दोन वर्षांच्या करोनाच्या कालखंडानंतर यावर्षी पुन्हा एकदा गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा झाला. लोकजागृतीसाठी सुरू केलेला गणेशोत्सव आता प्रत्येकाच्या अंगवळणी पडला आहे. उत्सवात धार्मिक विधींबरोबरच सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम, जनजागृतीचे देखावे घरगुती आणि सार्वजनिक स्वरूपात सादर केले जातात. लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या या उत्सवाचीही आता एक प्रकारे परंपरा झाली आहे. सव्वाशे वर्षांपूर्वी या उत्सवाची सुरुवात झाली. लोकमान्य टिळकांनी काळाची गरज म्हणून गणपतीला देवघरातून सार्वजनिक मंडपात आणले. पुण्यात हा उत्सव सुरू झाला. थोड्याच काळात संपूर्ण महाराष्ट्राने तो आपलासा केला. आज महाराष्ट्रातील प्रत्येक गावात, शहरात शतकपूर्ती केलेले सार्वजनिक गणेश मंडळ आहे. फार पूर्वी या उत्सवाच्या निमित्ताने मेळे होत. पोवाड्यांचे जाहीर कार्यक्रम व्हायचे. तत्कालीन ब्रिटिश सरकराच्या विरोधात वातावरण तयार करायला त्यांचा मोठा हातभार लागला. स्वातंत्र्यानंतर त्याची जागा व्याख्यानांनी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी घेतली. काळाच्या ओघात या उत्सवाने अनेक बदल पाहिले. आताही अनेक बदल झाले आहेत. पण उत्सव सुरू करण्याचा टिळकांचा तेव्हाचा उद्देश आणि आताचा उद्देश यामध्ये फरक करून वेगळ्या परंपरा निर्माण करायला हव्यात. त्यातील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे उत्सवातील परस्पर विरोधाभास दूर करायला हवेत.
उत्सवांच्या देखाव्यांमधून समाजाचे प्रबोधन करणे खूपच उपयुक्त आहे, पण माहिती आणि मनोरंजनाच्या माध्यमात झालेल्या क्रांतीमुळे या देखाव्यांचा लोकमानसावर किती परिणाम होतो, याचाही विचार करावा लागेल. दुसरीकडे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाचे रक्षण खरोखरीच होते का, पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचतो का, लोक त्याचा अंगीकार करतात का, याचाही गांभीर्याने विचार करायला हवा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जात असतानाच मोठ्या प्रमाणावर फटाके वाजवले जातात. उत्सव पर्यावरणपूरक असेल, तर त्यात फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर होणारे प्रदूषण हा विरोधाभास नाही का? त्यात बदल व्हायला हवा. नैसर्गिक फुले, पाने, फळांचा वापर केला पाहिजे, तो वाढला पाहिजे, असे सांगितले जात असतानाच देखाव्यांसाठी कृत्रिम कागदी आणि प्लास्टिकचे सजावटीचे साहित्य मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. प्रदूषण करणारे असे साहित्य वापरू नये, असा संदेश देणाऱ्या देखाव्यांकरिता त्याच प्रदूषणकारी साहित्याचा वापर केला, तर त्याचा काय उपयोग?
गणेशोत्सवातील असे अनेक विरोधाभास सांगता येतील. ते दूर व्हायला हवेत. मूर्तींची उंची, त्यासाठी वापरले जाणारी माहिती, इतर साहित्य, रंग, सजावटीसाठी वापरले जाणारे साहित्य ध्वनिप्रदूषणकारी वाद्यवृंद, जनजागृती फेऱ्यांसाठी म्हणून वापरली जाणारी प्रदूषणकारी वाहने ही सारी याच विरोधाभासाची उदाहरणे आहेत. याबाबतच आता मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची गरज आहे, त्यासाठी आधुनिक प्रसारमाध्यमांचा उपयोग मोठ्या खुबीने करावा लागेल. पुढच्या काळातील उत्सवांसमोरचे हेच मोठे आव्हान आहे. ते पेलले जायला हवे. पूर्वीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे ही आता गरज राहिली नसेल, तर नवीन नक्की काय करता येईल, याचा विचार व्हावा. या उत्सवाचा हेतू आणि प्रयोजन यांची उजळणी करण्याची वेळ आली आहे. अन्यथा देखाव्यांची परंपरा चालू राहील. एक इव्हेंट साजरा केल्याचे समाधान सार्वजनिक उत्सवातील कार्यकर्त्यांना आणि घरोघरच्या यजमानांना मिळेल. पर्यावरणपूरक उत्सवाचे घोषवाक्य घोकले जाईल, पण मूळ उद्देश सफलच होणार नाही. तो दूरच राहील. एकत्र न येणारा समाज उत्सवाच्या निमित्ताने आजही एकत्र येत असेल, तर त्याला नवे वळण, नवी दिशा देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करावा लागेल.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ९ सप्टेंबर २०२२)
(साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

साप्ताहिक कोकण मीडिया – ९ सप्टेंबर २०२२ चा अंक

मॅग्झटर लिंक : https://bit.ly/3D7BM19
या अंकात काय वाचाल?
अग्रलेख : गणेशोत्सवातील विरोधाभास https://kokanmedia.in/2022/09/09/skmeditorial9sep
मुखपृष्ठकथा : जाता पंढरीसी सुख वाटे जीवा : संत सेना महाराजांविषयी मुंबईतील सुभाष लाड यांचा लेख
शिक्षक झालो म्हणून : कणकवली येथील प्रवीण कुबल यांनी लिहिलेला लेख
‘ते’ जोडपे : पुण्यातील शैला माधवी यांचा ललित लेख
अजोड व्यक्तिमत्त्वाचे वळंजू सर : तळेरे येथील निकेत पावसकर यांनी लिहिलेला श्रद्धांजलिपर लेख
सरखेल सेखोजी आंग्रे : अलिबागचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांचा लेख
या व्यतिरिक्त वाचक विचार, व्यंगचित्रे आदी…

