
दापोली : निःस्वार्थपणे सामाजिक कार्यात सक्रिय, अनेक प्रतिष्ठेच्या पदांवर काम केलेले, अनेक सत्कार, पुरस्कारांनी सन्मानित आदरणीय भिकू रामजी इदाते (दादा) यांना मानाचा पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. त्यांना मानाचा मुजरा करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे येत्या रविवारी (दि. १२ फेब्रुवारी) सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही सायकल फेरी आझाद मैदान येथून सकाळी साडेसात वाजता सुरू होईल. ती रूपनगर- ऐश्वर्यनगर- श्रीगुरूनगर- लष्करवाडी जालगाव- गणेशनगर- आनंदनगर- उदयनगर मार्गे पुन्हा आझाद मैदान अशी ६ किलोमीटरची असेल. फेरीचा समारोप आझाद मैदान येथे सकाळी साडेनऊ वाजता होईल. या सायकलफेरीदरम्यान जालगावच्या आनंदनगरात दादांच्या घरी जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेतले जाईल. तसेच त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेण्यात येईल.
या फेरीसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. सर्व वयोगटातील सायकलप्रेमी सहभागी होऊ शकतील. अधिक माहितीसाठी ८७६७६५०५३७ किंवा ९०२२८७४८८१ या क्रमांकांवर संपर्क साधावा. सायकल संस्कृती वाढावी आणि सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी, या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे सायकलविषयक अनेक उपक्रम विनामूल्य राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी सायकल फेरी आयोजित केली आहे. सर्वांनी त्यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हावे आणि आपल्या दैनंदिन जीवनातही सायकलचा अधिक वापर करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

