संगमेश्वर : कोसुंब (ता. संगमेश्वर) येथील श्री देवी जुगाई क्रीडा मंडळाने जिल्हा कुमार आणि कुमारी कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे.
रत्नागिरी जिल्हा व संगमेश्वर तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ही ४९ वी कुमार, कुमारी गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा येत्या रविवारी (दि. २० नोव्हेंबर) होणार आहे. कोसुंब येथील मुख्य एसटी बसथांब्यानजीकच्या क्रीडांगणावर ही स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेकरिता जिल्ह्यातील प्रत्येक तालुका कबड्डी असोसिएशनमधून प्रत्येक गटातून प्रत्येकी दोन संघ पात्र ठरतील. जिल्हा असोसिएशनने दिलेल्या स्पर्धा कार्यक्रम पत्रिकेनुसार सामने सकाळी ठीक ९ वाजता सुरू होतील. वेळेवर स्पर्धा सुरू होण्याकरिता सर्व तालुका संघांनी सकाळी ठीक ८ वाजता स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.
स्पर्धेसाठी कुमार/कुमारी वय २० वर्षे (०१/०१/२००३ पासून जन्मलेले) कुमार गट मुले वजन ७० किलो, तर मुलींचे वजन ६५ किलो असणाऱ्या खेळाडूंमधून रत्नागिरी जिल्ह्याचा कुमार/ कुमारी संघ निवडला जाणार आहे.
स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंनी सोबत आधार कार्ड, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी, बारावी बोर्ड सर्टिफिकेट), जन्म प्रमाणपत्र आणणे बंधनकारक आहे. बोनाफाइड प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. खोटे प्रमाणपत्र सादर करणाऱ्या खेळाडू, संस्था, तालुका संघटना अथवा शाळेवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा समजून कारवाई होऊ शकते, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
श्री देवी जुगाई क्रीडा मंडळाने स्पर्धेसाठी चार मैदाने तयार केली आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष शैलेश जाधव, उपाध्यक्ष प्रदीप जाधव, सचिव अभिजित कदम, सहसचिव सत्यजित आयरे, खजिनदार अविनाश जाधव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व खेळाडू मेहनत घेत आहेत.


