रत्नागिरी नगर वाचनालयात विद्यार्थ्यांसाठी पुस्तक प्रदर्शन

रत्नागिरी : विद्यार्थ्यांचे मन पुस्तकांकडे आकृष्ट करून त्यांच्यामध्ये वाचन संस्कार प्रबळ व्हावा, या उद्देशाने रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. त्याचा प्रारंभ आज झाला.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत नगर वाचनालयाने विद्यार्थ्यांसाठी पुस्तक प्रदर्शन, पुस्तक विक्री, व्याख्यानमाला, निबंध स्पर्धा असे भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत. आज पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन अॅड. दीपक पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अॅड. पटवर्धन म्हणाले, विद्यार्थिवर्गात अवांतर वाचनाची आवड निर्माण करणे आवश्यक आहे. वाचन संस्कार जागवण्यासाठी मुलांना पुस्तकांकडे आकर्षित करून विद्यार्थ्यांना पुस्तक मित्र बनवण्याची जबाबदारी पालकांची, गुरुजनांची, त्याचबरोबर वाचनालयांसारख्या संस्थांचीही आहे. हाच उद्देश नजरेसमोर ठेवून पाचशे पुस्तकांचे प्रदर्शन आजपासून १२ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. दररोज सकाळी साडेनऊ ते दुपारी १२ आणि दुपारी साडेतीन ते सायंकाळी साडेसहा या कालावधीत प्रदर्शन सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. त्यासाठी रत्नागिरी शहरातील सर्व शाळा हायस्कूल आणि प्राथमिक शाळांनीही विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावे, असे आवाहनही श्री. पटवर्धन यांनी केले.

याच उपक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती देऊन त्यांच्याशी मुक्त संवाद साधण्याच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत ही व्याख्याने होतील.

पुस्तक प्रदर्शनाबरोबर सवलतीच्या दरात पुस्तक विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. पुस्तक हा मध्यवर्ती विषय ठेवून निबंध स्पर्धाही आयोजित केली आहे. या सर्वांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शिक्षक, पालकवर्गाने मुलांना प्रदर्शन पाहण्यासाठी उद्युक्त करावे. विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने पुस्तकांशी मैत्री करण्यासाठी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. पटवर्धन यांनी उद्घाटन प्रसंगी केले.

यावेळी आनंद पाटणकर, शेखर पटवर्धन, मुन्ना चवंडे, शकील मजगावकर, अण्णा करमरकर, विजय सालीम, किसन घाणेकर यांच्यासह वाचनालयाचा कर्मचारीवृंद उपस्थित होता.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply