अ. भा. गझल संमेलनाचे माजी अध्यक्ष मधुसूदन नानिवडेकर यांचे निधन

तळेरे (ता. कणकवली) : अखिल भारतीय गझल संमेलनाचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध गझलकार आणि पत्रकार मधुसूदन नानिवडेकर (वय ६१) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या निधनाने राज्यातील साहित्यिक वर्तुळात तीव्र दु:ख व्यक्त होत आहे.

नानिवडे (ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) येथील मूळचे रहिवासी असलेले नानिवडेकर अलीकडे तळेरे येथे राहत होते. साहित्य क्षेत्रात गझलकार म्हणूनच ते ओळखले जात. वयाच्या सतराव्या वर्षापासून त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी लिहिलेली ‘ठेव तू मनातल्या मनात’ ही कविता सुरेश भट यांनी वाचली आणि नानिवडेकर यांची पाठ थोपटली. ही तर गझल आहे, असे सुरेश भट त्यांना म्हणाले. भट यांच्या या शाबासकीनंतर ते गझल या काव्यप्रकाराकडे वळले. राज्यभरात त्यांनी गझलांचे अनेक कार्यक्रम केले होते. त्यांना उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत होता. गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी नानिवडेकर यांच्या गझला अनेक कार्यक्रमांमध्ये सादर केल्या आहेत. ‘चांदणे नदीपात्रात’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे.गझल क्षेत्रात चौफेर मुशाफिरी करणारे नानिवेडकर व्यवसायाने पत्रकार होते. दैनिक पुढारीमध्ये त्यांनी उपसंपादक पदाची जबाबदारी सांभाळली होती. गेली काही वर्षे ते महाराष्ट्र टाइम्सचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते.

साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नानिवडेकर यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. नवी मुंबईतील वाशी येथे झालेल्या नवव्या अखिल भारतीय गझल संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. अत्यंत हळव्या मनाचा हा कवी होता. ते शीघ्रकवीही होते. ता

‘सिंधुसाहित्यसरिता’ची प्रस्तावना

सिंधुदुर्गातील दिवंगत साहित्यिकांचा परिचय करून देणाऱ्या आणि रत्नागिरीतील कोकण मीडियाच्या सत्त्वश्री प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या सुरेश ठाकूर संपादित ‘सिंधुसाहित्यसरिता’ या पुस्तकाची प्रस्तावना नानिवडेकर यांनी लिहिली होती. त्यानिमित्ताने त्या त्या साहित्यिकाच्या काही पैलूंचा उलगडा त्यांनी केला होता. गेल्या डिसेंबर महिन्यात या पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्रकाशन समारंभाला ते उपस्थित राहू शकले नव्हते. मात्र ‘सिंधुसाहित्यसरिता’च्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध व्हाव्यात, त्यानिमित्ताने सिंधुदुर्गातील अनेक अपरिचित तरीही व्युत्पन्न साहित्यिकांचा परिचय व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.

नानिवडेकर यांची एक रचना

भाकरी भाजता भाजता
धग असह्य झाल्यावर
तिने चुलीतील लाकडे
पुढे सरकवली
आणि मनातल्या मनात
पुटपुटली
आयुष्याचा कोळसा
होण्याआधी स्वप्नांचे
निखारे असेच फुलत
जातात…

नंतर तिने भाकर परतली
आयुष्य परतावे
सप्तपदींच्या दिवशी
तेवढी सहज
पण संसाराची भाकरी
करपली ती करपलीच….
आता पुन्हा हा जाळ
असा आनंदाने सोसते आहे

मग तिने तवा अलगद
खाली उतरवला
त्याच्यावर पाणी मारले
चर्रऽऽ आवाज झाला
अलीकडे जवळपासच्या
माणसांच्या बोलण्याने
होतो तसा

तिने विस्तवावर पाणी मारले
आणि चुलीपासून दूर झाली
आता ती स्त्रीमुक्तीच्या सभेला
निघाली आहे पदरात चार निखारे बांधून…
ती सभागृहाच्या मागच्या रांगेत
आणि पुरुषच बसलेले असतात पुढच्या रांगेत
बाईच्या दुःखाला ‘टाळी’ द्यायला निमंत्रित म्हणून…

– मधुसूदन नानिवडेकर

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply