संगमेश्वर : येथील रेल्वेस्थानकातील फलाटाची दुरवस्था झाली असून तो प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे.
गेल्या जुलै महिन्यात कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी संगमेश्वर रेल्वस्थानकावरील फलाट क्र. २ ची पाहणी केली. फलाट अनेक ठिकाणी खचला असून फलाटाची कडा तुटली आहे. हे सर्व त्यांना दाखवले गेले. त्यांनी दुरुस्तीचे आश्वासन दिले, पण आजतागायत त्याकडे रेल्वेच्या प्रशासनाने लक्ष दिलेले नाही.
संगमेश्वर स्थानकावर दिवा सावंतवाडी पॅसेंजर, मुंबई-मडगाव मांडवी आणि तुतारी एक्स्प्रेस या गाड्या अनेक वेळा फलाट क्रमांक दोनवर थांबतात. गाडी पहिल्या फलाटाऐवजी दुसऱ्या फलाटावर येण्याची उद्घोषणा झाली की, सामानासह फलाट क्रमांक दोनवर जाण्यासाठी प्रवाशांची लगबग सुरू होते. अशा लगबीच्या वेळी छोट-मोठे अपघात होतात. पाय मोडून दुखापत होण्याचीही शक्यता असते. गाडीत चढताना आणि उतरतानाही फलाटाच्या तुटलेल्या भागावर पाय दिला गेला, तर प्रवासी त्यावरून तोल जाऊन रुळावरही पडू शकतो. त्यातून आणखी गंभीर अपघात होऊ शकतो. फलाटावरील जमीन अनेक ठिकाणी खचली आहे. त्यामुळे प्रवासी गाडी पकडण्यासाठी फलाटावरून धावू लागला, तरीही तो पडू शकतो. त्यामुळे तो जखमी होऊ शकतो. प्रवाशांसाठी ही अत्यंत गैरसोयीची आणि धोकादायक बाब आहे. नुकत्याच संपलेल्या पावसाळ्यात अनेकांना तोल आणि छत्रीसोबत सामान सावरत या फलाटावरून सुरक्षितरीत्या चालणे खूप त्रासदायक ठरले.
याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्यानुसार त्यांनी पाहणीही केली. तरी फलाट दुरुस्तीच्या दृष्टीने काहीच हालचाली झालेल्या नाहीत. नादुरुस्त फलाटामुळे अपघात झाला, तर कोकण रेल्वे जबाबदारी घेणार का, असा सवाल निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य ग्रुपचे प्रमुख पत्रकार संदेश जिमन यांनी विचारला आहे. फलाटाची दुरुस्ती तातडीने झाली नाही, तर आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.



