पंतप्रधानांशी संवादाने रत्नागिरीतील शेतकरी भारावला

रत्नागिरी : पीएम किसान निधीच्या नवव्या टप्प्याच्या वितरणाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील काही शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यामध्ये रत्नागिरीतील देवेंद्र झापडेकर या शेतकऱ्याचा समावेश होता. पंतप्रधानांशी थेट संवाद झाल्याने हा शेतकरी भारावून गेला आणि या संवादातून आपल्याला आणखी नवे काही करण्याचे प्रोत्साहन मिळाले, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

पीएम किसान योजनेच्या नवव्या टप्प्याला आज (दि. ९ ऑगस्ट) प्रारंभ झाला. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. वेगवेगळ्या राज्यांतील शेतकऱ्यांशीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी संवाद साधला. रत्नागिरीतील आंबा उत्पादक देवेंद्र झापडेकर यांचा त्यात समावेश होता. सिव्हिल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा घेतलेल्या देवेंद्र झापडेकर यांनी आपल्या वडिलांचा शेतीचा व्यवसाय पुढे चालवण्याचा निर्णय घेतला. शासकीय योजनेतून त्यांना मँगो रायपनिंग चेंबरसाठी कर्ज मिळाले. बँक ऑफ इंडियाच्या रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील शाखेतील त्याबद्दलचा अनुभव अत्यंत चांगला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या अनुभवातून बाकीच्या शेतकऱ्यांनाही प्रेरणा घेता येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधानांशी झालेल्या संवादाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. झापडेकर म्हणाले की, पंतप्रधानांनी केवळ संवाद साधला, असे नाही तर आंबा पिकाविषयी त्यांनी जाणून घेतले. त्यांच्याशी संवाद साधताना हे लक्षात आले की त्यांनाही आंब्यातील अनेक बारकावे माहीत आहेत. आंबा खाण्यासाठी कोकणात येण्याचे निमंत्रण त्यांना दिले तेव्हा त्यांनी नुकत्याच झालेल्या महापुराचा विषय काढला आणि त्यामध्ये मरण पावलेल्यांबद्दल सहानुभूती व्यक्त केली.

या संवादातून मला यापुढे आंब्याच्या संदर्भात जे काही काम करायचे आहे, त्याला प्रोत्साहन मिळाले असे सांगून श्री. झापडेकर म्हणाले की, पंतप्रधानपदावरचा माणूस माझ्यासारख्या छोट्या शेतकऱ्याशी संवाद साधतो, यामुळेच भारावून जायला झाले आहे. आणि आणखी चांगले काम करण्याची जबाबदारी माझ्यावर पडली आहे, अशी जाणीव मला यातून झाली आहे. बँक ऑफ इंडियाने सहजपणे माझ्या प्रकल्पासाठी कर्जपुरवठा केला, त्यामुळे मी तो उभारू शकलो, हेही त्यात अत्यंत महत्त्वाचे आहे, असे श्री. झापडेकर म्हणाले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply