रत्नागिरी : करोनाप्रतिबंधक लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांकरिता वेगळ्या रांगेची व्यवस्था करावी, अशी मागणी रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघ आणि रत्नागिरी जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.
करोनाच्या नव्या ओमायक्रॉन विषाणूच्या प्रादुर्भावामुळे करोनाप्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे त्यांना सर्वांच्या रांगेत तिष्ठत राहावे लागत आहे. श्री. थरवळ यांनी स्वतःच आज त्याचा अनुभव घेतला. त्यांचा आज कोविशील्डचा बूस्टर डोस होता. कोकण नगरमधील केंद्रावर ते सकाळी साडेदहा वाजता गेले. केंद्रावर पहिला डोस,.दुसरा डोस आणि बूस्टर डोस एकाच ठिकाणी दिला जात होता. त्यामुळे गर्दी झाली होती. अनेक ज्येष्ठ नागरिकही त्या रांगेत होते. लसीकरण केंद्राच्या आवारात उन्हापासून संरक्षण नाही, बसण्यासाठी खुर्ची नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय झाली. ती लक्षात घेऊन श्री. थरवळ यांनी केंद्रातील डॉक्टरांची भेट घेतली आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी रांग करावी आणि एक ज्येष्ठ नागरिक आणि एक अन्य नागरिक यांना आलटून पालटून डोस द्यावा, अशी विनंती त्यांना केली. मात्र डॉक्टरांनी त्यांना सांगितले की आम्हाला तसे करता येणार नाही. वरून आदेश नाहीत.
त्यामुळे श्री. थरवळ पुन्हा रांगेत उभे राहिले. दीड तासाने त्यांचा क्रमांक आला. याबाबत लक्ष घालून जरूर ती सुधारणा करावी. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अधिक काळ तिष्ठत राहावे लागणार नाही, अशी व्यवस्था जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर करावी, अशी विनंती श्री. थरवळ यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना केली आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड