वेळासच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी कासव जन्मोत्सवाची चाहूल

मंडणगड : वेळास (ता. मंडणगड) येथील समुद्रकिनारी १५ नोव्हेंबर रोजी कासवमित्र देवेंद्र पाटील यांना वाळूमध्ये ऑलिव्ह रिडले सागरी कासवाचे या हंगामातील पहिले घरटे आढळले. त्यामुळे कासवाच्या जन्मोत्सवाची चाहूल लागली आहे. दापोलीचे परिक्षेत्र वन अधिकारी वैभव बोराटे यांनी वेळास येथील कासवमित्रांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.

काल आढळलेल्या घरट्यामध्ये १०२ अंडी आहेत. ऑलिव्ह रिडले कासव विणीच्या हंगामास सुरवात झाल्याने कासवमित्र, वन कर्मचारी आणि वन्यप्राणीमित्रांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील या हंगामातील हे पहिलेच घरटे आहे. गेल्या वर्षी २०२१ मध्ये महाराष्ट्रातील पहिले घरटे रायगड जिल्ह्यातील दिवेआगरजवळील आरवी येथील समुद्रकिनारी आढळले होते. त्यानंतर महाराष्ट्र इतर समुद्रकिनारी कासव घरटे मिळण्यास सुरुवात झाली होती.

गेल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारी एकूण १४ ठिकाणी ऑलिव्ह रिडले सागरी कासवांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात आले. एकूण ३१७ घरटी आढळली. या घरट्यांमध्ये ३३ हजार ६०९ अंडी सापडली. त्या घरट्यांचे आणि अंड्यांचे कासवमित्रांकडून संरक्षण व संवर्धन करून १२ हजार १४ समुद्रकासवाची पिल्ले समुद्रामध्ये सोडण्यात आली.

गेली दोन वर्षे अरबी समुद्रामध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळ व तोक्ते चक्रीवादळामुळे ऑलिव्ह रिडले कासवांचा विणीचा हंगाम लांबणीवर पडला. त्याची सुरुवात डिसेंबरमध्ये झाली. यावर्षी समुद्रामध्ये कोणत्याही प्रकारच्या अनैसर्गिक हालचाली झाल्या नसल्याने नेहमीप्रमणे समुद्री कासवांचा विणीचा हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू झाला असावा, असा अंदाज आहे.

कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करणाऱ्या कासवमित्रांची मार्गदर्शनपर कार्यशाळा दापोली येथे आयोजित करण्यात आली होती. त्यातील प्रशिक्षणानुसार यावर्षीपासून कासवमित्र घरट्यांची नोंदी एम टर्टल अॅपमध्ये करणार असून संबंधितांना तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामुळे कासवांच्या घरट्यांची आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या पिल्लांच्या संख्येची अचूक नोंद होण्यामध्ये सुसूत्रता येईल.

यावर्षी जिल्ह्यात कासव संवर्धन आणि संरक्षणांचे काम विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभाग आणि कांदळवन प्रतिष्ठान (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झाले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply