रत्नागिरी नगर वाचनालयाच्या ग्रंथसखा पुरस्कारांचे वितरण

रत्नागिरी : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात ग्रंथसखा पुरस्कारांचे वितरण, तसेच विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धा, पुस्तक परीक्षण स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी पुस्तक प्रदर्शन आयोजित केले होते. विविध शाळांमधून ३५० विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. ‘मी प्रदर्शनात पाहिलेली पुस्तके’, ‘पुस्तके माझे मित्र’ आणि ‘मला आवडलेले पुस्तक’ या विषयांवर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत शाल्मली प्रसाद रांजणकर, सुमुख सचिन काळे व ओजस महेश शिवलकर यांना अनुक्रमे पहिले तीन क्रमांक देण्यात आले. खुशी शिरधनकरला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. पुस्तक परीक्षण स्पर्धेत शार्दूल साळवी, आर्वी ज्ञानेश कुलकर्णी, आर्या कारेकर, नंदिता हळदणकर, शुभवी गानू, कुमार ओम भारती यांना गुणानुक्रमे पारितोषिके देण्यात आली. ग्रंथसखा पुरस्कार सोहळा सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आला होता. सातत्यपूर्ण आणि विविध विषयांवर वाचन करणाऱ्या अकरा वाचकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार शिरीष दामले, डॉ. निनाद नाफडे, श्रीकांत रिसबूड, आनंद तापेकर, प्रवीण रेडीज, सुमन कोलपटे, किमया घुडे, संजय शिवलकर, जमीर तांबोळी, अॅड. श्रीकांत भाटवडेकर यांचा त्यात समावेश होता. पुरस्कारप्राप्त वाचकांनी आपल्या जीवनात पुस्तकाचे आणि वाचनालयाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे आवर्जून सांगितले. वाचनालयाचे जुने सभासद श्रीकांत रिसबूड यांनी वाचनालयाला पाच हजाराची देणगी दिली.

याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले की, पुस्तक आणि वाचक हे ऐवज ग्रंथालयासाठी खूप मौल्यवान आहे. वाचन संस्कृती प्रवाहित ठेवण्याच्या उपक्रमांना वाचकांचा प्रतिसाद मिळवण्यासाठी वाचनालय सतत प्रयत्नशील आहे. वाचनालये स्वतंत्रपणे चालवली जातात. वाचनालयासाठी आर्थिक साह्य देण्यासाठी समाजघटकांनी पुढे यावे. ‘सर्वांत जुने पण सर्वांत अद्ययावत वाचनालय’ अशी ओळख निर्माण करण्यात काही अंशी यश आले आहे. सुज्ञ वाचकवर्ग ही दौलत जपणे महत्त्वाचे आहे. सुज्ञ वाचकांचा ग्रंथकट्टा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यात सहभगी व्हावे.

सुमुख काळे या लहानग्याने ‘मी वाचलेले पहिले पुस्तक – अंकलिपी’ हा लिहिलेला निबंध खूप उद्बोधक असल्याच सांगत विद्यार्थ्यांना वाचनालयात येऊन ग्रंथमैत्रीसाठी पालक, शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. पटवर्धन यांनी केले. वाचनालय शाळाशाळांमध्ये फिरते. वाचनालय ही संकल्पना राबवण्याची योजना तयार करत असल्याचे अॅड. पटवर्धन यांनी सांगितले. वाचनालयात मनपसंत पुस्तके खरेदीसाठी उपलब्ध आहेत. दिवाळीपासून ग्रंथालयाच्या प्रांगणात पुस्तक विक्रीचा कायम स्टॉल सुरू करणार आहोत, असे सांगत वाचनालयापुढची आव्हाने, नवे उपक्रम याबाबतही त्यांनी ऊहापोह केला.

कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष संतोष प्रभू, कार्यवाह आनंद पाटणकर व मालती खवळे, सदस्य शेखर पटवर्धन आणि वाचनालयाचे सर्व कर्मचारी तसेच पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply