रत्नागिरी : करोना विषाणूचा ओमिक्रॉन हा उत्क्रांत प्रकार अतिशय झपाट्याने पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगावी आणि याचा जिल्ह्यात शिरकाव होणार नाही यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले आहे.
सध्या दक्षिण आफ्रिकेसह इतर काही देशांत हा विषाणू आढळून आला आहे. हा पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन जगभरात उपाय योजले जात आहेत. याबाबत बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, की आपल्या आसपास बाहेरच्या देशातून गेल्या 21 दिवसांत कोणी आलेले असेल तर त्याची माहिती नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाला 02352-222233 या क्रमांकांवर द्यावी.
नागरिकांनी जिल्ह्यात लसीकरणास चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे पहिली लस घेणाऱ्यांचे प्रमाण 88 टक्के, तर दोन्ही लस घेणाऱ्यांचे प्रमाण 48 टक्क्यांपर्यंत आहे. ज्यांनी पहिली लस घेतली नाही त्यांनी ती तत्काळ घ्यावी, असेही ते म्हणाले. लस घेणाऱ्यांना गंभीर करोना होण्याची शक्यता नाही आणि त्यामुळेच आपण यातील मृत्यू नियंत्रणात ठेवू शकलो आहोत, असेही त्यांनी सांगितले.
सर्व लसीकरण केंद्रावर लशींची उपलब्धता असून नागरिकांनी कुठलाही विलंब न करता लसीकरण करून घ्यावे, असेही ते म्हणाले. ज्येष्ठ नागरिक, तसेच सहव्याधी असलेले रुग्ण आणि लहान बालकांनी गर्दीत जाण्याचे टाळावे. तसेच आजारपणांची लक्षणे वाटल्यास शासकीय रुग्णालयात जाऊन स्वत:ची आरटीपीसीआर तपासणी करून घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी योग्य पद्धतीने मास्कचा वापर, दोन व्यक्तींमधील सुरक्षित अंतर आदींचे पालनदेखील न चुकता करण्याची आवश्यकता आहे. सोबतच विनाकारण गर्दी करणे, गर्दीच्या ठिकाणी जास्त वेळ फिरणे आदी प्रकारही सर्वांनी टाळावेत, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.