सिंधुसाहित्यसरिता पुस्तकाचे सिंधुदुर्गात एकाच दिवशी ठिकठिकाणी अनोखे प्रकाशन

माणगाव आणि आचरा (जि. सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिभावान, मात्र फारशा परिचित नसलेल्या साहित्यिकांची ओळख करून देणाऱ्या ‘सिंधुसाहित्यसरिता’ या पुस्तकाचे नुकतेच सिंधदुर्ग जिल्ह्यात एकाच दिवशी विविध ठिकाणी अनोख्या पद्धतीने प्रकाशन झाले. ‘कोमसाप-मालवण’चे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून उत्साही सदस्यांनी सिंधुसाहित्यसरिता अक्षरमंच नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सिंधुसाहित्यसरिता ही लेखमाला करोना लॉकडाउनच्या कालावधीत प्रसिद्ध केली होती. त्यात १६ जणांनी लिहिलेले २२ व्यक्तिमत्त्वांवरचे लेख प्रसिद्ध झाले होते. या लेखमालेत आणखी माहितीची भर घालून ते पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्यात आले. सुरेश ठाकूर यांनी संपादित केलेले हे पुस्तक रत्नागिरीच्या सत्त्वश्री प्रकाशनाने (कोकण मीडिया) प्रकाशित केले आहे. हे पुस्तक गुगलवर ई-बुक स्वरूपातही प्रसिद्ध करण्यात आले आहे. (पुस्तक खरेदीची, ई-बुकची लिंक, तसेच व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिला आहे.)

विपुल साहित्यनिर्मिती करणाऱ्या टेंब्ये स्वामींना अर्पण
कोकणात मंदिरातील देवकार्याचा शुभारंभ देवदीपावलीला होतो. त्या दिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी सिंधुसाहित्यसरिता पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. माणगाव (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती होतेच; मात्र त्यांनी संस्कृत आणि मराठी भाषेत विपुल, दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण साहित्यनिर्मिती केली आहे. त्यांचे एकूण लेखन सुमारे पाच हजार पृष्ठांएवढे आहे. माणगावातील टेंब्ये स्वामी स्थापित दत्त मंदिराचे प्रमुख विश्वस्त वैद्य रा. ज. गणपत्ये आणि प्रकाशक प्रमोद कोनकर यांनी टेंब्ये स्वामींना पुस्तक अर्पण करून पुस्तकाचे प्रकाशन केले. तसेच, माणगावची ग्रामदेवता आणि टेंब्ये स्वामींची आराध्य देवता श्री यक्षिणीच्या मंदिरातही पुस्तक अर्पण करण्यात आले.

सांस्कृतिक वारसा असलेल्या रामेश्वर संस्थानात छोटेखानी सोहळा
त्याच दिवशी संपादक सुरेश ठाकूर यांच्या आचरे (ता. मालवण) गावातील इनामदार श्री देव रामेश्वर मंदिरात देवाला गाऱ्हाणे घालून हे पुस्तक अर्पण करण्यात आले. रामेश्वर संस्थानचे अध्यक्ष मिलिंद मिराशी यांना पुस्तकाची प्रत देऊन प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर आचऱ्यातील साहित्यप्रेमी कै. बाळासाहेब गुरव यांच्या निवासस्थानी झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात, पुस्तकाला गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांनी लिहिलेली प्रस्तावना आणि संपादकीय यांचे वाचन करण्यात आले. या वेळी सुरेश ठाकूर, कपिल गुरव, बाबाजी भिसळे, अनिरुद्ध आचरेकर, मंदार सांबारी यांच्यासह पुस्तकाच्या लेखकांपैकी सदानंद कांबळी, सुगंधा गुरव, मधुरा माणगावकर आदींसह पत्रकार उपस्थित होते.

या वेळी सुरेश ठाकूर म्हणाले, ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेल्या अनंत काणेकर, पु. ल. देशपांडे आणि मधु मंगेश कर्णिक या साहित्यिकांचे सत्कार या रामेश्वर मंदिराच्या सभामंडपात झालेले आहेत. तसेच ज्यांना हे पुस्तक अर्पण केलेले आहे, त्या बॅ. नाथ पै यांची अनेक भाषणेही येथे झालेली आहेत. त्याशिवाय साने गुरुजींपासून अप्पासाहेब पटवर्धनांपर्यंत, ना. ग. गोरेंपासून चिं. वि. जोशींपर्यंत, श्रीपाद काळेंपासून वसंत सावंतांपर्यंत आणि विद्याधर भागवतांपासून विद्याधर करंदीकरांपर्यंत अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ साहित्यिकांचे कार्यक्रम येथे झालेले आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे पहिले पुस्तक येथे प्रकाशित होत आहे, याचा आनंद असून, तो मोठा सन्मान आहे.’

संपादक सुरेश ठाकूर यांच्याशी पत्रकार परेश सावंत, अर्जुन बापर्डेकर आणि उदय बापर्डेकर यांनी कार्यक्रमानंतर संवाद साधला.

पुस्तकातील लेखक उमेश कोदे यांनी पत्नी अर्चना कोदे यांच्यासह कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात पुस्तक अर्पण केले. तसेच, लेखिका उज्ज्वला धानजी यांनी पती चंद्रशेखर धानजी यांच्यासह आरवली-वेंगुर्ले येथील वेतोबा मंदिरात पुस्तक अर्पण केले.

मालवणच्या बॅ. नाथ पै सेवांगणात बॅ. नाथ पै आणि साने गुरुजींच्या प्रतिमेसमोर पुस्तक ठेवून प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी कोमसापचे केंद्रीय सदस्य रुजारिओ पिंटो, पुस्तकातील लेखिका आणि सेवांगणच्या ग्रंथालयाच्या ग्रंथपाल ऋतुजा केळकर, यांच्यासह चारुशीला देऊलकर, मनोज गिरकर, विनायक आचरेकर आदी उपस्थित होते.

साखरपुड्याला ६० जणींच्या पुस्तकाने ओट्या
‘सिंधुसाहित्यसरिता’तील एक लेखिका श्रीमती सुजाता सुनील टिकले (कणकवली) यांनी आपला मुलगा दत्तप्रसाद याच्या साखरपुड्याच्या निमित्ताने मुलगा आणि भावी सूनबाई समिधा यांना पुस्तक प्रदान केले. तसेच त्यांनी या पुस्तकरूपी वाणाने ६० सुवासिनींच्या ओट्या भरल्या. वाचनसंस्कृतीच्या प्रसाराला हातभार लावणाऱ्या या आगळ्यावेगळ्या प्रकाशन कार्यक्रमाचे सर्वांनी स्वागत केले. तसेच, या पुस्तकातील लेखकांनी आपापल्या घरीही सरस्वतीपूजन करून पुस्तकाचे प्रकाशन केले. करोनाच्या पार्श्वभूमीवर, सर्वांनी एकत्र न जमता ठिकठिकाणी हे पुस्तक प्रकाशित झाले आणि एकाच वेळी सिंधुसाहित्यसरितेचा प्रवाह सर्वत्र प्रवाहित झाला.

मधु मंगेश कर्णिक यांच्या शुभेच्छा
‘कोमसाप’चे संस्थापक मधु मंगेश कर्णिक यांनी या पुस्तक प्रकाशनानिमित्त दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. त्या अशा – ‘कोमसाप’च्या मालवण शाखेच्या १६ लेखकांनी सुरेश ठाकूर यांच्या संपादकत्वाखाली तयार केलेले सिंधुसाहित्यसरिता हे पुस्तक देवदीपावलीला आणि श्री देव रामेश्वराच्या सान्निध्यात प्रकाशित होत आहे, ही बाब मला आणि कोमसाप परिवाराला निश्चितच आनंद देणारी आहे. माझ्या करुळ गावाइतकेच मला प्रिय असलेले आणखी एक गाव म्हणजे आचरे. निसर्ग रमणीयतेने, रामेश्वराच्या घनगंभीर सदावर्तनाने आणि लोभस साहित्यरसिकांमुळे सदैव स्मरणात राहणारे गाव. साहित्य, संगीत, नाट्य या कलांवर लुब्ध असलेली येथील प्रेमळ माणसे. या साऱ्यांच्या सान्निध्यात ‘कोमसाप-मालवण’चे पुस्तक प्रकाशित होत आहे. याच्याशी संबंधित सर्व लेखक, संपादक, प्रकाशक, कार्यकारिणी अशा सर्वांना मी शुभेच्छा देतो. या प्रकल्पाचे पुढील भागही प्रकाशित होवोत आणि कोकणच्या अक्षरधनाचा सर्वांना परिचय होवो.

या लेखकांचा समावेश…
बॅ. नाथ पै, आ. सो. शेवरे, वसंतराव आपटे, प्रतिभा आचरेकर, पा. ना. मिसाळ, ल. मो. बांदेकर, डॉ. विद्याधर करंदीकर, डॉ. वा. वि. मिराशी, आ. द. राणे गुरुजी, जी. टी. गावकर, विद्याधर भागवत, विजय चिंदरकर, आ. ना. पेडणेकर, श्रीपाद काळे,, बाळकृष्ण प्रभुदेसाई, डॉ. वसंत सावंत, प. स. देसाई, लुई फर्नांडिस, हरिहर आठलेकर, वसंत लाडोबा म्हापणकर, अॅड. श्री. स. खांडाळेकर आणि नाट्यकार मामा वरेरकर या २२ व्यक्तींवरील लेखांचा या पुस्तकात समावेश आहे.

(‘सिंधुसाहित्यसरिता’ पुस्तकाचे संपादकीय, तसेच प्रकाशकांचे मनोगत वाचण्यासाठी येथे क्लिक करा. माणगाव येथे टेंब्ये स्वामींना पुस्तक अर्पण करण्याच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

(सिंधुसाहित्यसरिता या छापील पुस्तकाची किंमत २०० रुपये आहे. पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. ई-बुक गुगल प्ले बुक्सवर उपलब्ध असून, त्याची किंमत १५० रुपये आहे. ई-बुक खरेदीसाठी https://bit.ly/2IlFV7C या लिंकवर क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply