रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ (पावस, रत्नागिरी) यांच्या वतीने दिला जाणारा स्वरूप योगिनी पुरस्कार आस्था सोशल फाऊंडेशनच्या संस्थापिका सौ. सुरेखा देवराम पाथरे यांना प्रदान करण्यात आला.
सौ. शीत ल काळे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. सौ. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी सुरेखा पाथरे यांचा परिचय करून दिला आणि मानपत्राचे वाचन केले.
सत्काराला उत्तर देताना सौ. पाथरे यांनी सांगितले की, आस्था फाऊंडेशनच्या माध्यमातून स्पेशल एज्युकेशन सुरू झाले. दिव्यांग हेल्पलाइन सुरू झाली. आयुष्यात छोटे-मोठे पुरस्कार मिळाले . या पुरस्काराच्या रूपाने आज स्वामींचा आशीर्वाद मिळाला आहे. हे काम असेच पुढे जाईल. त्यांनी स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाबद्दल ऋण व्यक्त करते.
कार्यक्रमाची सुरुवात विजय रानडे यांच्या नमस्तेस्तु महामाये या देवीस्तुती गायनाने झाली. श्री. रानडे यांचा सत्कार स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्यवाह हृषिकेश पटवर्धन यांनी केला. श्रीनिवास पेंडसे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्माचे त्रिशतकी वर्षानिमित्त पुण्यश्लोक महाराणी या विषयावर व्याख्यानाचे द्वितीय पुष्प गुंफले. श्री. पेंडसे म्हणाले की, मल्हाररावांचे मूळ गाव वाधगाव होते. पुण्याजवळील होळ गावात राहायला गेले म्हणून होळकर असे आडनाव पडले. मल्हारराव होळकरांनी छत्रपतींच्या राज्यविस्ताराला सुरुवात केली. सैन्याचा तळ चौंडीला होता. तेथे सीना नदीच्या काठावर शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी मुलगी आली होती, त्यांचे धाडस पाहून बाजीरावांनी अहिल्यादेवींचा विवाह खंडेरावांशी लावून दिला. अहिल्यादेवींनी राज्यकारभार केला. सामान्यांच्या घरामध्ये अहिल्याबाईंनी स्थान निर्माण केले. अहिल्यादेवींनी अनेक ठिकाणी कार्य केले आहे. त्यांनी अनेक देवस्थानांना भेटी दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील कळबंस्ते गावात रामेश्वर मंदिराची स्थापना त्यांनी केली. अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. अहिल्याबाईंनी महत्वाचे २२ निर्णय घेतले. दत्तक घेण्याऱ्याला जो आवडेल त्यालाच दत्तक घेता येईल, असे त्यानीं सांगितले. अहिल्याबाईंचे कार्य मोलाचे आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद वैद्य यांनी केले तर मंडळाचे कार्यवाह हृषिकेश पटवर्धन यांनी आभार मानले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

