रत्नागिरी : पुण्यातील मायदेश फाउंडेशनच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचा चेहरामोहराच बदलला जाईल, असा विश्वास वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या इमारतीची पुनर्बांधणी सुरू आहे. तळमजल्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, तर सभागृहाचे काम प्रगतिपथावर आहे. दुसऱ्या मजल्याचे काम बाकी आहे. १२००० चौ. फुटाचा एफएसआय वापरून दुमजली बांधकामाची परवानगी वाचनालयाला मिळाली आहे. आजपर्यंत १ कोटी ५० लाखांच्या आसपास काम झाले आहे. मात्र प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी अधिक निधीची आवश्यकता होती. त्यासाठी विविध स्तरावर संपर्क, संवाद सुरू होता. याच प्रक्रियेत पुण्यातील अरुण जोशी यांचा संपर्क झाला. त्यांनी वाचनालयाची माहिती घेतली, तपशिलवार चर्चा केली. त्यांनी स्वतः ‘मायदेश फाउंडेशन’ निर्माण केले आहे. स्वकष्टार्जित निधी वापरून जुन्या ऐतिहासिक संस्था, कलात्मक तसेच शैक्षणिक, राष्ट्रवादाशी संलग्न विषय या क्षेत्रात मायदेश फाउंडेशनच्या माध्यमातून ते सहकार्य करतात. सहभागातून संपूर्ण प्रोजेक्ट विकसित करतात. भारताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव टिकवून ठेवत त्यात नावीन्य आणणे, नूतनीकरण यासाठी मायदेश फाउंडेशन समर्पित आहे.
पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाचे नूतनीकरण, विलेपार्ले येथील स्वा. सावरकर सेवा केंद्र नव्या बहुआगामी स्वरूपात मायदेशने विकसित केले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांचे नूतनीकरण, विद्यार्थ्यांसाठी संगणक सुविधा पुरवणे, पेशवेकालीन शंकर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार इत्यादी महत्त्वाच्या राष्ट्रीय ऐतिहासिक प्रोजेक्टवर मायदेशने भरभरून काम करून आज हे सर्व प्रोजेक्ट अद्ययावत स्वरूपात उभे केले आहेत.
मायदेश फाउंडेशनच्या संचालक मंडळावर अत्यंत प्रथितयश व्यावसायिक असामी असून संपूर्ण संचालक मंडळ इतिहास, कला, शिक्षण या विषयासाठी समर्पित होऊन काम करते . मायदेश फाउंडेशन बरोबर संपर्क झाला. अरुण जोशी तसेच संचालक मंडळ सदस्यांशी चर्चा झाली. त्यांनी माहिती घेऊन वाचनालयाच्या पुनर्बांधणीसाठी १ कोटी 50 लाखाचा निधी देण्याचे मान्य केले, असे अॅड. पटवर्धन यांनी सांगितले.
वाचनालयात डिजिटल लायब्ररी मायदेश डिजिटल लायब्ररी नावाने उभी करणे, दुर्मिळ पुस्तकांचे डिजिटलायझेशन, वाचनालयात होणाऱ्या सभागृह संपूर्ण अद्ययावत करणे, स्वा. सावरकर कम्युनिटी सेंटर उभारणी, दुसऱ्या मजल्यावर शेड उभारून त्यावर सोलर पॅनल लावून संपूर्ण वाचनालय सोलर पॉवरवर नेणे, वाचनालयात लिफ्ट लावणे, वाचनालयाबाहेरच्या जागेचे सुशोभीकरण करणे इत्यादी रचनात्मक कामे करतानाच वाचनालयाच्या विकासासाठी मार्गदर्शन आणि तांत्रिक सुविधा पुरवण्याचे महत्त्वपूर्ण काम मायदेश फाउंडेशन, करणार आहे, असे अॅड. पटवर्धन यांनी नमूद केले.
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे नूतनीकरण होत असतानाच वाचनालयाचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलून जाणार आहे. सर्वांत जुने पण अद्ययावत वाचनालय म्हणून हे वाचनालय विकसित व्हावे, हे स्वप्न साकार होणार आहे. गेली ३० वर्षे वाचनालय उभे करण्यासाठी ग्रंथसंपदा जतन करत ३० वर्षांचे लीज मंजूर करून घेऊन इमारतीचे काम नव्याने सुरू करण्याची मजल मारताना केलेल्या अथक प्रयत्नानंतर मायदेश फाउंडेशनचा वरदहस्त प्राप्त झाल्याने आता वाचनालयचा संपूर्ण प्रोजेक्ट विहित मुदतीत पूर्ण होईल. ग्रंथसंपदा पूर्ण सुरक्षित राहील, वाचनालयाची दालने परत एकदा सांस्कृतिक केंद्र म्हणून आपले नाव प्रस्थापित करतील, असे ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले.
मायदेश फाउंडेशनचे मुख्य प्रवर्तक अरुण जोशी व त्यांचे काही सहकारी संचालक १० ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या वाचनालयाच्या तळमजल्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहतील. वाचनालयाचा अध्यक्ष या नात्याने मी केलेली आग्रही विनंती मान्य करत अरुण जोशी आणि त्यांचे सहकारी उद्घाटन समारंभाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत, असेही अध्यक्ष ॲड. पटवर्धन यांनी सांगितले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

