श्री क्षेत्र टेरव येथे १२ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा वार्षिक जत्रोत्सव

चिपळूण : रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरव येथे येत्या शनिवारी, १२ एप्रिल २०२५ रोजी वार्षिक जत्रोत्सव साजरा होणार आहे.

टेरव येथील सुप्रसिद्ध देवस्थानचे ग्रामदैवत श्री वाघजाई देवी आणि कुलदैवत श्री कुलस्वामिनी भवानी देवी आहे. श्री काळकाई देवी ही माहेरवाशिणींची रक्षणकर्ती देवी म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच जागृत आणि नवसाला पावणाऱ्या देवता असा या देवतांचा लौकिक आहे. शक्ती, युक्ती, बुद्धी व भक्ती यांचा अजोड मिलाफ असलेल्या महाबली श्री हनुमान जन्मोत्सव चैत्र पौर्णिमेला साजरा करण्यात येतो. यंदा हा उत्सव शनिवार, दिनांक १२ एप्रिल रोजी मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे.

चैत्र पौर्णिमेला सूर्योदय झाल्यावर ब्राह्मण, मानकरी, ग्रामस्थ आणि पुजारी यांच्या उपस्थितीत मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. दुपारी १२ वाजता ग्रामस्थांच्या उपस्थितीत दोन्ही मानकरी श्रीफळाच्या तीन जोड्या श्री कुलस्वामिनी भवानी मातेसमोर ठेवतात व गाऱ्हाणे घालून पुजारी ते श्रीफळ वाढवितात. प्रसाद म्हणून मानाप्रमाणे त्याचे वाटप करतात. मंदिराच्या पोवळीबाहेर पूर्व दिशेस देवीचे देणे मागणे दिले जाते. मंदिराच्या बाहेर पावट्याच्या घुगऱ्या व देवीच्या देण्या मागण्याचा प्रसाद दिला जातो. परंपरेनुसार पूजाविधी झाल्यावर पालखीत कुलदैवत श्री भवानी, ग्रामदैवत श्री वाघजाई, भैरी, केदार, महालक्ष्मी व कुलस्वामिनी या देवतांची रूपे लावतात.

शतकाच्या दिशेने वाटचाल करणारा टेरव गावचा चैत्र पौर्णिमा जत्रोत्सव म्हणजेच ग्रामस्थ, माहेरवाशिणी, चाकरमानी आणि भक्तांच्या आनंदाला उधाण आणणारा दिवस असतो. चैत्र पौर्णिमेनिमित्त पंचक्रोशीतील कामथे व चिंचघरी येथील पालख्यांचे मिरवणुकीने वाजतगाजत रात्रौ टेरव येथे आगमन होते. पालख्या विद्युत रोषणाईने, तसेच विविध प्रकारच्या फुलांनी सजविलेल्या असतात. ढोलताशांच्या गजरात गुलाल उधळत तिन्ही पालख्यांची मिरवणूक मंदिराकडे मार्गस्थ होते. तिन्ही पालख्या नाचत उंचावून एकमेकींना भेटतात. मंदिरात तिन्ही पालख्या स्थानापन्न झाल्यावर दर्शनासाठी आणि ओटी भरण्यासाठी प्रचंड गर्दी होते. त्यानंतर रात्री मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही पालख्यांची पूजा व सन्मान केल्यावर आपापल्या गावी मार्गस्थ होतात. त्यावेळी श्री क्षेत्र टेरवची पालखी मंदिराच्या उत्तरेच्या प्रवेशद्वारापर्यंत निरोप देण्यासाठी नेली जाते. अशा प्रकारे जत्रोत्सवाची सांगता होते.

सर्व भाविक, चाकरमानी, माहेरवाशिणी व हितचिंतक यांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, अशी विनंती ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply