नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याशी जवळचा संबंध असलेल्या बलवंत साप्ताहिकाच्या यूट्यूब चॅनेलमुळे कोकणासारख्या मागास भागाच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नीतिन गडकरी यांनी येथे व्यक्त केला.
रत्नागिरीतील बलवंत साप्ताहिकाच्या यूट्यूब चॅनेलचे उद्घाटन श्री. गडकरी यांच्या हस्ते आज दिल्लीत अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून झाले. त्यावेळी ते बोलत होते. साप्ताहिकाचे संपादक बाळ माने यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. श्री. गडकरी म्हणाले, हे साप्ताहिक १९२३ साली सुरू झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात पटवर्धन यांना लोकांचे प्रबोधन आणि प्रशिक्षण करण्याकरिता साप्ताहिकाचा उपयोग केला. देश स्वतंत्र होण्यामध्ये ज्या अनेक स्वातंत्र्यसेनानींचे योगदान आहे, त्यामध्ये पटवर्धन यांचा मोठा वाटा आहे. त्यांचा वारसा बाळ माने यांच्या परिवाराने गेली पंचवीस वर्षे चालू ठेवला आहे. आता त्यांनी यूट्यूब चॅनल सुरू केले आहे. माझा विश्वास आहे की या देशाचे लोकतंत्र मजबूत करण्याकरिता कोकणासारख्या अविकसित भागाला विकसित करण्यासाठी नवी दृष्टी देण्याकरिता आणि मराठी माणसाचा स्वाभिमान, त्याचे कार्य त्याच्या जीवनात परिवर्तन व्हावे, यासाठी हे यूट्यूब चॅनेल उपयोगी ठरेल.
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही श्री. गडकरी यांनी देशवासीयांना दिल्या.
यावेळी बलवंतचे संपादक माजी आमदार बाळ माने यांनी सांगितले की, स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेले हे साप्ताहिक शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी बलवंतने डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रवेश केला आहे. मुद्रित स्वरूपातही बलवंत सुरूच राहणार आहे. त्याचबरोबर डिजिटल माध्यमे सुरू होत असून त्यामुळे बलवंत ग्लोबल होणार आहे. त्याला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन श्री. माने यांनी केले.
उद्घाटन समारंभाची चित्रफीत पाहण्यासाठी सोबतच्या लिंकवर जा –

