चिपळूण : ‘कोकणात लोककलेची समृद्ध परंपरा आहे. त्यामुळे लोककला महामंडळ स्थापन करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. कोकणात पर्यटनाच्या अमर्याद संधी आहेत. यासाठीच कोकण विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या माध्यमातून संपूर्ण कोकणाचा कायापालट कालबद्ध रीतीने होऊ शकतो. मुंबई ते सिंधुदुर्गपर्यंत ग्रीनफिल्ड रस्ता तयार झाल्यास पर्यटनवाढीस चालना मिळेल,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. चिपळूणच्या श्री जुना कालभैरव मैदानावर आठ फेब्रुवारीपर्यंत रंगणार असलेल्या पर्यटन, लोककला, सांस्कृतिक, खाद्य महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आज (५ फेब्रुवारी २०२३) दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्रातर्फे हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. (उद्घाटन कार्यक्रमाच्या व्हिडिओ लिंक्स, तसेच क्षणचित्रे शेवटी दिली आहेत.)
या प्रसंगी कार्यक्रमस्थळी राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, ज्येष्ठ साहित्यिक तथा संयोजन समिती अध्यक्ष तानाजी चोरगे, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे मार्गदर्शक प्रकाश देशपांडे, आमदार शेखर निकम, आमदार प्रसाद लाड, आमदार योगेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, लोककलावंत प्रभाकर मोरे, ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत होऊन गेलेल्या रत्नांच्या लोककला प्रदर्शनात लावलेल्या तैलचित्रांचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या तैलचित्रांमध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या तैलचित्राचाही समावेश करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘कोकणात लोककलेची समृद्ध परंपरा आहे. लोककला महोत्सवामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल. गेल्या सहा महिन्यांत या शासनाने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोकण भूमीतील गड-किल्ले, सागरी किनारे, निसर्गसंपन्न वातावरण हे कोकणचे वैभव आहे. मुंबई ते गोवा महामार्गदेखील वेगाने तयार होत आहे. मोबाइलचा वापर वाढत आहे; पण लोककला महोत्सवामुळे तरुण पिढी याकडे वळेल.’
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, ‘मूळच्या कोकणातील असलेल्या आणि सर्व कलाक्षेत्रात प्रसिद्धी मिळालेल्या लोककलाकारांनी कोकणातील नवोदित कलाकारांना सहकार्य करून त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी मदत करावी. असे लोककला महोत्सव रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात व्हावेत आणि ही परंपरा वर्षानुवर्षे चालत राहावी. यासाठी लागेल ते अर्थसाह्य करण्याची ग्वाही देतो.’
या महोत्सवात चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील विविध लोककला सादर होणार आहेत. पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत तारपा, घोळनृत्य, दशावतार, चित्रकृती यांसह विविध कला एकत्र आणल्या जाणार आहेत. रोजची संध्याकाळ विविध लोककलांच्या दर्शनाने सुरू होणार आहे. पर्यटन, लोककला, सांस्कृतिक आणि कोकणी खाद्य अशी कोकणची वैशिष्ट्ये अधोरेखित करणारा हा महोत्सव असून, उर्वरित महाराष्ट्राला किंबहुना भारताला कोकणचा सर्वांगीण परिचय व्हावा, हा या महोत्सवामागचा मुख्य उद्देश आहे.
खाद्य महोत्सवांतर्गत विविध कोकणी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचे स्टॉल असतील. श्री जुना कालभैरव मंदिर अंतर्गत कै. बापू बाबाजी सागावकर मैदानावर उभारण्यात आलेल्या सह्याद्रीनगरात हा महोत्सव होत आहे. अशा महोत्सवांमुळे गोवा आणि केरळकडे असणारा पर्यटकांचा ओघ तितक्याच निसर्गसंपन्न आणि सांस्कृतिक संपन्नता असणाऱ्या आणि परंपरा जपणाऱ्या कोकणाकडे वळण्यास मदत होईल. कोकणचे निसर्गसौंदर्य, खाद्यपदार्थ, सामाजिक, सांस्कृतिक परंपरा आणि मुख्यत: कोकणची लोककला ठळकपणाने जगासमोर यावी, अपरिचित कोकणची ओळख व्हावी आणि पर्यटकांचे पाय कोकणाकडे वळावेत, यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये कोकणाच्या मातीतील अनेक अस्सल लोककला सादर केल्या जाणार आहेत. सिंधुदुर्गातील दशावतार/चित्रकथी, रत्नागिरी जिल्ह्यातील नमन, जाखडी, काटखेळ, गजो, संकासूर रायगड जिल्ह्यातील कोळी नृत्य, ठाणे जिल्ह्यातील तारपा नृत्य अशा ४०हून अधिक लोककला त्यांच्या मूळ रूपात सादर केल्या जाणार आहेत. दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत लोककलांचे सादरीकरण होणार आहे. दररोज सायंकाळी साडेचार ते सहा या वेळेत खुला लोककला कट्टा स्थानिक कलाकारांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय संदर्भपूर्ण माहिती देणारे परिसंवाद दिवसभरात होणार आहेत. कोकणी पदार्थांच्या वैशिष्ट्यपूर्ण चवींचे ३०हून अधिक स्टॉल्स असणारी खाऊगल्लीही चोखंदळ खवय्यांसाठी पर्वणी असणार आहे. हा सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे.
उद्घाटन कार्यक्रमांच्या व्हिडिओ लिंक्स :
https://www.facebook.com/kokanmedia/videos/912043123315914/
https://fb.watch/iu_QU_n2ex/?mibextid=RUbZ1f
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड



















