रत्नागिरी : पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले भाविक, खांद्यावर पताका आणि डोक्यावर तुळशी वृंदावन, जोडीला टाळ-मृदंगाच्या साथीने सुरू असलेला विठूनामाचा गजर असे विठ्ठलमय वातावरण आज (२९ जून २०२३) रत्नागिरीत आषाढी वारीमुळे निर्माण झाले होते. रत्नागिरीचे शक्तिमंदिर म्हणजेच मारुती मंदिर इथे मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या भाविकांची दिंडी विठुरायाचा जयजयकार करत रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिरात पांडुरंगाच्या भेटीला गेली. (व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिला आहे.)
पारंपरिक वेशात सहभागी होऊन बहुसंख्य जणांनी वारीचा आनंद लुटला. इच्छा असूनही पंढरीच्या वारीत सहभागी होणे सर्वांनाच शक्य होते असे नाही. म्हणूनच गेल्या वर्षी रत्नागिरीमध्ये प्रथम आषाढवारीचे आयोजन करण्यात आले. यंदाही त्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
चांदीच्या पादुकांची पालखी फुलांनी सजवण्यात आली होती. मारुती मंदिरमधून वारी निघाल्यानंतर नामजप, विठुरायाची भजने, आरत्या म्हटल्या जात होत्या आणि हिंदु धर्माचा जयजयकार सुरू होता. पुरुषांनी पारंपरिक पांढरे झब्बे लेंगे घातले होते. तसेच पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसून महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. माळनाका, जयस्तंभ, एसटी स्टॅंड, राम आळी, गोखले नाक्यावरून विठ्ठल मंदिरापर्यंत जाईपर्यंत भाविकांचा उत्साह वाढतच चालला होता. पुरुषांनी खांद्यावर पताका आणि महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले होते. काहींनी टाळ-मृदंगाची साथ केली आणि मुखात अखंड हरिनामाचा गजर सुरू होता. यामुळे अवघे वातावरण विठ्ठलमय झाले. माळनाक्याला रिंगणही करण्यात आले.
फोटोज पाहा खालील लिंकवर… https://bit.ly/3O34up3
वारीची झलक दर्शविणारा व्हिडिओ पुढील लिंकवर…

