रत्नागिरी : प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन या आघाडीच्या गायक जोडीने विनायका रे या संगीत कार्यक्रमातून स्वा. वि. दा. सावरकर यांना आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र शासनाचे पर्यटन संचालनालय, विवेक व्यासपीठ, रत्नागिरीतील पतितपावन मंदिर संस्था आणि श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त आठवडाभर सावरकरांना विविध कार्यक्रमांतून अभिवादन केले. त्यात विनायका रे या कार्यक्रमाचा समावेश होता. हा कार्यक्रम २७ मे रोजी सायंकाळी स्वा. सावरकर नाट्यगृहात झाला.
कार्यक्रमात सुरवातीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते गायक प्रथमेश लघाटे आणि सामाजिक कार्यकर्ते महेंद्र साळवी यांच्या हस्ते गायिका मुग्धा वैशंपायन हिचा सन्मान करण्यात आला. मुग्धा वैशंपायन हिने ने मजसी ने, हे मातृभूमी तुजला मन वाहियेले, हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, जयदेव जयदेव जय जय शिवराया, अनादि मी अनंत मी, विनायका रे ही गीते सुरेल आवाजात म्हटली. याशिवाय बोलावा विठ्ठल, पद्मनाभा नारायणा या अभंगांनी रसिकांची मने जिंकली. प्रथमेश लघाटे याने शतजन्म शोधिताना, जय देव जय देव जय जय शिवराया, परवशता पाश दैवे ही गीते ताकदीने सादर केली. दोन्ही गायकांनी फर्माईश केलेली गीते सादर केली. नाट्यगृहातील ८०० रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ने मजसि ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला या अजरामर गीताच्या सादरीकरणावेळी प्रेक्षागृहातील सर्व प्रेक्षकांनी उभे राहून वीर सावरकरांना मानवंदना दिली. रत्नागिरीमध्ये काही काळ वास्तव्यास असलेल्या वीर सावरकरांनी सामाजिक क्रांती केली. नाटके, महाकाव्ये रत्नागिरीत लिहिली. सावरकरांना अभिवादन करण्याकरिता रत्नागिरीचा युवा गीतकार कौस्तुभ आठल्ये याने लिहिलेले विनायका रे हे गीत मुग्धा, प्रथमेशने सुरेख सादर केले. हे गीत यापूर्वीच प्रदर्शित झाले असून याचे सर्व चित्रीकरण शिरगाव आणि रत्नागिरीत केले आहे. संगीत मुग्धाने दिले असून ध्वनिमुद्रण एस. कुमार साउंड यांनी दिल्याचे मुग्धाने सांगितले.
कार्यक्रमाचे निवेदन धनश्री मारोटकर यांनी केले. रूपक वझे (तबला), मिलिंद लिंगायत (पखवाज), हर्षल काटदरे (संवादिनी), राजन किल्लेकर (कीबोर्ड), प्रसन्ना लघाटे, अथर्व चांदोरकर (साइड ऱ्हिदम) यांनी संगीतसाथ केली. ध्वनिव्यवस्थापन एस. कुमार्स साऊंड यांनी अतिशय उत्तम केले. सर्व कलाकारांचे स्वागत संयोजक रवींद्र भोवड, तनया शिवलकर, केशव भट, गौरांग आगाशे, मनोज पाटणकर, अॅड. विनय आंबुलकर, संजय जोशी, मंगेश मोभारकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. दीप्ती आगाशे यांनी केले. कार्यक्रमाचे नेटके आयोजन करण्यात आले. नाट्यगृहाचे व्यवस्थापक श्री. मयेकर यांचे विशेष आभार मानण्यात आले.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

