वन्यजीव सप्ताहानिमित्त रत्नागिरीत विविध उपक्रम

रत्नागिरी : वन्यजीव सप्ताहानिमित्त लेन्स आर्ट रत्नागिरी, निसर्ग सोबती आणि सह्याद्री संकल्प सोसायटीच्या पुढाकाराने २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रत्नागिरीतील वन्यजीव प्रेमींसाठी राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमातून “निसर्ग सोबती” या नेचर क्लबची स्थापना व लोगोचे अनावरण करण्यात येणार आहे. या उपक्रमात वन्यजीव व जैवविविधतेचे संवर्धन याविषयी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

प्रारंभी २ ऑक्टोबर रोजी या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन सकाळी १०.३० वाजता गोगटे कॉलेजच्या राधाबाई शेटे सभागृहात होईल. त्याच दिवशी जिल्ह्यातील जैवविविधता, विविध प्रजाती, त्यांचे अधिवास व संवर्धन याबाबत तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार असून त्यासाठी सृष्टीसंवर्धन फाऊंडेशनचे विशाल भावे व सह्याद्री संकल्प सोसायटीचे प्रतीक मोरे व निसर्ग मित्रमंडळ संस्थेतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत “निसर्ग सोबती” या क्लबचे उद्घाटन व रूपरेषा कथन केली जाईल. रत्नागिरीतील अशा स्वरूपाचा, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात, दऱ्याखोऱ्यात काम करणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊन तयार झालेला हा पहिला वहिला उपक्रम असल्याची माहिती निसर्ग सोबतीच्या प्रमुख निखिता शिंदे यांनी दिली.

या उपक्रमातून वन्यजीव ज्यात प्रामुख्याने पक्षी, प्राणी, सरपटणारे प्राणी आणि फुलपाखरे आणि कीटक असे चार विभाग होतात. अशा नानाविध प्रजातींची ओळख, त्यांचे राहणीमान, त्यांना आवश्यक व पोषक असे विशिष्ट वातावरण आणि त्यांचे संवर्धन याची माहिती तरुण पिढीला निश्चितच होईल, असा विश्वास सह्याद्री संकल्प सोसायटीच्या प्रतीक मोरे यांनी व्यक्त केला.

वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून ६ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत रत्नागिरीतील जैवविविधता आणि वन्यजीव या विषयावर लेन्स आर्ट तर्फे निवडक २५० फोटोंचे प्रदर्शन पटवर्धन हायस्कूलमध्ये लावण्यात येणार असून याच कालावधीत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली “नेचर ट्रेलचे देखील आयोजन करण्यात येणार असल्याचे लेन्स आर्टचे सिद्धेश वैद्य यांनी सांगितले.

या उपक्रमांचा लाभ रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालये आणि सर्व निसर्गप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन निसर्ग सोबती, लेन्स आर्ट रत्नागिरी आणि सह्याद्री संकल्प संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply