बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे ७ पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : येथील बोडस चॅरिटेबल ट्रस्टने अकराव्या वर्षीचे कर्तव्यनिष्ठा आणि कार्यगौरव तसेच त्रैवार्षिक संस्थात्मक निष्ठागौरव पुरस्कार जाहीर केले आहेत.

गेली ११ वर्षे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध अप्रकाशित व्यक्ती तसेच विशेष कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना बोडस चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विविध पुरस्कार दिले जातात. यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील ५ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रथमच एका वर्षी दोन्ही कर्तव्यनिष्ठा पुरस्कार महिलांना देण्यात येत आहेत. त्रैवार्षिक संस्थात्मक निष्ठागौरव पुरस्कार रत्नागिरीतील खालची आळी मित्र मंडळ या संस्थेला मिळाला आहे.

रत्नागिरी येथे सुमारे २५ वर्षे बॅडमिंटन क्षेत्रात पुरस्कार जिंकणाऱ्या, मुलामुलींना प्रशिक्षण देणाऱ्या आणि रत्नागिरीचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्या सौ. सरोज सीताराम सावंत आणि लांज्यातील कला वाणिज्य विद्यान महाविद्यालयात २७ वर्षे सेवा देणाऱ्या वाणिज्य विभागप्रमुख सहयोगी प्राध्यापक आणि पीएचडीसाठी मान्यताप्राप्त गाइड डॉ. सौ. सुवर्णा अनंतराव देऊसकर यांना कर्तव्यनिष्ठा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

दशावतारी नाट्य प्रयोगात गेली २२ वर्षे स्त्री भूमिका सादर करणारे सिंधुदुर्गातील वेतोरे (ता. वेंगुर्ले) येथील कलावंत अब्दुल कुन्जली नदाफ (सध्या सुनील गोसावी यांच्या अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ, पाट-म्हापण येथे कार्यरत), रत्नागिरीच्या तेली आळीतील रहिवासी आणि ४२ वर्षे कोणत्याही वेळी मृतदेहाच्या स्मशानभूमीत जाणाऱ्या अंतिम यात्रेचे सारथ्य करणारे शशिकांत महादेव नाचणकर, गोवळ (ता. राजापूर) ग्रामपंचायतीत पहाटे ४ ते सायंकाळी ७ या वेळेत दोन टप्प्यात नळपाणी योजनेचे पाणी सोडण्यासाठी दररोज सुमारे १२ किलोमीटर पायपीट करणाऱ्या श्रीमती मनस्वी महेंद्र टेमकर आणि लाकडाच्या घोड्यावर गणपतीची निर्मिती करण्याची १०० वर्षांची परंपरा सांभाळणारे साखरपा येथील लक्ष्मण विश्राम पांचाळ ऊर्फ काका मेस्त्री यांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

त्रैवार्षिक संस्थात्मक निष्ठा गौरव पुरस्कार गेली ४० वर्षे मार्गशीर्ष महिन्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारे महाराष्ट्रातील एकमेव आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले महिला झांजपथक तयार करणारे रत्नागिरीतील खालची आळी मित्र मंडळ या संस्थेला मिळाला आहे.

कर्तव्यनिष्ठा पुरस्काराचे स्वरूप वैयक्तिक सन्मानपत्र, शाल आणि एक पुस्तक असे आहे, तर कार्यगौरव पुरस्काराचे स्वरूप वैयक्तिक सन्मानपत्र, शाल आणि ३,००० रुपये असे आहे. त्रैवार्षिक संस्थात्मक निष्ठा गौरव पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र आणि ५,००० रुपये असे आहे.

पुरस्कारप्राप्त ६ व्यक्तींपैकी रत्नागिरी शहराबाहेरील ४ सन्मानितांना त्यांचे सन्मानपत्र, शाल आणि पुरस्काराची रक्कम त्यांच्या कार्याच्या ठिकाणी पाठवून दिली जाणार आहे. रत्नागिरी शहरातील शशिकांत महादेव नाचणकर, खालची आळी मित्रमंडळ आणि सौ. सरोज सीताराम सावंत यांचा गौरव ९ मार्च ते ११ मार्च या कालावधीत करण्यात येणार आहे, असे बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या खजिनदार ॲडव्होकेट सौ. आदिती अभिजित पटवर्धन यांनी कळवले आहे.

सन्मानितांचा परिचय

कर्तव्यनिष्ठा पुरस्कार

(१) सौ. सरोज सीताराम सावंत – गेली ४४ वर्षे बॅडमिंटन खेळत आहेत. विद्यार्थिदशेत शिवाजी विद्यापीठ संघातून राष्ट्रीय पातळीवर खेळल्या आहेत. १९९९ पासून रत्नागिरीत खेळत असून २००२ पासून प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. सन २०१३ पासून वरिष्ठ गटातून राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेत आहेत. या स्पर्धांमध्ये आतापर्यंत एकेरी, दुहेरी आणि मिश्र गटात मिळून ९ वेळा उपविजेतेपदाच्या आणि १४ वेळा विजेतेपदाच्या मानकरी आहेत. २०१५ पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताकडून स्वीडन, कोचीन, पोलंड आणि साऊथ कोरिया येथील स्पर्धांत सहभाग घेतला आहे.
(संपर्क क्रमांक 9420308967)

(२) प्रा. डॉ. सौ. सुवर्णा अनंतराव देऊसकर – सन १९९६ पासून लांजा येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात कार्यरत आहेत. महविद्यालयात १२ विविध समित्यांच्या समन्वयक, निमंत्रक आणि सदस्या म्हणून काम केले आहे. १० महिने प्रभारी प्राचार्यपदाची जबाबदारी पेलली. मुंबई विद्यापीठाच्या ३ समित्यांवर नियुक्ती तसेच पदवी आणि पदव्युत्तर पेपर सेटर म्हणून काम केले आहे. विविध संस्थांचे ६ पुरस्कार मिळाले आहेत. तसेच संशोधन क्षेत्रात भरीव काम केले आहे. पीएचडीसाठी मान्यताप्राप्त गाइड आहेत. एक पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.
(संपर्क क्रमांक 9970202150)

कार्यगौरव पुरस्कार

(१) अब्दुल कुन्जली नदाफ – वेतोरे (ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग) येथील रहिवासी असून गेली २२ वर्षे दशावतारी नाट्यप्रयोगात स्त्री पात्र साकारताना गणपतीची आरती करतात. ज्येष्ठ दशावतारी कलावंत बाबी कलिंगण यांना आपले गुरू मानतात. स्वभावाने नम्र, उत्तम अभिनय आणि मनाला भिडणारी शब्दफेक यांच्या जोडीला कुराणाइतकीच पुराणांची माहिती ही वैशिष्ट्ये! आतापर्यंत एकूण ८ दशावतारी मंडळांमध्ये राजकन्या, राजपत्नी, सती चांगुणा, कमला, जाम्बुवंती, रुक्मिणी आणि तारामती यांच्या भूमिका केल्या आहेत. सध्या सुनील गोसावी यांच्या अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळात (पाट, म्हापण, ता. कुडाळ) येथे काम करत आहेत. मुस्लिम असून दशावतारी पात्र साकार करतात म्हणून त्यांच्यावर “ मशिदीतील देवता (Goddess in the Mosque )” अशी डॉक्युमेंटरी करण्यात आली आहे.
(संपर्क क्रमांक 8275380261)

(२) शशिकांत महादेव नाचणकर – सन १९८१ पासून आपले ज्येष्ठ बंधू प्रकाश ऊर्फ भाई यांच्यासमवेत मृतदेह स्मशानात नेण्यास सुरुवात केली. तेव्हा या सेवेसाठी २ वाहने उपलब्ध होती. केवळ १०० रुपये इतक्या नाममात्र सेवाशुल्कातून टेम्पो सेवा दिली आहे. जेव्हा मृत व्यक्तीच्या कुटुंबांना गरज होती किंवा मनुष्यबळ कमी होते, तेव्हा तिरडी बांधणे, चिता रचणे आदी सेवाही दिली. ज्येष्ठ बंधूंनी या सेवेतून निवृत्ती घेतली, तरी शशिकांत यांचे कार्य सुरूच आहे. स्वत:च्या पत्नीचा मृत्यू झाल्यावरही अवघ्या ३ दिवसांत ते पुन्हा सेवेवर रुज झाले. रत्नागिरी व्यापारी संघाने चालू केलेल्या वैकुंठरथ या वाहनाचे सारथ्य ते सध्या करत आहेत.
(संपर्क क्रमांक 9096463315)

(३) श्रीमती मनस्वी महेंद्र टेमकर – गोवळ (ता. राजापूर) येथे १८ वर्षांपूर्वी लग्न होऊन आल्यावर पतीला शेती आणि ग्रामपंचायतीच्या कामात साथ दिली. शिक्षण केवळ दहावी पास एवढेच असूनही सामाजिक जाणीव आणि नोकरीतील कर्तव्य यांचे पूर्ण भान आहे. एकूण ३ मुलांचे शिक्षण करताना घरची शेती सांभाळली आहे, कोविड महामारी काळात पतीचे निधन झाल्यावर ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेची जबाबदारी उचलली आहे. त्यासाठी महिला म्हणून कोणतीही सवलत घेतली नाही. वर्षभर दररोज पहाटे ४ वाजता उठून ३ किलोमीटर अंतरावर पाणी सोडण्यासाठी जातात. आतापर्यंत २ वेळा बिबट्या आडवा गेला, पण त्या हातात लोखंडी दांडा घेऊन जात असल्याने धीटपणे त्या पुढे निघून गेल्या. दिवसातून २ वेळा पाणी सोडण्यासाठी सुमारे १२ किलोमीटर पायपीट करतात. वाडीवाडीत फिरून पाइपलाइनला गळती असेल तर ती गळतीही काढतात.
(संपर्क क्रमांक 9422559735)

(४) लक्ष्मण विश्राम पांचाळ – सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या साखरपा (ता. संगमेश्वर) या गावात सुमारे १०० वर्षे एका अनोख्या प्रथेचे पालन होत आहे. तेथील काही ब्राह्मण कुटुंबात लाकडी घोड्यावर गणपती बसवला जातो. हे कौशल्याचे काम पांचाळ कुटुंबाच्या ३ पिढ्या करत आहेत. कोणतेही रीतसर शिक्षण न घेता लक्ष्मण विश्राम पांचाळ ऊर्फ काका मेस्त्री हे काम करत आहेत. या कौशल्यासह पालखी आणि बैलगाडी बनवण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांचे आजोबा लक्ष्मण नारायण पांचाळ यांनी सुरू केलेली प्रथा वडील विश्राम लक्ष्मण पांचाळ यांनी जोपासली आणि आता लक्ष्मण विश्राम पांचाळ (आजोबांचे नाव नातवाला ठेवले आहे) पुढे नेत आहेत.
(संपर्क क्रमांक 7066220191)

निष्ठागौरवप्राप्त संस्था
खालची आळी मित्रमंडळ, रत्नागिरी – भाद्रपद आणि माघी गणेशोत्सव जनमान्य असताना ४० वर्षांपूर्वी मार्गशीर्ष महिन्यात सार्वजनिक गणपतीची प्रथा खालची आळी मित्रमंडळाने सुरू केली. महाराष्ट्रातील हे एकमेव मंडळ आहे की जे मार्गशीर्ष महिन्यात सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करते. अठरापगड अशी बहुआयामी वस्ती आणि कष्टकरी जनता मंडळाची सदस्य असताना सर्व उपक्रम गुण्यागोविंदाने साजरे होत आहेत. या मंडळाने जिल्ह्यातील पहिले महिला झांज पथक तयार केले. महिलावर्गाचे रामरक्षा पठण आणि विद्यार्थ्यांसाठी अथर्वशीर्ष पठण हे धार्मिक उपक्रम सुरू आहेत. शहरातील गुढीपाडवा नववर्ष स्वागत यात्रेच्या वेळी खालची आळी मित्रमंडळाचा चित्ररथ शेवटी असतो आणि त्याचे स्वयंसेवक आधीचा कचरा उचलून, रस्तासफाई करून राष्ट्रीय स्वच्छता अभियानात सहभागी होतात.
(संपर्क – अध्यक्ष, राहुल पंडित – 8767772099)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply