पाणी तापवण्यासाठी गॅस गीझर वापरताय? मग हे वाचाच…

सध्या टीव्ही, वर्तमानपत्र आणि विशेषकरून सोशल मीडियावर गॅस गीझरविषयी अनेक बातम्या येत आहेत. त्याबाबत अनेक तर्कवितर्क मांडले जात आहेत. तसेच ते वाचून गॅस गीझर वापरत असणाऱ्या अनेक लोकांचे मला फोन-मेसेज आले, काही जण प्रत्यक्ष येऊन भेटले. मला न ओळखणाऱ्या माझ्या शहराबाहेरील लोकांनासुद्धा थोडीफार माहिती द्यावी म्हणून हे लेखन.

मूळ मुद्दा चर्चा करण्याआधी एका प्रश्नाचे उत्तर द्या. समजा एका ट्रकचा अपघात झाला तर दोषी कोण? ट्रक कंपनीचा मालक दोषी? ट्रक दोषी? ट्रकचा मेन्टेनन्स ठेवणारा दोषी? की ट्रकचालक दोषी? इतके जण ट्रक चालवतात, मग हजारातल्या एका ट्रकचा अपघात झाला तर नक्कीच ट्रक कंपनीचा मालक किंवा सगळे ट्रक दोषी नसावेत, हे प्रथमदर्शनी समजण्याएवढे आपण सुज्ञ आहात. एक तर ट्रकचा मेन्टेनन्स वेळेवर आणि व्यवस्थित न ठेवल्यामुळे इंजिनमध्ये बिघाड झाल्याने किंवा चालकाचे नियंत्रण नसल्याने किंवा रोडवर अनपेक्षित काहीतरी असल्याने.. यापैकी कोणत्या तरी कारणाने अपघात झाला असावा, असे आपण म्हणतो.

मित्रहो, कोणत्याही वस्तूला स्वतःची अशी बुद्धी नसते. म्हणूनच त्या निर्जीव संबोधल्या जातात. जेव्हा एखादा अपघात होतो, तेव्हा त्या वस्तूवर खापर फोडणे सोपे असते. पण खरा दोषी बर्‍याच वेळा वस्तूचा वापर करणाऱ्याचा असतो, किंबहुना वापर करणाऱ्याचे अज्ञान असते. कॉम्प्युटरमुळे चुकीचे मार्क आले असे आपण म्हणतो, पण दोष की बोर्ड ऑपरेट करणाऱ्याचा असतो.

आता गॅस गीझरविषयी विस्तृत चर्चा करू या.
अंघोळीसाठी पाणी गरम करणारे उपकरण म्हणजे गॅस गीझर. नळ चालू झाला म्हणजेच पाणी चालू झाले की क्षणभर स्पार्किंग होऊन आपोआप गॅस चालू करून पाणी गरम करणे हे त्याचे काम. तसेच नळ (पाणी) बंद झाला की आपोआप गॅस बंद.

आता हे उपकरण वापरण्यात संभाव्य धोका कोणता ते बघा. लहानपणी आपण पेटत्या मेणबत्तीवर ग्लास उपडा ठेवला की मेणबत्ती विझते, हे पाहिले आहे. या प्रयोगात मेणबत्ती किंवा ग्लास खराब होता का? नाही. मेणबत्ती विझवण्याचे कारण ऑक्सिजनची कमतरता.
जसे मेणबत्ती ज्वलनासाठी ऑक्सिजनचा वापर होतो तसे गॅसची ज्योत ऑक्सिजनचा वापर करते. जर बाथरूममध्ये गॅस गीझर बसवला असेल आणि बाथरूममध्ये पुरेशी हवा खेळती नसेल, तर ज्वलनामुळे ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊन आत असलेल्या व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होण्यास सुरुवात होते. असेच जास्त वेळ चालू राहिले, तर चक्कर येऊ शकते. म्हणून “जर बाथरूममध्ये गॅस गीझर बसवायचा असेल तर बाथरूमला बर्‍यापैकी मोठी खिडकी हवी आणि ती बंद नसावी”.

खिडकी नसलेल्या वा खिडकी बंद असलेल्या जागी, व्हेंटिलेशनची कमतरता असलेल्या जागी गॅस गीझर इन्स्टॉलेशन करणे हा दोष त्या वस्तूचा नाही. हा दोष अज्ञानाचा आहे, जे चुकीची जागा टाळण्यापासून परावृत्त करत नाही. ९९ टक्के गॅस गीझरच्या बॉक्सवर To be used in well ventilated area असे स्पष्ट लिहिलेले असते. ही सूचना पाळून अपघात टाळता येईल.

आणखी एक संभाव्य धोका, जो प्रत्येक गॅसवर चालणाऱ्या उपकरणाबाबत असतो. तो म्हणजे गॅसचा भडका. गॅस गीझर आणि गॅस शेगडी दोन्हीला लागू पडतो. मग गीझर आणि शेगडी दोन्ही वापरायचे बंद करणार की वापरताना काळजी घेणार? हा निर्णय ज्याचा त्याचा आहे. गॅस सिलिंडर जोडण्यापूर्वी त्यातील ओ रिंग तपासणे, गॅस सिलिंडर बंदिस्त जागेत न ठेवणे, गॅस रेग्युलेटर अधिकृत ठिकाणाहून घेणे, गॅस पाइप दर दोन वर्षांनी बदलणे, गॅस गीझर नोझलमधील वायसर तपासणे, टीचा वापर टाळणे, पाच फुटाहून अधिक गॅस पाइप आवश्यक असल्यास जाणकारांकडून कॉपर पायपिंग करून घेणे, गॅस उपकरण सिलिंडरपेक्षा अधिक उंचीवर जोडणे, दोन वर्षांनी उपकरण सर्व्हिसिंग करून घेणे, ठरावीक वर्षांनंतर उपकरण बदलणे, काही शंका असल्यास रेग्युलेटर बंद करून सेफ्टी कॅप बसवणे असे अनेक उपाय सुचवलेले आहेत. ते कटाक्षाने पाळले, तर अपघात टाळता येईल.

अगदी इलेक्ट्रिक गीझर वापरायचा म्हटले, तरी बाथरूममध्ये ओलसर जागेत अर्थिंग व्यवस्थित नसल्यास शॉक लागायची शक्यता असतेच. कोणतीही वस्तू वापरायची कशी, त्याचा उपयोग करताना संभाव्य धोके कसे टाळता येतील, हे विक्रेता आणि ग्राहक या दोघांनाही माहिती असणे आवश्यक आहे. प्रत्येक उपकरणाला हा नियम लागू होतो.

सध्या तर गॅस गीझरना फ्लेम फेल्युअर सेन्सर, इनबिल्ट टायमर, टेम्परेचर कटऑफ, वॉटर गॅस इंटरलॉक अशी अनेक प्रोटेक्शन दिलेली आहेत. आपण फक्त हवेशीर आणि सुटसुटीत जागा निवडली, योग्य वेळी सर्व्हिसिंग केले आणि थोडीशी सतर्कता बाळगली म्हणजे झाले.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅस गीझर विक्रेता आणि इन्स्टॉलेशन करणारा मेकॅनिक यांची योग्य निवड करणे. बर्‍याच वेळा नॉनटेक्निकल लोक रिटेलर म्हणून काम करतात, त्यांनी ट्रेनिंग प्रोग्राम अॅटेंड करून स्वतःचे याबाबत ज्ञान वाढवून ग्राहकापर्यंत पोहोचवले पाहिजे. एका गॅस सिलिंडरवर टप्प्याटप्प्याने जवळपास ७ हजार लिटर पाणी गरम करणाऱ्या स्वयंचलित आणि इन्स्टंट अशा गॅस गीझरवर एकतर्फी आरोप करून लोकांच्या मनात भीती पसरवण्यापेक्षा जनजागृतीचे काम करणे हितावह आहे. प्रत्येक शहरात आज अनेक वर्षे समाधानकारकरीत्या गॅस गीझर वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विक्रेते इलेक्ट्रिक आणि गॅस असे दोन्ही प्रकारचे गीझर घेऊन बसले आहेत. दोन्ही उपयोगी आहेत, पण दोन्हीला काळजी ही घेतलीच पाहिजे. मध्यंतरी वॉटर प्युरिफायरच्या बाबतीत पण असाच प्रकार घडला होता. आरओ, यूव्ही, यूएफ या प्रकारातून योग्य निवड कशी करायची हे सांगायला हवे होते. त्याऐवजी अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले लोक पळा.. पळा.. आभाळ पडले.. असे ओरडत होते आणि सगळे जण त्यांच्या मागे. वाहतुकीचे नियम असतात तसे उपकरण वापराचेही असतात, ते पाळले तर अपघात होण्याची शक्यता बहुधा नसते.

मला असलेल्या थोड्याफार माहितीनुसार सदर गोष्टी सांगत आहे. प्रत्येक वस्तूचे इन्स्ट्रक्शन मॅन्युअल वाचून किंवा माहिती करून घेऊन नंतर वापर करणे योग्य ठरेल. दुर्दैवाने झालेले अपघात वाईटच. पण निष्काळजीपणामुळे अपघातास आमंत्रण जायला नको ,एवढीच अपेक्षा आहे. मग तो गॅस गीझर असो, इलेक्ट्रिक गीझर असो वा अन्य कोणतेही उपकरण!

©.. मनिष सोल्युशन्स, लांजा
डोमेस्टिक अप्लायन्सेस
एस. व्ही. कुलकर्णी
(बी ई इलेक्ट्रॉनिक्स)
लांजा 416701
(संपर्क : 9970593910)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply