार हेल्पिंग हँड आणि कीर्तनसंध्या या संस्थांच्या मनात आले. कै. कुसुमताई अभ्यंकर सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष विश्वनाथ बापट, श्रीकृष्ण साबणे, मोरेश्वर जोशी, वाचनालयाचे कर्मचारी यांच्या सहकार्याने सेंटरमध्ये उत्तम, दर्जेदार १०० पुस्तकांचे ग्रंथालय सेंटरमध्ये उभे राहिले. लहान मुले, महिला, वृद्ध महिला आनंदाने ही पुस्तके रोज न चुकता वाचतात आणि वाचून झाल्यानंतर पुन्हा कार्यालयात जमा करतात, अशी माहिती कीर्तनसंध्या परिवाराचे अध्यक्ष अवधूत जोशी यांनी दिली. हेल्पिंग हँडचे प्रमुख सचिन शिंदे यांचेही उत्तम सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.

कोविड सेंटरमधील कर्मचारी, डॉक्टर नर्सेस, वॉर्डबॉयदेखील या उपक्रमाला चांगले सहकार्य करतात. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा शल्यचिकित्सक सौ. संघमित्रा फुले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply