डॉ. बाळकृष्ण पाध्ये यांना धन्वंतरी, तर अनघा प्रभुदेसाई यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

राजापूर : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या २०२० च्या दोन पुरस्कारांचे वितरण २४ ऑक्टोबर २०२१ रोजी राजापूर हायस्कूलच्या कलामंदिरात समारंभपूर्वक करण्यात आले. या वेळी धन्वंतरी पुरस्कार डॉ. बाळकृष्ण पाध्ये यांना आणि आचार्य नारळकर आदर्श शिक्षक पुरस्कार सौ. अनघा विश्वास प्रभुदेसाई यांना डॉ. अरुण जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या वेळी डॉ. बाळकृष्ण पाध्ये म्हणाले, ‘काही जण डॉक्टरांना देव मानतात. परंतु अलीकडे डॉक्टर पैसे लुटतात, अशी लोकभावना निर्माण होत आहे. याच्याशी मी सहमत नाही. डॉक्टर व रुग्ण यांचे नाते सुधारावे. माझ्याकडे तीन पिढ्यांचे रुग्ण येतात. रुग्ण व डॉक्टर यांचे नाते दृढ आहे, यावर विश्वास ठेवावा. हल्ली अॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद या उपचारपद्धतींवरून काही वाद/चर्चा होतात. प्रत्येक पॅथीचे काही गुण व काही मर्यादा आहेत; पण सर्व पॅथींचे प्रमुख उद्दिष्ट रुग्णांना बरे करणे हेच आहे. ज्याला जो मार्ग चांगला वाटतो, तो त्याने स्वीकारावा.’

सौ. अनघा प्रभुदेसाई म्हणाल्या, ‘ज्या शाळेत शिकले, बक्षिसे मिळवली त्याच शाळेत आज आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद वाटतोय. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी चांगले संस्कार असल्यानेच जीवनात कोणतीही समस्या उद्भवली नाही.’

प्रमुख पाहुणे डॉ. जोशी यांनी सांगितले, की रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे दर वर्षी आठ पुरस्कार दिले जातात. सलग २ वर्षे राजापूर तालुक्यातील व्यक्तीला पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाकडून मिळालेल्या ७५ रुपये शिष्यवृत्तीचा उल्लेख त्यांनी केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन, वेदमंत्रपठण करण्यात आले. कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी प्रमुख पाहुणे डॉ. अरुण जोशी यांचा शाल, श्रीफळ, पुस्तक भेट देऊन सत्कार केला. श्री. हिर्लेकर यांनी प्रास्ताविकामध्ये कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या कार्याची माहिती आणि संघाच्या विविध योजनांची माहिती दिली. ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत हळबे यांनी डॉ. बाळकृष्ण पाध्ये व सौ. अनघा प्रभदेसाई यांचे स्वागत केले. सौ. प्रतिभा प्रभुदेसाई आणि डॉ. शरद प्रभुदेसाई यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या कार्यक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण करंबेळकर आणि सचिव रघुवीर बापट यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले. या वेळी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे राजापूर वेदशाळेला देणगी देण्यात आली. दिलीप ढवळे यांनी आभार मानले. सत्कारमूर्ती डॉ. बाळकृष्ण पाध्ये यांनी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या उपक्रमांसाठी भरघोस देणगी देऊन संघाच्या उपक्रमांस हातभार लावला आहे. त्याबद्दल संघातर्फे आभार मानण्यात आले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply