रत्नागिरीत स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताहाचा दुचाकी फेरीने प्रारंभ

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४०व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या विचार जागरण सप्ताहाचा प्रारंभ आज (दि. २१ मे) रत्नागिरीत दुचाकी फेरीने करण्यात आला.

महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय, विवेक व्यासपीठ, पतितपावन मंदिर आणि श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीमध्ये आजपासून सावरकर विचार जागरण सप्ताहाला सुरवात झाली. लक्ष्मी चौक येथे जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी वीर सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि श्रीफळ वाढवून दुचाकी फेरीला प्रारंभ करून दिला. त्यानंतर भगवे ध्वज घेऊन शिरगावच्या हनुमान मंदिरापर्यंत दुचाकी फेरी काढण्यात आली.

या फेरीत शंभरहून अधिक दुचाकीस्वार सहभागी झाले. भगव्या झेंड्यांमुळे वातावरण भगवेमय झाले. वीर सावरकरांचा विजय असो, दानशूर भागोजीशेठ कीर यांचा जयजयकार असो असा जयघोष करत ही फेरी हनुमान मंदिरात पोहोचली.
श्री हनुमान मंदिरामध्ये हनुमंताला अभिवादन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते हेमंत जोशी यांनी छोटेखानी व्याख्यान दिले. ते म्हणाले की, ब्रिटिशांनी सावरकरांना रत्नागिरीमध्ये राजकीय बंदी म्हणून आणले. पण त्या वेळी रत्नागिरीत प्लेगची साथ असल्यामुळे त्यांना शिरगावात दामले यांच्या निवासस्थानी ठेवले होते. या सहा-सात महिन्यांत सावरकरांनी हिंदूंची मोट बांधली. सावरकर सर्व शिरगाववासीयांचे झाले. कै. विष्णुपंत दामले यांच्या निवासस्थानी सावरकर वास्तव्यास होते. त्यांच्याकडून मला सावरकरांच्या गोष्टी ऐकण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य समजतो. सावरकरांच्या विनंतीवरून हिंदू धर्मातील सर्व महिलांचे हळदीकुंकू झाले. बाबा शिरगावकर यांच्या घरी सत्यनारायण पूजेसाठीही सावरकर हे लहान मुलांना घेऊन गेले होते. मराठी शाळेत सवर्ण व अस्पृश्यांची मुलांना बसण्यास वेगळी व्यवस्था होती. परंतु सावरकरांच्या विनंतीनंतर सर्व मुले एकत्र बसू लागली. शिरगावातील हनुमान मंदिर ऐतिहासिक आहे. सन १९२५ मध्ये महादेवबुवा ऊर्फ साधू लिंगायत यांनी शिरगावात हनुमान मंदिर उभारले. वीर सावरकरांनी सर्व हिंदू एकत्र येणार असले तरच मंदिराच्या उद्घाटनाला येतो, अशी अट घातली. ती मान्य झाल्यावर वीर सावरकरांनी रात्री जागून तुम्ही आम्ही सकल बंधू हिंदु हिंदु हे गीत रचले. उद्घाटनाच्या दिवशी हे गीत सुरेल आवाजात सर्वांनी म्हटले. सहा-सात महिन्यांत वीर सावरकरांनी सामाजिक समरसता कृतीतून दाखवून दिल्याचे हेमंत जोशी यांनी सांगितले.

शिरगावच्या गायवाडी येथील कै. विष्णुपंत दामले यांच्या निवासस्थानीही सावरकरप्रेमींनी आज भेट देऊन अभिवादन केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply