नवी दिल्ली : सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले सी. पी. राधाकृष्णन हे देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती होणार आहेत. आज (९ सप्टेंबर २०२५) झालेल्या निवडणुकीत एनडीए अर्थात सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून उभ्या राहिलेल्या राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली. त्यांच्या विरोधात उभे असलेले इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली. जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणामुळे राजीनामा दिल्यामुळे उपराष्ट्रपतिपद रिक्त झाले होते. त्यामुळे आज सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत नवे उपराष्ट्रपती निवडण्यासाठी मतदान झाले. सहा वाजता मतमोजणी सुरू झाली. राज्यसभेचे महासचिव पी. सी. मोदी यांनी निवडणुकीच्या निकालाची घोषणा केली. सी. पी. राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची ४५२, तर बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. ७६०हून अधिक खासदारांनी या निवडणुकीत मतदान केले होते. त्यांपैकी ७५२ मते वैध ठरली. बिजू जनता दल, भारत राष्ट्रसमिती आणि शिरोमणी अकाली दलाच्या खासदारांनी या निवडणुकीत भाग घेतला नाही. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
Follow Kokan Media on Social Media

