रत्नागिरी : शोभायात्रा आणि पतितपावन मंदिरातील सहभोजनाने सावरकर विचार जागरण सप्ताहाची आज रत्नागिरीत सांगता झाली. वीर सावरकरांना अभिवादन करण्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री उदय सामंत, पद्मश्री भिकुजी इदाते उपस्थित होते.
राज्य शासनाने वीरभूमी परिक्रमेअंतर्गत पर्यटन संचालनालय, मुंबईतील विवेक व्यासपीठ, पतितपावन मंदिर संस्था आणि श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर विचार जागरण सप्ताह आयोजित केला होता. शोभायात्रा आणि सहभोजनाने त्याचीच सांगता झाली. सकाळी ८ वाजता रत्नागिरीच्या विशेष कारागृहात शहराच्या विविध भागांतून हिंदुत्वाची ज्योत घेऊन शेकडो सावरकर प्रेमी आणि हिंदु बंधू-भगिनी यात्रेकरिता दाखल झाले. त्यानंतर कारागृहात वीर सावरकरांच्या स्मारकास भेट देऊन अभिवादन करण्यात आले. नंतर ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शोभायात्रेस सुरवात करण्यात आली.
वीर सावरकरांचा विजय असो, हिंदुत्वाचा जयजयकार अशा घोषणा देत आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १४० व्या जयंतीनिमित्त येथील विशेष कारागृहातील वीर सावरकर स्मारक ते ऐतिहासिक पतितपावन मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात्रेत हिंदुत्व ग्रंथ चित्ररथ, अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळ आणि रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे वीर सावरकरांच्या बालपणीचा सजीव देखावा, प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या भगिनी, हिंदु जनजागृती समितीचा राष्ट्रपुरुषांचा देखावा, पतितपावन मंदिर संस्थेचा वीर सावरकरांच्या प्रतिमेचा रथ, दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या प्रतिमेचा व सहभोजनाचा चित्ररथ सहभागी झाला. मिऱ्या येथील महिला आणि तोणदे येथील ढोल-ताशांच्या पथकाने सर्वांची मने जिंकली. भगवे ध्वज, मी सावरकर असे लिहिलेल्या भगव्या टोप्या शेकडो युवक, महिला, मुले शोभायात्रेत सहभागी झाले. यात्रेवेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जयस्तंभ येथे माऊली अॅक्वातर्फे पाणीवाटप, एसटी स्टॅंड येथे गणेश धुरी यांच्यातर्फे ताकवाटप करण्यात आले. राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता, महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनीही शोभायात्रेत सहभाग घेऊन लक्ष्मी चौक येथे वीर सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
शोभायात्रा पतितपावन मंदिराकडे आल्यानंतर यात्रेची सांगता झाली. दानशूर भागोजीशेठ कीर यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले. हिंदुशक्ती वाढण्याकरिता व सप्तबंदीच्या बेडीतून हिंदू धर्म व्यापक होण्याकरिता वीर सावरकरांनी सहभोजनाचे कार्यक्रम सुरू केले. पहिले सहभोजन १९३० मध्ये झाले होते. या प्रकारचे सहभोजन शोभायात्रेच्या सांगतेनंतर पतितपावन मंदिरात करण्यात आले. याला हजारो लोकांची गर्दी झाली. भोजनाकरिता आमटी-भात, शिरा, वांगे, पावटा व शेवग्याची भाजी आणि ताक असा बेत होता. त्यामध्ये सर्व हिंदु बंधू-भगिनी सहभागी झाले. या सहभोजनात पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढासुद्धा सहभागी झाले. त्यांनी सर्वांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला. तसेच जेवणानंतर पत्रावळ स्वतः उचलली. आपण मंत्री आहे, असे न दाखवता सामान्य व्यक्तींप्रमाणे सहभोजनात भाग घेतला. त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, सचिन वहाळकर, मुन्ना चवंडे, उमेश कुळकर्णी आदी उपस्थित होते.
शोभायात्रेचे नियोजन जागरण सप्ताहाचे संयोजक रवींद्र भोवड, अॅड. बाबा परुळेकर, उन्मेष शिंदे, मंदार खेडेकर, उमेश खंडकर, अॅड. विनय आंबुलकर, मंगेश मोभारकर, मंदार खेडेकर, संदीप रसाळ, तनया शिवलकर, केशव भट, गौरांग आगाशे, संतोष पावरी, संजय जोशी, समीर करमरकर, भरत इदाते आदी मंडळींनी यशस्वीपणे केले.





कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड