
तळवडे (ता. राजापूर) : येथे राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाच्या आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात चिपळूण येथील नामवंत कवी, बोलीभाषांचे अभ्यासक आणि समीक्षक अरुण गजानन इंगवले यांची विशेष मुलाखत रंगणार आहे. संमेलनात शनिवारी (दि. ११ फेब्रुवारी) दुपारनंतरच्या ‘साहित्यविचार’ सत्रात पत्रकार-लेखक धीरज वाटेकर इंगवले यांची मुलाखत घेणार आहेत.
नुकत्याच विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त वर्धा येथे झालेल्या, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ग्रंथालय चळवळींचे यशापयश या विषयावरील परिसंवादात मान्यवर वक्ते म्हणून श्री. इंगवले सहभागी झाले होते. त्यांचे यापूर्वी सहा एकांकिका, एक नाटक आणि २ कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘आबूट घेऱ्यातला सूर्य’ला आजपर्यंत १५ हून अधिक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले असून त्यांच्या एकांकिकांनाही ३ राज्य पुरस्कार मिळाले आहेत. कोकणातील तिल्लोरी बोलीवर इंगवले यांचे संशोधन सुरू असून त्यांनी या बोलीतील सुमारे दहा हजार शब्द संकलित केले आहेत. पुण्यात २०१९ साली झालेल्या अखिल भारतीय श्री संत संताजी व संत साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. पेडणे (गोवा) येथे झालेल्या गोमंतक साहित्य मंडळाच्या अखिल भारतीय संमेलनातील कविसंमेलनाचे अध्यक्षपदही इंगवले यांनी भूषविले होते. इंगवले गेल्या चार दशकांहून अधिक काळ काव्यलेखन करीत आहेत. इंगवलेंची कविता म्हणजे निव्वळ अभिव्यक्ती नाही, तर ते सध्याच्या काळावरचे अमूल्य चिंतन आहे. त्यांच्या कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहिताना प्रसिद्ध लेखक-समीक्षक स्व. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी या कवितांचे वर्णन एकविसाव्या शतकावरील समर्थ भाष्य असे केले होते. इंदूर येथील आपले वाचनालय आणि श्री सर्वोत्तम यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या अखिल भारतीय वसंत राशिनकर वार्षिक स्मृति सन्मानासाठीही इंगवले यांच्या ‘आबूट घेऱ्यातील सूर्य’ याच काव्य कलाकृतीची निवड करण्यात आली होती. साप्ताहिक विवेकसमूह संचालित ‘विवेक साहित्य मंच’ने बोलीभाषेच्या संवर्धनासाठी आयोजित केलेल्या कथालेखन स्पर्धेतही इंगवले यांनी लिहिलेल्या ‘कोंडीवरला बावा’ या कथेला सन्मानित करण्यात आले होते.
चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या साहित्य पुरस्कार समितीचे श्री. इंगवले प्रमुख आहेत. या वाचनालयाचे पुरस्कार राज्यभर प्रतिष्ठेचे मानले जातात. वाचनालयाचे मुखपत्र असलेल्या कविवर्य द्वारकानाथ शेंडे यांच्या देणगीतून चालविल्या जाणाऱ्या ‘मृदंगी’ त्रैमासिकाचे ते संपादक आहेत. सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व लाभलेले अरुण इंगवले साहित्य क्षेत्रातील कोकणातील एक सक्रिय कार्यकर्ते आहेत. दर्जेदार साहित्यनिर्मिती करताना तत्त्वनिष्ठा बाळगणारे इंगवले राज्यातील साहित्यिकांच्या मांदियाळीत उठून दिसणारे कोकणी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या मुलाखतीतून त्यांचा साहित्यप्रवास उलगडणार आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

