भारतीय शास्त्रज्ञांचे कार्य आइनस्टाइनच्या संशोधनाच्या तोडीचे : अ. पां. देशपांडे

रत्नागिरी : डॉ. जयंत नारळीकर, डॉ. वसंत गोवारीकर आणि डॉ. भालचंद्र उदगावकर या आंतरराष्ट्रीय भौतिक शास्त्रज्ञांचे संशोधनकार्य आइनस्टाइन यांच्या संशोधनाच्या दर्जाइतके श्रेष्ठ होते, असे मत मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अनंत पां. देशपांडे यांनी व्यक्त केले.

येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य कै. वि. के. बावडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. विज्ञान शाखेतील संशोधनाच्या नव्या संधी, घडामोडींविषयी विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, हा या व्याख्यानमालेचा उद्देश आहे. यंदा या व्याख्यानमालेचे ३६ वे पुष्प अनंत देशपांडे यांनी गुंफले.

प्रारंभी श्री. देशपांडे यांनी पद्मभूषण डॉ. भालचंद्र उदगावकर यांचे भौतिकशास्त्राचे शिक्षक, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ म्हणून कार्य, होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, भुवनेश्वर येथील भौतिकशास्त्र संस्था येथील कार्याचा उल्लेख केला. विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी डॉ. उदगावकर यांचे मराठी विज्ञान परिषदेतील कार्य याविषयीची माहिती त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले, डॉ. नारळीकर, डॉ. गोवारीकर आणि डॉ. उदगावकर यांनी त्यांचे आयुष्य संशोधनासाठी आणि विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वाहून घेतले. पद्मभूषण डॉ. वसंत गोवारीकर यांनी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO)चे प्रमुख, पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे वैज्ञानिक सल्लागार (१९९१-९३), पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून केलेले कार्य, मराठी विज्ञान परिषदेचे कार्य तसेच fertilizer encyclopaedia (२००८) यासाठी केलेल्या विशेष कार्याचा आढावा श्री. देशपांडे यांनी घेतला. पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांची होयले-नारळीकर थिअरी, आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिक शास्त्र केंद्र (IUCCA) याविषयी माहिती दिली. विज्ञान विषय सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी त्यांनी लिहिलेल्या शेकडो पुस्तकांचा उल्लेख केला. त्यांच्या शिकवणीसंदर्भातील रंजक आठवणी सांगितल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मेघना म्हादये यांनी तर प्रास्ताविक शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी केले. प्रा. ऋजुता गोडबोले यांनी बावडेकर सर यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल माहिती दिली. मुंबई विद्यापीठाचे संशोधन मार्गदर्शक (Ph.D. Guide) म्हणून मान्यता मिळालेल्या डॉ. स्वामिनाथ भट्टार (रसायनशास्त्र), डॉ. सोनाली कदम (वनस्पतीशास्त्र), डॉ. भूषण ढाले (भौतिकशास्त्र) आणि डॉ. रामा सरतापे (अर्थशास्त्र) यांचा तसेच स्टार DBT समितीचे समन्वयक डॉ. विवेक भिडे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विविध स्पर्धामध्ये पारितोषिके मिळविलेल्या विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. वनश्री तांबे यांनी या पुरस्कार वितरणाचे सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी भूषविले. डॉ. नारळीकर, डॉ. गोवारीकर आणि डॉ. उदगावकर यांचे देश निर्मितीत मोलाचे योगदान असल्याचे मत डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रसायन शास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. मयूर देसाई, डॉ. उमेश संकपाळ, डॉ. स्वामिनाथ भट्टार, डॉ. मेघना म्हादये, प्रा. प्रतीक्षा बारसकर, प्रा. निकिता पोवार, प्रा. अंकित सुर्वे, प्रा. बरीन आवटे, प्रा. रीना शिंदे, प्रा. तृप्ती जोशी, शिक्षकेतर कर्मचारी प्रशांत मुरकर, जगदीश जाधव, तानाजी बेडक्याळे, पंडित सोनावणे, अनंत यादव, भीमरत्न कांबळे, प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply