नागपूर : राष्ट्रं सर्वोपरी या विचारधारेवर चालणारी अभाविप ही जगातील सर्वांत मोठी विद्यार्थी संघटना आहे. या संघटनेचा जगभरात विस्तार करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. छगनभाई पटेल यांनी दिली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या् सहासष्टाव्या राष्ट्री य अधिवेशनाला आज नागपूर येथील रेशीमबाग भागातील डॉ. हेडगेवार स्मारक समिती स्मृती मंदिरात प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.
उद्घाटनपूर्व सत्रात अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एस. सुबैया आणि महामंत्री निधी त्रिपाठी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. भारतात सर्व समुदायाचे लोक राहतात. त्या सर्वांशी संपर्क करून त्यांच्यामध्यें राष्ट्रभावना निर्माण करण्याचा अभाविपचा मुख्य उद्देश आहे. ‘नर हो या नारी हो, भारतमाता प्यांरी है, भारतमाता प्यारी है तो वंदे मातरम् जारी रहेगा’ असे म्हणत त्यांनी या देशात वंदे मातरम् म्हणावेच लागेल, असे मत डॉ. एस. सुबैया यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले. निधी त्रिपाठी यांनी अभाविपच्या कार्याचा आढावा घेतला.
निवडणूक अधिकारी आणि राष्ट्रीय सहविद्यार्थी प्रमुख उमा श्रीवास्तंव यांनी अभाविपच्या नव्या कार्यकारिणीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. छगनभाई पटेल यांच्या नावाची तर राष्ट्रीय महामंत्रिपदी निधी त्रिपाठी यांच्या नावाची घोषणा केली. दोघांनी यावेळी कार्यभार स्वीकारला.
डॉ. पटेल नियुक्तीनबद्दल सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले, संघभूमी, दीक्षाभूमीसारख्या पवित्र भूमीतून माझ्या अध्यक्षपदाच्या कार्याची सुरुवात होते आहे, यासारखे दुसरे भाग्य नाही. राष्ट्रकार्य हे माझ्यासाठी ईश्वरीय कार्य आहे. आधीच्या अध्यक्षांनी अभाविपच्या कार्याला जी गती दिली, ते काम आणखी पुढे नेण्याचा कसोशीने प्रयत्न मी करीन.
पुनर्नियुक्त राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी यांनीही आपले विचार यावेळी व्यक्त केले. अभाविप हे राष्ट्रभक्तीचे केंद्र बनावे, विद्यार्थ्यांनी समाज व राष्ट्राबाबत विचार करावा, यासाठी प्रयत्न केले जातील. जेथे विद्यार्थी परिषदेचे कार्य सुरू आहे, तेथे ते वाढवण्याचा आणि जेथे नाही तेथे सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला देशभरातून कार्यकारिणीचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २०० जणांसह देशभरातील चार हजार ठिकाणांहून लाखो कार्यकर्त्यांनी ऑनलाइन उपस्थित लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन तिवारी यांनी केले.
(नागपूरच्या अधिवेशनात सहभागी झालेल्या रत्नागिरीतील कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित वृत्तांत)
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
