कालिदासाच्या मेघदूताचे सध्याच्या हवामानातील साम्य तपासण्याचा प्रयत्न

रत्नागिरी : कालिदासाच्या मेघदूताचा सध्याच्या हवामानातील साम्य तपासण्याचा प्रयत्न करणारे अभ्यासपूर्ण विवेचन आणि कालिदासाच्या इतर साहित्याचाही परामर्ष घेणारा कार्यक्रम कालिदास दिनी रत्नागिरीत झाला.

दरवर्षी आषाढ शुद्ध प्रतिपदेला सर्वत्र कालिदासाच्या साहित्याचा गौरव करून कालिदास दिन साजरा केला जातो. येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातही दरवर्षीप्रमाणेच कालिदास दिन साजरा झाला. महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे महाविद्यालयात संस्कृत विषयात एम्. ए. पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले विचार व्यक्त करतात. यावर्षी ही संधी सुखदा ताटके, प्रियांका ढोकरे आणि स्वरूप काणे या विद्यार्थ्यांनी घेतली आणि आपले कालिदासाविषयीचे विचार व्यक्त केले.

स्वरूप काणे याने कालिदासाच्या मेघदूतातील निवडक संदर्भ देत सध्याच्या भौगोलिक परिस्थितीशी कालिदासाच्या विचारातील असलेले साम्य अभ्यासण्याचा प्रयत्न केला. सुखदा ताटके हिने कुमारसंभवातील निसर्गवर्णनाचा अभ्यास करताना त्यातील नद्या, पर्वत आणि विविध नैसर्गिक घटकांचा परिचय करून दिला. प्रियांका ढोकरे हिने कालिदासाची नाटके, महाकाव्य, लघुकाव्य यातील निवडक संदर्भ देत दाखवत कालिदासाचा भूगोलाचा अभ्यास स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.

कार्यक्रमाची सुरुवात द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी कल्पजा जोगळेकर आणि मीरा काळे यांनी कालिदासाच्या साहित्यातील निवडक श्लोक गायनाने केली. संस्कृत विभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांचा परिचय आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील कालिदास दिनाची परंपरा याविषयी प्रा. जयंत अभ्यंकर यांनी माहिती दिली. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले की, विद्यार्थ्यांनी संस्कृतचा आणि संशोधनाचा वारसा पुढे न्यावा. नवीन शैक्षणिक धोरणामधील कौशल्याधारित शिक्षणाची संधी प्राप्त करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रा. स्नेहा शिवलकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून आभार प्रदर्शन केले आणि शांतिमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कुमारी गौरी सावंत हिने सूत्रसंचालन केले.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply