रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या काव्यावर आधारित कथ्थक चा कार्यक्रम रविवारी (दि. २८ मे) रत्नागिरीतील कथ्थक नृत्यशिक्षिका सोनम जाधव सादर करणार आहेत.
कार्यक्रमाची संकल्पना कथ्थक गुरू सौ. सोनम जाधव यांची आहे. कथ्थक नृत्याद्वारे अनेक देवदेवतांची स्तुती केली जाते. त्यांना नृत्यरूपी वंदन केले जाते. ते करत असतानाच भारतीय स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारक, राजकारणी, वकील, कवी, लेखक, नाटककार, समाजसुधारक, हिंदू तत्त्वज्ञ, भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धीचे प्रणेते सावरकर यांच्यावर आधारित नृत्याविष्कार करावा, असे सौ. जाधव यांच्या मनात होते. सावरकर म्हणजे हिंदुत्व या संकल्पनेचे प्रणेते होते. सर्वसमावेशक हिंदुत्व मांडणारे होते. सावरकरांच्या मतानुसार सिंधू नदीपासून हिंदी महासागरापर्यंत पसरलेली भारतभूमी ज्यांची मातृ-पितृभूमी आहे, ते सर्व जण हिंदूच आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ब्रिटिश सरकारने अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रद काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यांसमोर मातृभूचे स्वातंत्र्य हे एकच ध्येय होते. तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.
सावरकरांच्या १४० व्या जयंतीचे औचित्य साधून त्यातील काही काव्यांवर त्यांच्या जयंतीच्या दिवशी, २८ मे रोजी नटराज कथ्थक नृत्य क्लासेसतर्फे अनादी मी अनंत मी हा कार्यक्रम करण्यात येणार आहे. नटराज कथ्थक नृत्य क्लासेसची स्थापना २०११ साली झाली. या क्लासतर्फे कुवारबाव तसेच रत्नागिरीत मारुती मंदिर आणि टिळक आळी येथे नृत्य वर्ग चालविले जातात. गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेसाठी संगीतसाथीदारांसह कसून तयारी केली जाते. प्रारंभिक ते विशारदपर्यंत शास्त्रीय कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण तेथे दिले जाते. तेथे १०० हून अधिक विद्यार्थी शास्त्रीय नृत्याचे शिक्षण घेत आहेत. नृत्यकलेबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासाकरिता नृत्याचा उपयोग करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. विविध कथ्थक नृत्य शिबिरांचे आयोजन केले जाते. विविध शाळांमधून कथ्थक नृत्याचे मार्गदर्शनही केले जाते. वार्षिक स्नेहसंमेलन, गुरुपौर्णिमा आदी वार्षिक कार्यक्रम या क्लासतर्फे केले जातात.
याच नटराज कथ्थक क्लासच्या संचालिका सौ. सोनल जाधव यांच्या बरोबरीने २५ विद्यार्थी रविवारचा कार्यक्रम सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन निबंध कानिटकर करणार आहेत. रविवारी सायंकाळी पाच वाजता रत्नागिरीत शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिर रंगमंचावर होणाऱ्या या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन स्वा. सावरकरांना श्रद्धांजली वाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड